अकारण..सकारण आठवणी.
परवा असचं रात्री पोळ्या करत होते.नेहमी प्रमाणे पुणेरी घडीच्या पोळ्यांचा माझा जोक आठवला.मी पुण्यात रहात असताना मेसमधला डबा लावला होता.तर त्या मेससमोर मोठी पाटी लावली होती इथे घडीच्या पोळ्या मिळतील अशी.मला फार आश्चर्य वाटलं इतकं काय आवर्जून लिहिण्यासारखं आहे यात.लाटायची पोळी,करायची घडी की भरायची डब्यात.पुणेकर कशाचं मार्केटिंग करतील नेम नाही..हसुच आलं.
कालांतराने फुलके आणि घडीच्या पोळी करण्यातला,
आवडीतला फरक लक्षात आला आणि माझ्या अज्ञानाची मलाच गंमत वाटली.
तर मी पोळ्या करताना मुलीला गोल लाटीला दोन घड्यामारुन होणा-या त्रिकोणाला कसं लाटतं लाटतं गोल करायचं आणि घडीच्या पोळीतली पापुद्र्यांची नजाकत सांगत होते. तर परत एकदा 'इथे घडीच्या पोळ्या मिळतील'चीही गंमत सांगितली.
आणि त्याचं कारणही सांगितलं की तो पर्यंत मी कधी दुस-या पध्दतीच्या पोळ्या पाहिल्याच नव्हत्या का ऐकल्याही नव्हत्या. कारण माझी आई कायम घडीच्याच पोळ्या करायची.मग लक्षात आलं..अरेच्या आई अशी आपल्यासारखी त्रिकोणी घडी नाही करायची.मग मुलीला माझी आई कशी लांब लाटीला मधून चिमटून एकच घडी घालून पोळी करायची ते दाखवलं.खरंतर एवढ्या राबत्याच्या घरात ती कधी पोळ्यांची चळत हातावेगळी करायची आणि बरोबर पावणे दहाला नेमाने बाबांना जेवायला कशी वाढू शकायची हे कधी कळलही नाही.
समजूतदार,जाणकार नजरेनी कधी तिच्या स्वैपाकाच्या कामाचं वेळापत्रक,हातोटी पहायची वेळही माझ्यावर आली नाही.
मग मुलगी म्हणाली आई त्या त्रिकोणाला गोल करण्यापेक्षा या चिमुटलेल्या गोलालाच गोल करणं सोप्प आहे.गेली पंचवीस वर्ष मी पोळ्या करते आहे पण पोळी करताना आईची अशी प्रकर्षाने आठवण कधी झाली नाही. पण आज लक्षात आलं अशी पोळी करायचा प्रकार कीती तिच्याशी निगडीत आहे ते.आणि माझ्या मुलीलाही तोच सोईचा वाटतोय याचही मनस्वी आश्चर्य वाटलं.
काल दवाखान्यात गेलो होतो.नंबर लावला.शेजारीच एक डॉक्टरांना तब्येत दाखवायला,प्रश्न विचारायला अति उत्सुक असणारे आणि आपल्या नंबरासाठी खूपच जागरुक असणारे वयस्क पण हसरे गृहस्थ बसलेले होते. अगदी बाबांसारखेच.आमच्या आधी त्यांचा नंबर.
आम्ही आल्याबरोबर आमच्याशी नजरेनीच त्यांनी ते घाईने कंफर्म करुन ठेवलं.
ते आणि आम्ही दोघही एकदमच आत गेलो.
त्यांनी डॉक्टरांना सुधरणा-या तब्येती विषयी खूषीने सांगितलं.
अजून एका हॉस्पिटलमधल्या दुस-या नामांकीत डॉक्टरचा दाखला देत काही प्रश्नही डॉक्टरांची परवानगी घेऊन विचारले.डॉक्टरांनीही ते सराईत कौशल्याने टोलवले.
गृहस्थांबरोबर आलेली तरुणी या प्रसंगामुळे कसंनुस हसून ऑकवर्ड होत होती.
आमचे बाबा देखील असेच वागायचे. सेकंड ओपिनियन घ्यायचं आणि दोन्ही डॉक्टर्सना एकमेकांची मतं सांगायची आणि कोंडीत पकडायचं. त्यांच्या बरोबर दवाखान्यात जाणं म्हणजे एक परिक्षाच असायची.
He was so obsessed with his health, pathological and other investigations, medicines and doctors..
की बाप रे बाप !
त्यांच्या या नादीष्ट छंदाविषयी लिहायचं म्हटलं तर एक विनोदी पण ह्रद्य दिर्घलेखच होईल.
त्यांच्या ह्या छंदाला उत्तर आयुष्यात अखंड खतपाणी मिळालं ते माझ्या तरुण भावाच्या आजाराने.
अक्षरशः जीवाचं रान करत त्यांनी त्याला बरं करण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली. पण दुर्दैवाने यश नाही मिळालं.
And after that he lost the very reason to live.
आज सकाळचा चहा,सूप करत होते तर रेडिओवर अनिलकपूर-माधूरी दिक्षितच्या एका सुप्रसिद्ध चित्रपटातले सुरेल द्वंदगीत लागलेलं. हे गाणं माझ्या भाऊभावजयीचं तरुणपणातलं अगदी जिव्हाळ्याच गाणं होतं. आता ते मला कसं कळलं हेही आठवत नाही.पण हे गाणं ऐकलं की प्रेमात पडून भावी आयुष्याचे स्वप्न रंगवणारे ते दोघच मला आठवतात.
No comments:
Post a Comment