पहिली गोधडी कधी पाहिली आणि तिने मनात कधी घर केलं कळलंच नाही.माझी आई शिवण शिवायची पण तिही फक्त बाळांतविड्यातले दुपटेच तुकडे जोडून करत असे. तेही एकसारखे डिझाईनचेच.
मला वाटतं नांदेडला बहुतेक सगळ्या नातलगांकडे साडीच्या गोधड्या असत.कारण नऊवार नेसणा-यांच प्रमाणही तिकडे जास्त आहे.
कधीतरी गुर्जरीच्या प्रदर्शनातही डिझायनर गोधड्या पाहिल्या होत्या.
आमच्याकडे औरंगाबादला महालक्ष्म्या उठल्या की मध्यमवर्गीय गल्ली,बोळातून गोधड्या,रजाया..अशा हाका देत गोधडी करुन देणा-या बायका फिरतात.
पण त्या फक्त साडीच्या घड्याघालून साताठ लाईन्स धावदो-याच्या घालून झटपट गोधडी तयार करुन देतात.कॉटन, सिंथेटिक, जरी,सिल्क असा कसलाही विधीनिषेध नसतो नाही कलात्मकता.
जुने-यातून काहीतरी वापरण्यायोग्य टिकावू करणे येवढचं त्यांच काम. पण घरोघर अशा गोधड्या बरेच जणं करून घेतात.
बेतासबात असल्या तरी एकदा पंधरा वर्षांपूर्वी अशाच फिरस्त्या दोघींकडून आठ-दहा गोधड्या करुन घेतल्या म्हणजे,माझ्याच ड्रेसेसचे जुने-नवे कपडे मीच कापून-जोडून-शिवून ठेवायची मशीनवर. त्या बायका फक्त अस्तर म्हणून जुनी-नवी चादर लावून दोरे भरुन द्यायच्या. नंतर त्या गोधड्यांना मी गादीवाल्याकडून रजाईसारखी पायपिन लावून घ्यायचे.त्यातल्या काही गोधड्या घरी वापरल्या.काही गिफ्ट दिल्या.पण हा प्रोजेक्ट व्यवसाय म्हणून करता येईल का असा किडा डोक्यात शिरलाच आणि मग विविध प्रांती-जमातीच्या गोधड्या शोधायचा छंदच लागला आणि गोधडीने केव्हा मनात घर केलं कळलच नाही.
तर तेव्हा त्या बायका चार-सहा दिवस घरी यायच्या.
बोलायला चटपटीत पेक्षाही अग्रेसिव्ह,खमक्याच जास्त वाटायच्या.शहरा जवळच रहायच्या.
But somehow..ही गोष्ट तिथेच थांबली.
मग एकदा हेमलकस्याला गेले होते.तिथे बरेच निर्वासित बंगाली आहेत.अत्यंत गरीबी पण काय त्यांच्या गोधड्या होत्या.अत्यंत जवळ-जवळ पण एकसारखे दोरे भरलेले. साड्यांच्याच गोधड्या पण अक्षरशः नजर खिळून रहायची.
खुद्द हेमलकस्याचा अदिवासी ब-यापैकी नग्नच असतो.
अक्षरशः रुग्ण देखील कोरुगेटेड बॉक्सेसवर झोपतात झाडाखाली.
बाळांसाठी पण दुपटे नसतात.मुळात कपडाच वापरत नाहीत त्यामुळे जुनेरं निघायचा प्रश्नच येत नाही ना !
पण मग छंदच लागला गोधड्याचा मागोवा घ्यायचा.
दिसली वेगळी गोधडी की चौकशी करायची,माहिती घ्यायची.
आपले रस्त्यावर चालणारे माळरानात पालं ठोकून रहाणारे धनगरी लोक अगदी लहान तळहाता एवढ्या तुकड्या-तुकड्यांची फार छान गोधडी करतात त्याला ते वाकळं म्हणतात.आणि ही सगळी तुकडा जोडणी ते चौकोनात चकलीसारखं फिरत-फिरत हातानेच करतात.खुप हातोटी असते त्यांची यामधे.रस्त्याने बघा त्यांच्या तट्टूंवरच्या पिशव्या सुध्दा इतक्या छान शिवलेल्या असतात.त्यात ते सामान,बक-या ,मुलं वाहून नेतात.
आणि आपल्याकडे कष्टकऱ्यांच्या घरात ज्या जाडीजाड गोधड्या करतात त्याही जरा वेगळ्या असतात.
दोन चादरींच्या-साड्यांच्यामधे जुन्या कपड्यांचे तुकडे (शर्ट,पैंट,बुश्कोट,पायजामे,चोळ्या,जाकीटं) करुन..एका जवळ एक रचून त्यांना धावदो-याने पक्क करुन टाकतात जेणे करुन धबडग्यात,धुण्यात ते तुकडे गोळा होऊ नयेत.म्हणून मग हाताने त्या ऊभ्या,आडव्या,तिरप्या टीपा जवळजवळ मारल्या जातात. It's like tucking of pieces together, so they don't move anywhere. या गोधड्या फारशा नियमित धुतल्याही जात नाहीत आणि शक्यतो अंथरुण म्हणून वापरल्या जातात.
पण नविनातले चटकदार तुकडे,जुने-यातले धडस तुकडे एकाला एक जोडून,धावदोरा भरुन वापरण्यायोग्य एखादे वस्त्रापवरण तयार करणे हा पृथ्वीतलावरील सर्व कानाकोपऱ्यातील महिलांचा प्राचीन छंद आणि काटकसरीचा उद्योग आहे.
प्रांतीय गरजेनुसार, उपलब्धतेनुसार कपड्यांचे पोत, रंगसंगती, हातकामाची पध्दत-हातोटी,रचनेतलं वैविध्य फार चित्तवेधक पण पटकन नाळ जोडणारंही असत.
माझीही नाळ या गोधडी प्रकाराशी कधी जोडली गेली मला कळलंच नाही.
I am just spellbounded by it. दुर्दैवाने आपल्याकडे गोधडी म्हणजे गरीबीशी,दारिद्र्याशी असोशियेटेड आहे. त्यामुळे ही जुने-यांची तुकडा जोडणी म्हटलं की शहरी उच्चभ्रू नाकं मुरडतात. पण मध्यमवर्गीय निदान साड्यांच्या तरी गोधड्या आवर्जून करुनच घेतात.
तर एक साताठ वर्षांपूर्वी अशाच नवरात्रात गोधड्या करुन देणा-या बायका दारावरनं आवाज देत जात होत्या.माझ्याहीकडे भरपूर टाकावू कपडे होते.काही काढले.(जुनी पडदे,सोफा कव्हर्स) ठरवलंच होतं आज यांच्याकडून जाजमासारखी गोधडी हातानेच शिवून घ्यायची आणि तीही नजरेसमोरच. I wanted to see how they do it. एका बाईंशी(खमक्याच) घासाघीस करत बोली केली.कापडं दाखवली.ती पण तयार झाली एकादिवसात गोधडी तयार करुन द्यायला.मोबाईल शिवाय तिने काय इशारे केले,आवाज दिले माहित नाही, दहा मिनिटात अजून त्यांच्याच चार बायका घरात आल्या. आणि पटापटा सुया-दोरे काढून कामालाही लागल्या.एका मोठ्या चौकोनी जाड तुकड्याच्या चारी बाजूंनी एकेकीने बसत, वरच्या पण काठाच्या बाजूने पटापटा रंगीत तुकडे लावायला- हाताने शिवायला (right to left) सुरवात केली.एका बाजूच्या उजव्या कोप-यातनं निघालेला सुई-दोरा तुकडे जोडत पार डाव्या कोप-यात न्यायचा,मग डाव्याबाजूची दुसरी बाई तोच दोरा तिच्याबाजूने चालवणार व तिस-या बाजूच्या पुढच्या बाईला पुढे चालवायला देणार.
थोडक्यात जागेवरन न उठताही त्या चारही बायकांनी ति गोधडी चौकोनातच फिरत फिरत मध्यभागी येत पुर्ण केली. त्यांची मानपाठ एक होत अक्षरशः अंधारुन आलं हे काम संपता संपता. बॉर्डरसाठी मला बाजारातून लंबे-चौडे फॉल्स आणून द्यावे लागले. दोनदा चहा पाजला. But believe me या चारी-पाची जणी होत्या मात्र एकसे एक खतरनाक.
बोलायला-वागायला एकदम तडाखेबंद.
तंबाखूच्या चिमटी गालात.समोरच्याला गुंगवून ठेवणारे डोळेही नजरबंदी करतीलसे. घेरुन घेत अग्रेसिव्हली बोलणं. मी तर इतकी घाबरले की बास. कुठून या बायांना घरात घेतलं असं झालं मला.अक्षरशः भिती वाटली की या दांडग्या बाया मिळून काहीही करु शकतील आपलं. कुणाला कळणारही नाही.भराभर दार-खिडक्या उघडून ठेवल्या.पण मग वॉशरुमलाही जायची भिती वाटायला लागली. तेवढ्यात धोबीण देवासारखी आली.म्हटलं आता इथेच बस,जेवण कर पण मला सोबत कर. तिही थांबली बिचारी.
गोधडी बरी झाली.एकतर घाई आणि मोलं काम. नंतर जरा या समाजाची चौकशी ग्रामीण भागात केली तर समोरच्याला गुंडाळत लुबाडण्यासाठी हा समाज प्रसिद्ध असतो असं कळलं.असो. खरं खोटं माहित नाही.
पण यांच्या स्वतःच्या गोधड्या-वाकळी मात्र खरोखर फारंच सुंदर असतात. They put in their soul in to it. अर्थात कपड्यांची उपलब्धता, व्यक्तीपरत्वे कामाची सफाई, रंगसंगतीची जाण, चिकाटी, कौशल्य या गोष्टी गृहीत धरुनच या गोधड्या-वाकळी देखणं रुप धारण करतात.
मधे गोव्याला गेलो होतो तर तिकडेही गोवा-महाराष्ट्र बॉर्डरवर काही सिद्दी लोकांच्या वसाहती आहेत.हे सिद्दी ओरिजनली अफ्रिकनच आहेत.पण गेल्या अनेक वर्षांपासून भारतातच रहातात.तर त्यांच्याही गोधड्या अगदी बघण्यासारख्या असतात म्हणे.खास चटपटीत अफ्रिकन टच असलेल्या. आपल्याहीकडे प्रांतानुसार लमाण, भटके, अदिवासी, ग्रामीण लोकांच्या गोधड्या सर्वार्थाने वैशिष्ट्यपुर्ण असतात. कुठेही फिरताना रस्त्यांवर,छतावर वाळत घातलेल्या गोधड्या दिसल्या की माझे तर पाय थांबतातच. I am just too obsessed with these stunning godhadies and that magical running stitch.
The first ever password of my (electronic) life was runningstitch only.
हल्ली गोधड्यांचीच पण एकसारख्या तुकड्यांची, सुरचीत, मनमोहक रंगी, सुरेख, मऊमऊ, उबदार क्विल्टसची फैशन आली आहे. पण घरातल्या महिलांनी (आई,आजी,मावशी,काकू..इत्यादी) आपल्या कुटुंबासाठी,लेकरांसाठी,संसारासाठी आहे त्या
जुने-यातून हस्तकारागीरी करत खपून केलेल्या तुकडा-तुकडा गोधड्याची आत्मीय सर त्यांना नाहीच.
एकूणंच गरजेतून निर्माण झालेलं हे गोधडीचं विश्व फार अफाट आहे, सुंदर आहे आणि लोभंस तर आहेच आहे.
तमाम जागतिक स्त्री जातीला एका समान धाग्याने गुंफणा-या, जवळ आणणा-या या अखंडीत
धावदो-यांनी कधी माझ्या ह्रदयाशी अतुट सूत जमवलं मला कळलही नाही.
No comments:
Post a Comment