गिज़ या बदकांच्या जातीला बहुदा राजहंस म्हटलं जातं.अर्थात त्यातही बरेच प्रकार आहेत.
पण साधारण पणे ही तपकिरी-पांढरी दणकट बदकच सगळीकडे पहाण्यात येतात.
गेली १०-१२वर्ष झाली आम्ही सुध्दा हिरण्यला ही बदकं पाळत आहोत.बहुतेक या क्लिपमधली बदकं हा आमच्या इथला दुसरा लॉट असावा.
ही बदकं दिसायला फार सुरेख नसली तरी त्यांच वैशिष्ट्यपुर्ण,ऐटबाज व मोठं आकारमान,कायम कुटुंब काबिल्यासह लुटुलुटू फिरत रहाणं,सफाईदारपणे आल्हाद पोहणं नक्कीच नेत्रसुखद असतं.
यांचा सहवास कितीही लाभू द्या किंवा यांचे खाण्याचे लाड कितीही करा हे कायम आपल्याशी फटकूनं रहातील.कायम कर्कश्य किरकिर करत आपल्यावर अविश्वासच दाखवतील.
एखाद्या शिष्ठ,चौकोनी कुटुंबासारखे.आपण बरं आपलं कुटुंब बरं. दुस-या कुणाशीही यांच लोभाचं, प्रेमाचं देणं घेणं नसतंच.
सकाळ झाली की पिंज-यातन बाहेर काढेपर्यंत करकर करतील.अक्रस्ताळेपणाने पाठलाग करत जेवण मागतील.मग स्वतःच्या सोईप्रमाणे पाणवठ्याजवळ जातील.आपल्याच धुंदीत पोहतील,बुचकूळ्या मारतील,अंग साफ करतील,पंख फडफडवत शुचिर्भुत होऊन मस्त कर..कर..आरोळ्या देत ऊन अंगावर घेत दोनचार मनमौजी फे-या पाण्यातच मारतील.
आलं मनात की त्यांचा लिडर पाण्याबाहेर यायचा आवाजी फतवा काढतो की सगळे पाण्याबाहेर येत लाईनशीर त्याच्यामागे चालू लागतात.आसपासच्या जगाशी त्यांच काही देणंघेणं नसतं.
पण तेच तुम्ही ठराविक अंतरावर त्यांच्या जवळ गेलात तर लगेच लिडर लिड घेत गुरकावतो.वेळ पडल्यास मानेनी सुर मारत अंगावर धावतो.
नाजूक-साजूक,कोमल-हळूवार वागणंच नाही.छोट्या पिल्लाच्या बाबतीत तर सगळेच फार एकजूटीने जागरुक असतात.कदाचित एक-दोनच अंडी देतात म्हणूनही असेल.
नर,मादी दोघांमधेही इतका फुकाचा दिमाख आणि अग्रेसिव्हनेस असतो ना की बापरे.त्यात आणि धष्टपुष्ट नर असेल तर विचारायलाच नको.
चालण्यात मस्तवाल डौल,आवाजात जरब. विणीच्या काळात नजरेत भरलेल्या मादीवर तर इतकी जबरदस्त हुकमत असते की बास रे बास.
हिंडणं,फिरणं,पोहणं,जेवणं सगळं समुहानेच करायचं पण त्या मादीने हे माजावरचे महाशय जिथे जातील तिथ्थेच जायला पाहिजे. हा उतावळा नर ज्या भागात पोहेल त्याच भागात तिने पोहलं पाहिजे.नसता तिच्या पंखांना चोचीचा मार, रागावून आवाज कर आणि तिच्या जवळपासच्या दुस-या नरांना मानेनी जबरदस्त विळखा मार. सॉलीडच दहशत असते या तिसमारख्याची.माद्याही ऊं..कुं..करत याचच ऐकतात. दुसरा नरही धुसफुसतो पण कळपातच रहातो. असाच जोर कोंबड्यांमधेही असतो.न जुमानणा-या माद्यांना चोचीने मारलं जातं.
पण मग हाच शिरजोर नर पोटातल्या अंड्यांमुळे मादीची चाल मंदावली की तिला सोबत करतो.ती अंड्यांवर बसली की तिची देखभाल घेतो.तसच ते छोटंसं भुंड्र पिल्लू लडखडत चालायला लागलं की अगदी उपजत शहाणपणाने सगळे पालक बदकं पिल्लाला मधे घेऊन चालतात.एक संरक्षक कडीच त्याच्या भोवती करतात.आमचं वावर खूप मोकळं आहे.बरेच कुत्री पण आहेत पण आज पर्यंत एकाही बदकाला ईजा झालेली नाही.
आमच्याकडे निसर्गतःच खूप पक्षी-प्राणी आहेत.उपजतपणे त्यांच एकमेकांशी वैर-प्रेम दिसून येतं पण ही बदकं मात्र आजपर्यंत मी कुणाशीही लगट करताना,मैत्र करतांना पाहिली नाहीयेत.
चोच वर करुन हे स्वतःच्याच तो-यात असतात.
तरीपण एक कतारमधे चालणारी आणि अत्यंत लोभसपणे पाण्यात विहरणारी ही ऐटबाज बदकं पहाणं अतिशय नेत्रसुखद अनुभव आहे.
No comments:
Post a Comment