आमचं हिरण्य अगदी नैसर्गिक कोंदणात बसवल्यासारखं आहे.पुर्व-पश्चिम गायरानी डोंगर,उत्तरेला आठशेवर्षापुर्वीचा हेरिटेज तलाव आणि दक्षिणेला मात्र माणसांचा शेजार आणि त्याच वाटेवर जेमतेम एक किलोमीटर अंतरावर दौलताबाद हे गाव आणि किल्ला पण.
डोंगराळ जमीन,भरलेला तलाव आणि जवळच गाव साहजिकच गावच्या जनावरांच्या हक्काच्या पाणवठ्याची जागा म्हणजे हाच आमचा (आप पाश दर्रा) तलाव.
त्यामुळे नियमित चरायला येणा-या गाई-म्हशी-बक-याच्या तावडीतनं आमची आणि गायरानात आम्हीच लावलेली झाडं वाचवणं,जगवणं एक भलतचं त्रासदायक काम आहे.
आणि जी झाडं जनावरं,अवर्षणावर मात करुन जगतातच त्यांना ह्या माकडांच्या माकड चाळ्यांपासून वाचवणं अजून महा कठीण आहे.
या माकडलीलांनी करमणूकही होते पण नुकसानही फार होते.
एक तर माकडं रहातात झुंडीनेच.साधारण २०-२५ माकडं एका झुंडीत असतात.नर कमी,माद्या जास्त,लेकरही खूप.आम्ही विस वर्षांपूर्वी लावलेली झाडं आता उंचीपूरी झाली आहेत.आमच्याकडे तिन-चार प्रशस्त लॉन्सही आहेत.जवळ पाणवठा आहे.आणि धगधगत स्वैपाक घर ही आहे.त्यामुळे जेवण-पाणी,गारवा-उब सगळ्याचीच यांची सोय होते त्यामुळे कितीही हाकला ही मंडळी हिरण्य सोडतंच नाहीत.
धपाधप उड्या मारुन झाडंच काय लाईटचे पोल्सही ही मंडळी खेळता-खेळता मोडून ठेवतात.एकाला पोलवर उडी मारुन मज्जा आली की सगळेजण तोच खेळ करत रहातात, आपण हाकले पर्यंत. लोखंडी टेबलं बडवतात,झोके खेळतात,शिड्या चढतात.ऊन्हाळ्यात गारव्यासाठी लॉनवर पहुडतात तर थंडीत तंदुरवरच्या पत्र्यांवर टेरी शेकत बसतात.म्हणजे कितीही राग आला तरी यांच्या मर्कट लीला बघण्यातही एक गंमत आहे.
झाडांच तर उड्या मारुन खूप नुकसान करतातच पण कडू लिंबाचा कोवळा पाला,गारवेलीची फुलं-पानं,गुलमोहराचा आंबट मोहर तर वरच्यावर फस्त करतात.परत खेळता-खेळता फांद्या,शेंडे मोडतात ते तर वेगळच नुकसान.
आपण कौतुकाने उंचपूरं देखणं महागडं झाडं आवडीने लावावं आणि एका सुप्रभाती या खेळगड्यांनी उड्यामारुन ते तोडून टाकावं हे तर नेहमीचच आहे.
पुर्वी आमची माणसं आम्हाला सांगायची की हे नुकसान माकडांनी केलं म्हणून तर आमचा विश्वास बसायचा नाही.पण जेव्हा आम्हीच आमच्या डोळ्यांनी पाहिलं तेव्हा पटलं की ही माकडं काहीही करु शकतात.
आमची पाळीव श्वानही त्यांच्यावर भुंकतात तर हे शहाणे झाडावर चढून त्यांना वाकूल्या दाखवतात.आता आमच्या श्वानांनीही नाद सोडलाय त्यांचा.काहीही करा सरसर झाडांवर चढून,लपून बसतात.
यांच्या या लीला बघून कधी राग-वैताग येतो,कधी विस्मय वाटतो.पण मग नैसर्गिक ठिकाणी रहाण्याची हीच तर गंमत आणि किंमत आहे हे समजून शक्यतो सहन करतो.
#हिरण्यस्पंदने
No comments:
Post a Comment