का कुणास ठाऊक पण मला अजूनही माझ्या आई-वडिलांच्या मुळ गावाची फार ओढ आहे.खरंतर फार जगावेगळं असं अति रम्य बालपण तिथे व्यतीत केलय असं नाही.पण मला ओढ आहेच ! दोन-चार वर्षातनं तरी त्या गावांना भेटी द्याव्यात सगळ्यांना भेटावं, त्या परिसरात फिरावं असं फार आतून वाटत रहातं.
वडीलांच्या गावी आता सख्ख असं कुणीच नाहीये.एक चुलतभाऊ आणि वहिनी रहातात.तेही आता थकत चाललेत. ते असे पर्यंतच घर असणार आहे तिथे.
आईच्या गावीही आता एकच मामा रहातो.पण त्याचा तरुण मुलगा तिथे वकीली करतो म्हणजे ते घर अजून एका जनरेशनपर्यंत तरी आहे.म्हणजे माझ्या हयातीत पुरं पडेल.
माझ्या वडीलांच गाव नांदेडजवळच्या किनवट परिसरातलं हिमायतनगर. गाव जरा यथातथाचं.
माळरानावरचं,भुरकट मातीचं आणि खारट-जड पाण्याचं.घरची गरीबी त्यामुळे आवार मोठं असलं तरी घरं बेताचच होतं.अर्थात उन्हाळ्यात तिथल्या अंगणात बाजेवर लोळत पाहिलेलं लखलख चांदणं अजूनही मनात भिजतंच आहे.
त्याउलट आईचं कंधार हे गाव. टुमदार टेकड्यांनी वेढलेलं, पोटाशी मोठ्ठ प्राचीन तळं, हाताशी किल्ला आणि वेशी आतले खांद्याला खांदालावून उभे असलेले काळ्याभोर चि-यांचे प्रशस्त मोठे तिन-तिन मजली वाडे.घडीव दगडांच्या अरुंद वळणदार गल्ल्या.
तिथे एकत्र जमलो की साधारण पंधरा शाळकरी भावंड व्हायचो आम्ही.पण आमचं घरंच इतकं मोठ होतं की कधीही फार गोंधळ,गर्दी झाल्यासारखं वाटायचचं नाही.अंदाजे १५-२० हजार स्क्वेअर फुटांची जागा.त्यावरचा तो तिन मजली काळा कभिन्न चिरेबंद वाडा.
प्रवेशासाठी दोन अवजड पितळी फुलपत्तीवाले दरवाजे.अंगण,तुळशीवृंदावन, गाई-बैलं बांधायची जागा, तळमजल्यावर लादनी, न्हाणीघर, आंबवणाची जागा, वत्तल(आंघोळीचं पाणी हंड्यात गरम करायची जागा).
डाव्या-उजव्या बाजूने वरच्या मजल्यावर जायला धारधार,काळ्याभोर चि-यांच्या पाय-या.वर गेलं की मध्यभागी मोठी,कोनाडेयुक्त राबत्याची ओसरी.तिच्या डाव्या हाताला उंच छत असलेलं, चुलीसह स्वैपाकघर आणी उजव्या हाताला वर जायचा लाकडी जिना.कठडा म्हणून पकडायला इथं दोरी होती बहूदा. ओसरीच्या मागच्या बाजूला अंधारी आणि गार बाळांतिणीची खोली आणि कोठीघर.गच्चीवरच्या मजल्यावर दोन्ही (सख्खे-चुलत) वकील आजोबांच्या बैठका.पक्षकारांची खोली.पांढ-या चादरी,लोड,
तक्के,दिवाणी टेबलं, पुस्तकांची कपाटं.या मजल्यावरुन वरच्या गच्चीत जायला परत डावे-उजवे भिंतीतले अगदी अरुंद जिने.या जिन्याने मध्यम बांध्याचा एकच माणूस जाऊ शकत असे.पोटात जिना असलेली ही भिंत पाच फुट रुंद होती.मग खरी गच्ची.तिच्यावर परत एका खोलीसारखी सर्वात उंच गच्ची.तिच्या भिंतीत जरा दुरदूर फरश्या खोचून पाय-या केलेल्या. कुठल्याही आधाराशिवाय त्या पाय-या चढणं आणि उतरणं म्हणजे आमच्यासाठी एक एडेव्हेंचरस खेळच असायचा.
शहरात तिन-चार खोल्यात रहाणारे आम्ही इथे आलो की मोकाट व्हायचो.एकात एक अशा अंधा-या
चि-यांच्या खोल्या,धारधार खांडक्यांच्या पाय-या,
अंधार गुडुप,गारीगार दगडी बाथरुम,अडगळीतली लादणी,हवेशीर ओसरी..धुमाकूळ असायचा नुसता. घरगड्यांबरोबर तळ्यावर पाणी आणायला,गाई-म्हशी हाकायला जायचं.रस्ते,गल्यापण दगडीचं.त्यामुळे कंधार म्हटलं की काळेभोर चिरे आणि त्यावर धडपडून आम्हाला पडलेल्या खोचाच आठवतात. पडलं की खचकन खोचच पडायची असले ते धारीधार पक्के चिरे असत.एकदा माझी एक मुंबईची मावसबहिण दुस-या घरातील वरच्या मजल्यावरील जमिनीवरच्या कठडा नसलेल्या खिडकीसारख्या चौकोनातून धाडकन खाली पडली होती.दातखीळंच बसली होती तिची.या अशा मजली जमिनीतलावरच्या मोकळ्या जागेला काय म्हणतात हे आता तिथे बालपण घालवलेल्या वयस्क मामांनाही आठवत नाहीये.
तर सध्या तिथेच स्थायिक असलेल्या मामाने दहाबारा वर्षांपूर्वी हा शंभर सव्वाशे वर्षांचा जुना वाडा पाडून नव्या पध्दतीचं,त्यांच्या सोईचं घर बांधलं आणि जुने चिरे टाकून दिले.हा वाडा माझ्या आजोबांनी सेकंड हैन्ड विकत घेतला होता.
इकडे जसा जसा आमच्या हिरण्यचा विस्तार वाढत चाललाय तशा आमच्याही कल्पनेलाही अनेक भरा-या फुटताहेत. इथली बांधकामं आम्ही इथलेच दगड-धोंडे वापरुन करतो.आणि उगाचच अवास्तवरित्या चकाचक इमारती बांधायच्या फंदात पडत नाही.
तर गेल्या तिन चार वर्षांपासून मी जरा जुन्या तयार खांडक्यांच्या शोधात होते.हिरण्यवरच्या काही बांधकामात वापरण्यासाठी म्हणून. नवीन खांडक्या बनवून घेणं तर आटोक्यात येण्यासारखं नव्हतं.मग पैठण वगैरे परिसरात जरा चौकशा केल्या.एकतर खांडक्या पटकन मिळतच नाहीत आणि मिळाल्यातरी चि-यांना पुर्वी सारखी सफाई देणारे कारागीरही आता नाहीयेत.कारण सरसकट असे वाडे कुणी बांधतच नाहीत.मधल्या काळात 'जुनं ते सोनं' चा किडा चावलाच होता.नेमकं कंधारला जाणं झालं.परत एकदा जुन्या दगडी गल्ल्या,जुनेच पण ढेपाळलेले टोलेजंग चिरेबंद वाडे नजरेत भरले.मामाच्या वाड्याच्या
चि-यांची अशीच वाट लागलेली लक्षात आली. तरी आजोळच्या घनदाट,काळ्या चि-यांच्या प्रेमापोटी मामाला विचारलंच की इथे कुणाचे शतकी पावसाळे पाहिलेले पण अडगळीत गेलेले चिरे मला मिळतील का ? हिशेबात असतील तर मी विकत घेईन.
चिरे आणि विकत ? आणि ते परत तिनशे किलोमीटर न्यायला काय परवडेल ? कोण आणेल ?
मामाने हसण्यावारी नेलं. पण मी नाद सोडलाच नाही.खरोखर एकेकाळी राष्ट्रकुटांची राजधानी असलेल्या या ऐतिहासिक आणि संपन्न कंधारमधले चिरे फारचं आखीव-रेखीव आणि काळेभोर आहेत.
त्यात इथल्या अनेक सावकारांनी तिन -तिन मजली बरेच इमले बांधून ठेवलेले आहेत.
Seasoned black basalt rock. Absolutely rock solid.
माझ्या आईच्या गावचे चिरे-खांडक्या-दगड-धोंडे.
लेकीचं कौतुक आपल्याकडून व्हावं किंवा आईकडून आपलं कौतुक व्हावं हा योग आम्हा दोघींच्याही भाळी दुर्दैवाने नव्हता.माझा संसार,मुलं आईने काहीही पाहिलं नाही याची एक फार मोठी बोचरी ठसठस माझ्या मनात कायम असते. त्यामुळे कंधारचे चिरे-खांडक्या हिरण्यला न्यायच्याचं आणि आपण तिथे घर बांधलं की थोडाफार तरी या चि-यांचा वापर त्यात करायचाचं ही भावनिक गाठं फारच पक्की झाली. अमलात आणायला कीतीही वेडपट कींवा अव्यवहार्य गोष्ट असली-वाटली तरी विचारांनी जोर पकडला.
कंधारचेच एक मात्तबर राजकारणी आहेत.त्यांची मोठी बहिण आणि माझी आई मैत्रीणी होत्या. नुकताच त्यांनीही त्यांच्या वाड्याचा जुना भाग पाडून नविन बांधला होता.भरपूर चिरे-खांडक्या त्यांच्या शेतात नेऊन टाकल्या होत्या.
माझी आस त्यांना समजली.त्यांनी सगळ्या खांडक्या मला फुकट दिल्या.आपल्या गावच्या पुराण्या चि-यांच कुणाला इतकं अप्रुप आणि तेही अशा कारणांमुळे आहे याचच त्यांना कौतुक वाटलं.
साठ-सत्तर टन खांडक्या असाव्यात.हे एवढं अवजड सामान आणणार कोण ? औरंगाबादहून नांदेडला सामान पोहंचवून रिकामे परतणारे ट्रक्स शोधले.
कुरीयर,ट्रांसपोर्टवाले शोधले.खांडक्या म्हटलं की सगळे हसायचेच आणि अवाजवी दर सांगायचे.
कारण समोरच्याची अतिरेकी हौस कळतेना. पाऊस म्हणून,साखरेच गळीप म्हणून ट्रक मिळेस्तवर दोन वर्ष अशीच गेली.
शेवटी मामाने आणि नलगेकाकांनीच खटपट करुन,वजन वापरुन तिथलाच ट्रक मिळवला आणि या उन्हाळ्यात पहिला लॉट म्हणून विस टन खांडक्या हिरण्यला एकदाच्या पोहोंचल्या.
दरम्यानच्या काळात याच खटपटीसाठी माझ्याही नांदेड,कंधारला चार-पाच खेपा झाल्या होत्या त्यामुळे सगळ्या नातलगांना या खटाटोपाची बातमी मिळालीच होती.
तेही वारंवार विचारायचे काय झालं खांडक्याच म्हणून.
खांडक्या आल्या ख-या पण त्याच दडपणंच आलं. आता व्यवहारात नसलेल्या बारा-अठरा इंच लांब खांडक्या आपल्या नेहमीच्या सहा -नऊ इंची भिंतीत सामावून घेणं आणि तसं चोख काम करणारे कारागीरही मिळवणं ही जबाबदारी आता यजमानांच्या गळ्यात टाकून मी मोकळी झाली आहे. बघू काय होते ते पुढे.
मागच्या महिन्यात आम्ही दोघी-तिघीच मावसबहिणी आणि कुटुंबीय हिरण्यला जमलो होतो तर त्यांना या कंधारी खांडक्या कौतुकाने दाखवल्या.पावसात भिजल्यामुळे चकाकणा-या काळ्याभोर घडीव खांडक्या आणि त्यावर तरारलेल्या कोवळपोपटी रानवेली.जुन्या आठवणी काढत सगळ्यांबरोबर या खांडक्याचाही सन्मान करत फोटो काढतांना 'मातीची ओढ' या शब्दाची गहरी रुजवाई ख-या अर्थाने कळली.
मस्त!
ReplyDelete