साधारणतः कधीही, कुठलही घर बुक करायला, विकत घ्यायला जा. जागेची, बंगल्याची, फ्लेटची महत्ता सांगताना बिल्डरांचा एक हुकमी परवलीचा शब्द असतो.आसपास सगळा क्रिम क्लास आहे बरका.
उत्तरेला ही कॉलनी,पश्चिमेला ते बंगले..अमक्याने इथेच बंगला बांधलाय..तमके इंडस्ट्रियालिस्ट इथेच मागे रहातात.पुर्वेला मॉल आहे तर दक्षिणेला मल्टी प्लेक्स, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल...वगैरे..वगैरे...
रहाणारेही उच्चभ्रू आणि त्यांचे गणगोत,मित्र परिवारही उच्चभ्रूच असणारं. थोडक्यात आपला खांदा उच्चभ्रुंच्याच खांद्याला लागणार.
Its called greatness by association or acquaintance.
म्हटलं तर रोडवर,म्हटलं तर शांत,उत्तम बांधकाम,
वाजवी दर,झटपट ताबा..इत्यादीच्या पसा-यात सगळ्यात जास्त भाव कोण खाऊन जात असेल तर गावातला,शहरातला सगळा क्रिमी क्लास इथेच राहतो हे बंदी नाणं.
एका ठराविक आर्थिक स्तरातील वसाहत असेल तर काही गरजेच्या सुविधा बिनबोभाट जरी मिळत असल्या तरी कोणीतरी 'बडी' पण 'ति-हाईत'(प्रसिद्ध-श्रीमंत आणि आपला सध्यातरी दुरान्वयेही संबंध नसलेली)व्यक्ती आपल्या घराच्या आसपास रहाते याचा आपल्याला काय फायदा होतो बरं ? विशेषतः घर बुक करतानाचं,त्या बड्या कुटुंबाची ओळखही नसताना ?
पण होतो मनावर परिणाम आणि उगाचच आपण उन्नतीची एक पायरी चढून गेल्याचा फिल येतो.
आपले शेजारी-पाजारी सोकॉल्ड उच्चभ्रू आहेत याची बरीच वाढीव किंमतही मोजायला लोकं आनंदाने तयार असतात. बिल्डर लोकांचा तर USP(युनिक सेलिंग पॉइंट)असतो
बहुतांशपणे बंगला कल्चर खूप चिरेबंद,निस्तेज आणि मोनोटोनस असतं .
ही घरं कधीही रसरसलेली जिवंत वाटतं नाही. घराला सुध्दा एक उर असतो आणि या बंगल्यांचा उर कधीच धपापताना जाणवत नाही. उलट एक दडपणी शांतताच असते अशा घरात-परिसरात.
त्या उलट आपल्यापेक्षा कमी आर्थिक स्तरातली घरं, कुटुंब, माणसं फार जिव्हाळा लावतात. रोजचं जगणं ख-या अर्थाने समृध्द करतात.
त्यांची वरच्या स्तरात जायची धडपड,कष्ट आणि जिद्द फार लोभस असते.छोटी-छोटी घरं..त्यातलं त्यांच एकजूटीने जगणं..भांडणं..मुख्य म्हणजे कुणाचाही मुलाहिजा न ठेवता आयुष्याला थेट भिडणं.एक चैतन्यच सळसळत असतं अशा वस्तीत.
अगदी दुरस्थपणे जरी पाहिलं तरी स्केचिंगला, पेंटिंगला, लिखाणाला, विचारांना भरपूर खाद्य पुरवतात ही घरं-माणसं.
आणि हो..प्रत्येकाचा क्रिम लेयर वेगळा.
माळरानावरचे झोपडीचं स्वप्न बघतात.खोपटीवाले पत्री खोलीची आस धरतात.चाळवाले ब्लॉकसाठी झुरतात. ब्लॉकवाले बंगल्यासाठी धडपडतात.तर ऐसपैस बंगलेवाले माणसांसाठी तळमळतात.
सप्तपाताळासारखा स्वर्गही सात पाय-यांचाच असतो म्हणतात.पण हा सामाजिक गैरसमजुतीचा,
धाव..धाव..धावायला लावणारा जिना मात्र न संपणारा आहे हे मात्र खरं.
No comments:
Post a Comment