Wednesday, 16 August 2017

काळीआई.

आमच्या हिरण्यला मुक्त वावणारे बरेच कुत्रे आहेत.काही घरचे काही हितसंबंधीनी आणून सोडलेले.तर काही कुत्र्या आणि काही कुत्रे.सावन का महिना आणि ह्यांची एकमेकांशी भांडणं सुरु होतात.त्यात आमचीच हिरण्यवरची वाईल्ड व्हिनस आणि घरी येऊन जाऊन असलेली ब्लश या दोघींमधुन आडवा विस्तु जात नाही.खुप भांडतात,चावाचावी करतात.
अत्यंत चपळ, काटक, काळी व्हिनस, लडदू आणि लाडावलेल्या पांढ-या ब्लशला पुरुन उरते.जखमी करते.मग रितसर ब्लशला घरी आणून औषधोपचार करुन परत पाठवलं जातं.परत काही महिन्यांनी हेच नाटक होतं. आता तर श्रावण संपत आलाय,भाद्रपदाचे वेध लागलेत.तमाम श्वानसेना उफाळलेली आहे.

तर परवा परत एकदा ब्लश जखमी झाली.तिरीमिरीत चिरंजीवांनी तिला घरी आणलं.उपचार केले.पण काल १५ ऑगस्ट म्हणून आम्ही सगळेच दिवसभर हिरण्यलाच होतो.त्यामुळे दुध नाही,स्वैपाक नाही.तिचं रात्रीचं जेवण हिरण्यवरनंच आणलं पण श्वान प्रेमापोटी चिरंजीवांनी घरातलं असलं-नसलं सगळं दुध तिला देऊन टाकलं.त्यामुळे भल्यासकाळी फिरायला-पळायला जाणा-या किंवा बागेत बसून वाफाळता चहा घेत फेसबूकवर चार फुलं चढवणा-या मला दुध आणायला पळावं लागलं.गेलोच आहेत तर तिच्याच साठी अंडी पण आणावीत म्हटलं तर नेहमी अंडी विकणारे श्रावण म्हणून अंडी विकत नाहीयेत म्हणे.गेल्यासरशी अजून पुढे गेले तर मुस्लिम वस्तीतलं घरातूनंच चालवलं जाणा-या दुकानात अंडी मिळाली.

बाईच होत्या गल्ल्यावर.रोजचं सकाळी लागणारं अतिशय जुजबी सामान फुटकळ स्वरुपात उपलब्ध होतं.
जि-या-मि-यांच्या पुरचुंड्या,ब्रेड,बिस्किट्स इ.
तर एका पाऊचमधे राखाडी दगडांसारखे तुकडे होते.मला वाटलं मिसरी आहे कारण मी मिसरी अजून पाहिली नाहीये.
हे काय म्हणून विचारलं तर म्हणे मिट्टी.
मिट्टी ? वो कौन लेता है और क्युं ?
खाने को ले जाते.वो औरताको दिन गये की उनको लगती ये मिट्टी खाने को.बहोत मन करता है उनका मन मिट्टी खाने को.
वो लेके जाते ये मिट्टी.

एकदम आठवलं आम्ही शाळेत असताना उन्हाळी सुट्ट्या लागल्या की आधीच भरुन ठेवलेले गहू आई निवडायला काढायची.लंब्या चौड्या नवरसपुर्ण कथा सांगत,आम्हाला गुंगवत २-३ दिवसात पोतेच्या पोते गहू निवडून घ्यायची.तेव्हा हे गहू निवडतांना त्यातले काळे,वाळके मातीचे खडे आम्हीपण गटकवायचो.खुटखुटीत वाळलेला मातीखडा तोंडात भिजला की खरंच फार छान लागायचा.मग आई सांगायची तिला पण गरोदरपणात माती खावीशी वाटायची आणि ती पण गव्हातले खडे खायची. पाटी-पेन्सिलच्या दिवसात आम्ही पेन्सिलीही खायचो.फारंच मस्तच लागायच्या.
म्हणजे आत्ताही कधी एखादा तुकडा मिळाला तर मी गटकावतेच.

काही जमातींमधे माती अंगाला लावून रोजची आंघोळ करतात किंवा अदिवासी स्त्रिया केस धुवायला मातीच वापरतात.म्हणून तर त्यांचे केस केस काळे रहात असतील का ?
गरोदरपणात माती खावीशी वाटणं आणि खरोखरीच ती माती खाणं इथेच, गर्भात असतानाच मला वाटतं मातृभुभीशी आपली नाळ जोडली जात असावी.म्हणून का तिला काळी आई म्हणतात ?
आणि म्हणूनच का उत्तर आयुष्यात मातृभुमीची अनिवार ओढ आपल्याला लागते ?

स्त्री-पुरुषांमधल्या अनेक अनाकलनीय फरकांमधला हा एक अत्यंत गर्भित फरक मला फारच वंदनीय वाटतो.
मातृत्वाची चाहूल लागल्यावर प्रकर्षाने काळीमाती खावीशी वाटणं,आणि खाणं आणि प्रसव वेदनांनंतर सगळं जग विसरुन आपल्या बाळाला छातीशी घेणं...I think it's an utmost divine phenomenon !

Unfortunatly guys you will never understand what you are deprived of !

No comments:

Post a Comment