साधारण ७२-७३-७४ चे उन्हाळे.आम्ही दोघी शाळकरी बहिणी सलगपणे उन्हाळ्यात मुंबईत सुट्ट्याम्हणून गेलेलो.माझी सगळ्यात मोठी मावशी तिथे रहायची.काका नोसिलमधे इंजिनियर होते.तेव्हा ठाणे-रबाळे भागात नोसिल कॉलनी म्हणजे प्रस्थ असावं.
आणि का नसणार ?
अत्यंत टुमदार, देखणी कॉलनी.बैठे,उतरत्या छपरांची वेस्टर्न टाईपची पंधरा घरं.एका इमारतीत दोन कुटुंब रहायची.दोन मजली अगदी प्रशस्त घरं.पुढे बाग,मागे लॉन,बाजूला किचन गार्डन.खाली मोठ्ठा हॉल,
किचन,स्टोअर,सर्वंट्स बाथरुम,गैरेज,वरच्या मजल्यावर दोन का तीन एटेच्ड बेडरुम्स,बाल्कन्या.
चौकोनी परिसराच्या तीन्ही बाजूंनी ही अशी आखीव-रेखीव ब्रिटिश घरं.त्यांच्यासमोरुन जाणारा कॉलनीतलाच स्वच्छ रोड,बाजूने झाडं-झाडी.
मधल्या मैदानी चौकोनात स्विमिंगपूल,फिल्टरेशन टैंक,कारंज, कल्ब हाऊस..
त्यामधे सिनेमा-टिव्ही रुम,प्रशस्त हिरवळ,झाडं वगैरे.
अगदी सिनेमातल्या सारखंच.
इथे रहाणारे कुटुंबही अठरापगड जाती-धर्माचे.
इंग्लिश,डच,गुजराती,पंजाबी,दक्षिणी,मुसलमान,
ख्रिश्चन, बोहरी,मराठी,मराठे अशी दणदणीत खिचडी होती.मराठी घरं तिन-चारंच.त्यात आमच्या मावशीच एक घर.
मराठवाड्यातल्या सरकारी घरातल्या आम्हा शाळकरी बहिणींना हे घर,कॉलनी,परिसर,माणसं बघून अक्षरशः दिपायला झालं.
आमच्या चार घरांच मिळून हे एक घर.बाग-बगीचा,
गैरेज वेगळच.
दोन्ही मजल्यांवर फोन.
कमोड्स,रेग्झीनचे पडदे,बसायला स्टुल असलेली,
चोवीस तास पाणी असलेली, लैचची दारं असलेली उंचीपुरी,उजेडी बाथरुम्स तर स्वप्नवत वाटायची.
तसचं ते स्वैपाक घर.फ्रिज,कुकिंग रेंज,चकाचक ओटा,सिंक,फरश्या,क्रोकरी,एकसारख्या भरलेल्या बरण्या,डब्यांनी सजलेलं स्टोअर,येऊन जाऊन
असणा-या दोन-तिन कामवाल्या.
काकांना घ्यायला सकाळीच पांढरी ऐंबेसेडर यायची.सकाळी गेले की ते संध्याकाळीच परतत.
दिवसभर घरात,गैरेजमधे हुंदडायच आणि संध्याकाळी क्लब हाऊसमधे जायचं.
झाडून सगळा कारभार इंग्रजीत असायचा.फक्त कामवाल्या आणि मराठी कुटुंबात थोडंफार मराठी ऐकू यायचं.आमचं इंग्रजी नसल्यागतच जेमतेम.त्यामुळे दुपारी सावलीत खेळायला जेव्हा इतर देशी-परदेशी मुलं यायची तेव्हा आम्हा बहिणींची फार पंचाईत व्हायची.विशेषतः पत्ते खेळताना.पत्ते खेळण्यात,
लावण्यात,हात करण्यात,खाणाखुणा करुन हुकूम कळवण्यात आम्ही तरबेज होतोच,पण कधी भांडायची वेळ आलीच तर आमची पार बोलतीच बंद व्हायची.
कानकोंड करणारे एक दोन समर प्रसंगही आलेले.पण आमची खेळण्यातली हुशारी बघून आमचा मावसभाऊ-बहिण व इतर मराठी मुलं टिममधे आम्हालाच आधीे मागून घ्यायचे.
हिरिरीने जिंकायचेहीे आणि वेळ पडल्यास आमची मराठी बाजू समजून घेत इंग्लिशमधे कडाडून भांडायचे.थोडक्यात आम्हाला इंग्लिश संभाषण जरी आलं नाही तरी जो तो आमचा वकूब ओळखू लागला.
मला वाटतं व्यापार,ल्युडो,चायनिज चेकर हे बैठे खेळ आम्ही इथेच पहिल्यांदा पाहिले आणि खेळलो पण.
भरपूर खेळूनही उरलेल्या वेळात भातुकली खेळायचो.
काड्यापेट्यांचे तराजू.लुटुपुटुच्या भाज्या आणणं.
स्वैपाक करणं आणि मग श्रम परिहार करणं.
दुध पावडरपासून दुध तयार करायचं.रंगीत सरबतं करायची.त्यात बर्फाचे चौकोनी खडे टाकायचे.मावशीने जेली,कस्टर्ड करुन ठेवलेलंच असायचं.खरी भुक लागली तर ब्रेड,बटर,जैम खायचा.नजर टाकू ती गोष्ट आणि वस्तू नविन होती आमच्यासाठी.मला अजूनही कधी दमट हवेतला ब्रेड-बटरचा वास आला की नोसिलचे दिवस आठवतात.
ब्रेडबॉक्स, बटर ट्रे, सॉस, चिज्, फ्रिज, आईस ट्रे,
रंगीत बर्फ,किटली,टिकोझी,मिक्सर या सगळ्या गोष्टी आम्ही पहिल्यांदाच इथे पाहिल्या.
मावशीच आपल्या बहिणींवर आणि भाचरांवर नितांत प्रेम.आपल्या बहिणींना-भाच्यांना या जगाची ओळख करुन द्यायची तिची फार धडपड असायची.कुठेही आम्हाला पुढाकाराने न्यायची,समजवायची, शिकवायची.
शिकवणं म्हटलं की तो सिनेमा स्टाईलचा स्विमिंगपुल आठवतो.बेबी पुल वेगळा,शेजारी मोठा पुल,थोडं दूर मोठं फिल्टरेशनचं धुंवाधार कारंज.बाजूला बदामाची झाडं,त्याखाली टेबल खुर्च्या मांडलेल्या असायच्या.
शनिवार-रविवार निवांत असायचे लोकं.
अमराठी,परदेशी महिला-पुरुष पोहायचे,मधूनंच उठून टेबलापाशी जाऊन ब्रिजचा डाव खेळून यायचे.(बहूदा बियरही पित असावेत)
पुरुषांबरोबर स्विमिंग कॉस्ट्युम(बिकिनी)घालून हसत खेळत पोहणा-या,शॉर्टस् घालून,गॉगल घालून, सिगारेटस ओढत एकमेकांची मस्करी करत पत्त्यांचे डाव जिंकणा-या 'मोना डार्लिंग'सारख्या महिला बघून तर आम्ही स्तंभितच झालो.इथे शशीकपूरच्या 'इंन्सानियत' या चित्रपटांच शुटिंगही झालेलं आहे.
हा चित्रपट औरंगाबादला बघताना आम्ही अक्षरशः रोमांचित झालो होतो.
काका मावशी पण पोहायचे.भावंड पण पोहायची.
आम्हाला कॉस्ट्युम कसे मिळाले,कोणी दिले आठवत नाही पण तिथे जी मी या लोकांकडून ब्रेस्ट स्ट्रोक शिकले तो आज तागायत नाही विसरले.
क्लबहाऊसमधे दर बुधवारी,शनिवारी संध्याकाळी सिनेमा,कार्टून मुव्हीज दाखवायचे.बरेचदा इंग्लिश सिनेमे असायचे.I still remember one specific train shot.I think it was a war movie.
आठवड्यातला का महिन्यातला एक दिवस मोठ्यांसाठी असायचा.थोडे फार एडल्ड मुव्हीज दाखवत असत. मग तेव्हा आम्हा पोरांना सगळे घरी पिटाळत.
स्मिता पाटीलला टिव्हीवरुन बातम्या देताना बहूदा इथेच पहिल्यांदा पाहिलं वाटतं.
इथे कधीतरी डान्स पार्टीजही होत असत,पण त्या पहायचा योग आला नाही.
कधी विशेष दिवशी स्नैक्स पण असत रिफ्रेशमेंट म्हणून.मुलांना रांगेत उभं राहून हैमबर्गर्स मिळायचे.
आम्ही काय ? सगळ्यांनी खाल्लं आम्हीही खाल्लं.
खरतरं देणारा बहूदा व्हेज-नॉन व्हेज विचारत असावा.
पण आमची त्या वातावरणात इतकी दातखीळ बसायची की जे दिलं ते खाल्लं.
इतक्यात कुणीतरी ओरडलं पोर्क..पोर्क..
थुंका..थुंका..आम्हाला काय थुंका म्हटलं, थुंकल.
मग कळलं त्यात पोर्क म्हणजे डुकराच मांस.
ई..शी...डुक्कर ? याक..थु !
तमाम मराठवाडी (हागनदारीतली) डुकरं माझ्या डोळ्यासमोर तरळून गेली.असो.
कॉलनीत कुणाला यायच असलं की आधी गेट पास बनायचा,मग घरी फोन जायचा मगच गाडी,रिक्षा आत सोडली जायची.आई तर कुणी विश्वासू मुंबईला जाणारं मिळालं की आम्हा दोघींना पाठवून द्यायची.येतांनाही अशीच सोय पाहिली जायची.त्यामुळे इथला मुक्काम भरपूर लांबायचा.
मग सुट्टीच्या दिवशी काका आम्हाला मुंबई दाखवून आणायचे.गेट वे पाहिल्याच मुळीच आठवत नाही पण एयरपोर्ट पाहिल्याचं ठळक आठवतंय.आजच्या औरंगाबादच्या विमानतळासारखंच तेव्हांच मुंबईच विमानतळ होतं.सहजपणे इमारतीच्या गच्चीवरनं विमानं बघता यायची.गांधी मार्केटही फार थोडसं आठवतयं,पण तिथून विकत घेतलेले स्टायलिश हाय हिल्स आणि नेलपेंट मात्र अजूनही मनात घर करुन आहेत.राजेश खन्नाच घरही दुरुन पाहिलेलं आठवतय.पण ते या नोसिलच्या वास्तव्यात का ते आठवत नाही.
मुंबईहून परतल्यावर हा अत्यंत रोचक अनुभव तिखट-मीठ लावून मराठवाडी मैत्रीणींना सांगितला जाई.
एकजण तर राजेशखन्ना म्हटलं की अगदी थरारुन जायची.मग काय त्याच घर,लेटेस्ट सिनेमे,टिव्ही म्हटलं की एकदम वडवानलंच पेटायचा.त्यामुळे राजेश खन्ना गेला तेव्हा सगळ्यात आधी मला तीच आठवली.आणि आज पण हे जे लिखाण केलय तेही राजेश खन्नामुळे.
कधीचा विषय डोक्यात घोळत होता.उगाच कंटाळा करत होते.तर आज राजेश खन्नाची पुण्यतिथी(?) म्हटलं आता लिहूनंच टाकू एकदाचं मनात घोळणारं.
तर एकदा नोसिलमधेच फ्रिजच दार उघडताना माझ्या हातून काचेची बाटली पडली,फुटली.पायाच्या बोटाला लागलं.
भळभळ रक्त जाऊ लागलं.मावशीने बर्फ लावला,हळद लावली तरी रक्त थांबेचना.मग मात्र मावशी घाबरली.नोसिलचे एक इन हाऊस क्लिनीक,डॉक्टर होते.त्यांना फोन केला.त्यांनी तातडीने यायला सांगितलं.मावशीला घर सोडणं शक्य नव्हतं,मग माझी माझ्याच एवढी मावस बहिण आणि मी अशा दोघी निघालो.कंपनीची गाडी बोलवावी लागली.
परमिशन,गेटपास असले सोपस्कार करुन कंपनी परिसरातील क्लिनीकमधे आम्ही गेलो.
कंपनीचा कारभार.सगळं जिवघेणं शांत,त्यात इंग्रजी मुस्कटदाबी, पायाला घरगुती डागी,पट्ट्या अशा अवतारात आम्ही दोघीही बावरुन गेलो.
बहिणही गोंधळलेली.गोरेगोमटे,बाळसेदार डॉक्टर वधवानी माझ्याशी इंग्लिशमधे बोलायला लागले,प्रश्न विचारायला लागले तर मला काही समजेना,त्यामुळे उत्तरही देता येईना.बरं मावसबहिणीलाही इंग्रजी येत असलं तरी झालेल्या जखमे विषयी,रक्त स्रावाविषयी तिलाही निट काही सांगता येईना.जरुरी पुरता संवाद साधला,ड्रेसिंग केलं,औषधं घेतली आणि गाडीतून परत तीच यातायात करत परतलो.मला वाटतं नंतरही एकदा ड्रेसिंगला जाऊन आलो आम्ही पण तेव्हा बहूदा माझी सख्खी बहिण बरोबर असावी.कारण तेंव्हाच्या डोंगराळ,एकांतातल्या कंपनी परिसरातून गाडीतून येतांना कॉलनी,घर दिसे पर्यंत जीवात जीव नव्हता.
असच एकदा तिथे मृत्युंजय पुस्तक हाती लागलं.इतकी रमले मी त्या पुस्तकात की काही विचारायची सोय नाही.एकीकडे वाचन सुरु आणि दुसरीकडे बहूदा जलजीरा खाणं सुरु. मग काय पोट बिघडलं.पण डॉक्टर म्हटलं की तो ताणाखालचा कंपनीच्या गाडीतून प्रवास आणि असल्या तब्येतीची इंग्रजीत चकमक.
भिक नको पण कुत्रा आवर सारखी परिस्थिती झालेली.निभावलं तसंच.
पण काही म्हणा तिथे शिकलेल्या ब्रेस्ट स्ट्रोकमुळे मी पाण्यात कदाचित वाचणार नाही पण बुडायच्या आधी निश्चितच जीव वाचवायची जीव खाऊन धडपड करेन आणि भले ही इंग्रजीचा वेताळ अजूनही मानगुटीवर आहे तरी पण डोनाल्ड ट्रंपच काय अडगळीतल्या बिल क्लिंटनलाही आपली How do you do sir ?
असं म्हणून यायची जिगरबाज तयारी आहे.😉
No comments:
Post a Comment