Saturday, 15 July 2017

गुलाबजाम आणि मुलं.

नजाकतीने गुलाबजाम करणं म्हणजे अगदी संसारातली आपली मुलं निगुतीने वाढवण्यासारखंच आहे.

कसं ते सांगते.
सर्वप्रथम पुणेरी नवरा गाठावा,दुर्दैवाने ते न जमल्यास निदान मंडळी पुणे भक्त असणारी तरी असावीत म्हणजे मग चितळ्यांची महती गात चितळे गुलाबजाम रेडी मिक्स बिनदिक्कत वापरता येते.
हलक्या हाताने,थोड्याशा धाकाने(चितळ्यांनी सांगितल्याप्रमाणे) ती पावडर पाण्याने तिंबावी.घाटी लोकांप्रमाणे धापड-धपड,मारामारी करु नये.हातावर साजूकच तुप घेऊन कोकणस्थी मापाचे सुबक लंबगोल करावेत.शिस्तीत मांडावेत म्हणजे हिशोबाने बिनचूक मोजता येतात.(मुलं असो गुलाबजाम असो शिस्तीला पर्याय नाही)म्हणजे मग नंतर हे गुलाबजाम करणं परवडतं का नाही या विषयी सामुहिक चर्चेत तडफेने भाग घेता येतो.आणि फेसबूकवरही उजळमाथ्याने आपलं कर्तृत्व with data मिरवता येतं ते वेगळेच.
खाल्ल्या मराठवाडी मिठाला जागत स्वाभिमानाने कढईत डालडाच गरम करायला ठेवावा,साजूक तुप वापरु नये.(हो ना, उगाच ऋण काढून सण करण्यात काय अर्थ आहे.आपण आपलं अंथरुण पाहून हातपाय पसरावेत.)डोळ्यात तेल घालून तुपाच्या तापमानाकडे लक्ष ठेवावं नसता गुलाबजाम ख-या अर्थाने जामुनी होतील.
Ultimately colour matters ! हो का नाई ?
मग ताटातले गुलाबजाम हलकेच तुपात खेळायला-तळायला सोडावेत.
मंद गैसवर तेही बेटे खळखळात तुपात बागडत,डुंबत रहातात.फार दाटी करु नये.(हम दो,हमारे दो सारखं)पाण्याची उडवाउडवी खेळल्यासारखं तुप गुलाबजामांवर उडवत रहावं.थोडसं लक्ष,थोडसं दुर्लक्ष करत मुलं वाढवतो तसं.
मस्त गुलबट झाले की आता खेळणं बास झालं असं म्हणत थोडे निथळून घ्यावेत.
मग Times of indiaच्याच पेपरवर काढून घ्यावेत.कुठलाही गावठी-मराठी पेपर वापरु नये.(स्वहितासाठी मातृभाषेचा दुराभिमान जरा बाजूला ठेवावा.)
दुस-या बर्नरवर चितळ्यांनी सांगितल्याप्रमाणेच स्टिलच्या पातेल्यात साखरेचा पाक आधीच करुन ठेवावा.(एकतारी-दोनतारी हा घाटी-देशस्थी घोळ घालू नये)
आपल्या आवडीप्रमाणे पाकात वेलदोडा पुड,
केशरकाड्या, गावठी गुलाबपाकळ्या टाकणे.चुकूनही हॉलंडचे परकीय गुलाब वापरु नका.चिनी तर नाहीच नाही.
तळून निथळलेले गुलाबजाम कोमट पाकात मुक्तपणे टाकावेत.अधूनमधून पाकात घोळावेत.मग तेही मस्तपैकी पाक पितात आणि तुडूंब सैलावत बाळसेदार होतात.इतकी लोभसं दिसतात ना हे तब्येतदार,राजस गुलाबजाम कि आपलीच का ही मुलं सॉरी गुलाबजाम असा प्रश्न आपल्यालाच पडतो तर बाकीच्यांची काय कथा ?
मग आमंत्रितांना सुशिक्षित गृहकृत्यदक्षतेने दोन-दोन गुलाबजाम अगत्याने द्यावेत.परत एका गुलाबजामचा आग्रह त्रिवार करावा पण नंतर मात्र गुलाबजामचा डब्बा आत ठेवून द्यावा.
हो ना पाहुण्यात असलाच एखादा वैदर्भिय तर देना बे..देना बे करत डब्बा सुध्दा पळवतील.
व-हाड्यांचा हल्ली काही नेम नाही.गोडीगुलाबीने कुठलाही डाव साधतात बेटे.
असो !

No comments:

Post a Comment