Tuesday, 4 July 2017

पाळंमुळं.

साधारण पंधरा वर्षापूर्वी इंदोर,उज्जैन,मांडू,महेश्वर,
ओंकारेश्वरला फिरायला गेलो होतो.मुलं लहान होती त्यामुळे त्यांना रुचेल अशीच झटपट ट्रिप ऑरगनाइज केली.
एका दिवसात इंदोरहून जाऊन-येऊन उज्जैनला गेलो.मराठवाड्यासारखाच कोरडा,खडकाळ,पिवळट-तपकिरी परिसर.शेकड्यांनी शंकराची,शिवाची,
कालभैरवाची मंदिरं.
कमी-अधिक वैशिष्ट्ये असलेली.
एका मंदिरात भैरवाला दारु भोग म्हणून चढवतात.
पुजारी बाप-लेकं तांबारलेले तरीही आत बाहेर मस्त गर्दी.असो,आत्ताचा विषय तो नाही.

उज्जैनचा पूर्ण परिसर गोरखचिंचेच्या अवाढव्य झाडांनी भरलेला आहे.गोरखचिंच म्हणजे Baobab tree.
मदागस्करचं राष्ट्रीय झाड.
भारतात गोरखनाथांनी या झाडाला ठिकठिकाणी रुजवले म्हणून त्याला गोरखचिंच म्हणतात म्हणे.
इतकी उंचीपूरी, डेरेदार अवाढव्य झाडं बघून खरंच हरखून जायला होतं.त्यात तिथले माहितगार लोकं अजूनच रंजक माहिती सांगून आपल्याला चकीत करतात.एक गोरखचिंचेच झाड तर चांदोबाच्या विक्रम आणि वेताळ या रोचक कथेतलंच आहे म्हणे.
वेताळाने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर राजा विक्रमादित्याने चुकीचे दिलं की  राजाच्या पाठीवरचं प्रेत(वेताळ)
तात्काळ ज्या झाडावर परत लटकते ते झाड म्हणजे हे गोरखचिंचेच झाडं.मुलांना फार कळलं नाही,पण आम्हा दोघांना आमचं बालपण,चांदोबा आणि त्यातला तो न थकणारा राजा विक्रम आणि राजाला कोंडीत पकडणारा वेताळ आणि त्यांच्या अगणित कथा मात्र आठवल्या.

पुढे रस्त्यांवर गोरखचिंचेची फळं(चिंचा)पण विकायला होती.कौतुकाने घेतलं एक.थोडं खाल्लं पण.
एकदम पिठूळ आणि बेताचीच आंबट.
फळ मात्र जपूनच आणलं घरी.
तसही वाळलेलंच होतं.बिया काढल्या हिरण्यच्या नर्सरीत रुजवल्या.त्याही माहेरी आल्यासारख्या आसुसून रुजल्या.

जसा मावळा प्रांत गोरखचिंचेच्या झाडांसाठी लोकप्रिय आहे तसाच औरंगाबादचा परिसर सुद्धा या महाकाय झाडांसाठी प्रसिद्ध आहे.आजच्या क्षणी शहरात दहा-बारा तरुण आणि अजूनही वाढणारीच झाडं आहेत.
हे झाडं फार हळूहळू वाढतं.त्यामुळे कायम वाढतच असतं आणि खूप दिर्घायुषी आहे हे झाड.दहा-पंधरा जणांच्या फैलावलेल्या हातांचा विस्तारातही मावणार नाही इतकं रुंद खोड होतं त्याचं.उंचीही खुप असते पण प्रचंड रुंदीमुळे झाड थोडंस बैठ वाटतं.
बॉटनिकल आणि लोकप्रिय कथांमधलं कौतुक ऐकून हिरण्यला ही बियांपासून रुजलेली झाडं लावली.काही रस्त्यावर लावली.तसं हे लहानखोरं झाडही चिवट व भक्कम असतं,त्यामुळे दोन वर्ष सगळीच झाडं टिकली.पण दुष्काळी उन्हाळ्यात त्यातली काही मेली.
पण रस्त्यापासच्या दोन झाडांनी आमचं दुर्लक्ष आणि अवर्षणाशी जबरी टक्कर देत आपली पाळंमुळं छान रुजवली आहेत. जणू काही त्यांचच अंगण आहे हे.
आमच्या परिसरात या पावसाळ्यातला पहिला फेरफटका मारताना जेमतेम दोनच फुटांची ही झाडं तरारलेली पाहिली आणि जीव अगदी आळूमाळू झाला.माझ्या उर्वरीत हयातीत अजून पंधरा-विस फुट वाढले तरी खूप झालं.पण पुढच्या अनेक पिढ्यांना ही आम्ही लावलेली अप्रुपाची झाडं विसावा देतील या कल्पनेनीच रोमांचित झाले.तसं सगळ्याच वृक्ष वेलींच कौतुक असत पण या पौराणिक झाडांना पुन्हा नव्याने आपल्या परिसरात रुजवण्यात आपलाही हातभार लागलाय या कल्पनेनेही नाही म्हटलं तरी इमॉर्टल झाल्याचा फिल येतोय.

काय योग आणि भाग्य असत एकेका झाडाचं,परिसराचं आणि माणसांचही.

No comments:

Post a Comment