Friday, 30 June 2017

कुंपण.

आमच्या LPGच्या बिझिनेसमधे कंपनीतून सिलेंडर्स आणायच्या ट्रकवर गेले काही वर्ष कासीमभाई ड्रायव्हर म्हणून होते.अत्यंत नम्र,अदबशीर आणि कामाला चोख.तर गेल्या वर्षापासून त्यांची तब्येत जरा नाजूक झालेली.हार्टचा प्रॉब्लेम होता.काळाची पावलं ओळखून वेळीच त्यांनी आपल्या मुलाला(मुकीम)स्वतःच्या कामात तयार केलेलंच होतं.तोही तसाच सौम्य,
आदबशीर आणि कष्टाळू.
प्रत्येक ईदला कासीमभाई ईदनंतर लगेच एक दोन दिवसात कैनभरुन शिरखुर्मा घरी आणून द्यायचे.अगदी सकाळीच.मग चहा वगैरे व्हायचा.मी पण लगेच कैन धुवून द्यायची.रिकामा कैन द्यायला जीवावर यायचं पण इतक्या सकाळी सणा योग्यतेच कैनमधे काय घालून देणार ? घरात फळं होती तीच दिली पिशवीत घालून. मग मात्र ईद आली की मी आवर्जून त्यांच्यासाठी म्हणून डाळिंब, सफरचंद अशी फळं आणून ठेवायला लागले. निरोपाबरोबर ईदच्या शुभेच्छा, फळांची पिशवी आणि रिकामा कैन त्यांना देऊ लागले.
त्यांनी प्रेमाने दिलेला अत्यंत तुपकट आणि गोड शिरखूर्मा मी थोडाच चाखायचे बाकीचा  घरकाम करणा-यांना वाटून टाकायचे.

गेल्या जानेवारीत कासीमभाई जास्तच आजारी झाले आणि आम्ही बाहेरगावी असतानाच अल्ला को प्यारे हो गये.दवाखान्यात असतानाही त्यांची कामाप्रतीची जबाबदारी जाणवत होती.
नेहमीप्रमाणे या वर्षी रमाजानच्या महिनाभरात माझ्या ईद बाजारात ३-४ चकरा झाल्याच.ईद आली,झाली आणि गेली पण.
मला वाटलं या वर्षी कासीमभाई गेले,घरचे बहूदा ईद साजरी करणार नाहीत.अगदी कालच आंबापुराण संपुष्टात आणून जरा दुस-या फळांनाही मानाने घरात आणलं तेव्हा फळं घेताना कासीमभाई आठवलेच.
आणि आज सकाळचे आठ वाजत नाही की त्यांचा मुलगा शिरखूर्म्याचा कैन घेऊन आला.आवर्जून आमच्यासाठी कमी साखरेचा बनवला होता.
चहा घेताना त्याला फळांची कथा सांगितली. तर म्हणला "मैडम रहने दो.कुछ देनाही चाहिये ऐसा नही."
"अरे देने की बात नही,लेकीन ईदको कासिमभाई जरुर याद आये.कलही फल लेते समय उनकी याद आई. कैसी-कैसी यादें युंही जूड जाती है वो मै बोल रही हूं."
"जी हां वो तो सही है.अब्बा भी आप लोगोंको बहोत याद करते थे.सरका तो बहोत नाम लेते थे."
उपलब्ध फळातली फळं त्याला दिली,
कैन रिकामाकरुन धूवून दिला.
थोडा शिरखूर्मा मी खाल्ला आणि बाकीचा कामवाल्यांसाठी ठेवला.सारिका(ब्राह्मण)स्वैपाक करतच होती.तिला विचारलं तुला हवाय का तर एकदम झुरळ झटकावं तश्या आवेशात हातवारे करत नको..नको..मला नको.
कागं ? त्यात काही चिकन नसतं,फक्त दुध,शेवया,
ड्रायफ्रूटस असतात.
नको ताई फार तेल असतं त्यात.
तेल नाही, तुप असतं ते.
असूद्या..मला नकोच.
आम्ही दोघही हसलो.

दरवर्षी ईदीला अगदी फोनबूक मधून शोधून,शोधून सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा पाठवत असते.तरी पण खरोखर फार कमीप्रमाणात आपला मुस्लिम लोकांशी मित्रत्वाचा संबंध असतो हे अगदी प्रकर्षाने जाणवतं.
आणि खेदपूर्वक खटकतही.
रोजच्या जीवनात मुस्लिम बांधवांशी आपला सतत संबंध येत असतो पण अशा सणावारी अगदी जाणवतं की ही नाती,जिव्हाळा कुंपणापर्यंतच असतो.एक अदृश्य भिंतच आपण कायम मनात-डोक्यात ठेवून वावरत असतो.सर्वसामान्यांनी तरी हे कुंपण जाणीवपूर्वक झुगारुन दिलं पाहिजे नाही ?

No comments:

Post a Comment