Saturday, 24 June 2017

शनी अमावस्या.

मागच्या काही दिवसांपूर्वी फिरुन येताना घरा जवळच्या मंदिराबाहेर एक वयस्क जोडपं बसलेले दिसले.निळ्या रंगाच्या दुकानाच्या शटर्ससमोर ते दोघेही एका शिल्पासारखे दिसले म्हणून फोटो काढले तर बाईंनी खुणांनी(मला मराठी येत नसावं हा एक सर्वव्यापी गैरसमज आहे.बहूदा दांडगी शरीरयष्टी आणि पांढरे केस यामुळे असावं असं) दक्षिणा मागितली.
हे नेहमीचचं असतं अश्या लोकांच.खरोखर वैताग येतो.
अहो मी फिरायला बाहेर पडले आहे.माझ्याकडे नाहीत पैसे.तरी चेहरा केविलवाणा करुन मागणी सुरुच.
हे बघा ते निळं घर दिसतय ना ते माझं घर आहे.
या तिकडे दहा मिनिटांनी तुम्हाला चहा देते.
नको,नको..दक्षिणाच द्या.
अहो जवळंच आहे घर..या तिकडे.
बरं.
घरी येऊन चहा केला-झाला तरी ते दोघं दिसेनात.
जवळच्याच बांधकामावर रहाणा-या बाईला म्हटलं जरा आवाज देगं त्या जोडीला..मी चहा बनवलाय त्यांच्यासाठी.
दोन-चार मिनिटात जोडी आली.बाबा लंगडणारे,बाई चाचपडत चालणा-या.
चहा दिला. गप्पा मारल्या.
शहराजवळचं चिकलठाण्याला रहातात.मुलबाळ नाही.बाबा कंपनीत होते.पण जबरी अपघातानंतर अपंग झाले.असुयाबाईंना शुगर.डोळे बरेच अधू झालेले.

काय करता ? आता कष्ट होतं न्हाईता,लेकरं पन न्हाईत..या मंदिरात येत्योत दर शनवारी.लई लोकं दानधर्म करत्येत.दोघात चार-पाचशे मिळत्येत.त्यात आठवडा निगत्यो.
परिस्थिती ऐकून वाईट वाटले.एक शनिवार किती आशादायी असू शकतो नाही.निघताना त्यांच्याबरोबर थोडं-फार घरातलं उरलं-सुरलं बांधून दिलं.
बाबांनी बायकोला कप विसळून ठेवायला सांगितले.तर बाई म्हणल्या नको..कुणाच खाऊन जावं,पण धुवून जाऊ नये.कुठल्या अर्थाने ते मला कळलंच नाही.

तर आजचा दुसरा शनिवार.फिरुन येतानाच बोलवायला गेले तर इतक्या सकाळीच मंदिर परिसरात पाच-सहा दक्षिणार्थी स्थानापन्न होऊन बसलेले.
ऑं..आली का पंचाईत !
त्या दोघांशीच बोलले तर म्हणे दूपारला येतो.
अहो दुपारी मी नसते घरी.बघा जमलं तर आत्ताच या.
माझाही बोलावण्यातला जोर गेलेला.सगळे सारखेच गरजू.कुणाला म्हणून बोलावणार ?
त्यांचाही मंदिरातला दिनक्रम सुरु झालेला. मोघम बोलून परतले.न आले तर बरंच.

माझा चहा गाळत नाही कि फाटक वाजलं. बाई आत आल्या दोन कप चहा अजून गाळला.देताना पाहिलं तर अजून एक बाई आलेल्या मग दोनाचे तीन करुन चहा दिला.आजच्या नविन बाई या अनसुयाबाईंच्या नणंदेची मुलगी.जरा अर्धवटच वाटताहेत.

पुजा-रांच्या कृपेने दर शनिवारी ६-७ जणं सकाळ पासनं मंदिरात बसतात.सकाळचे सहा ते दुपारचा एक नंतर ही जोडी जवळच रहाणा-या नणंदेकडे जाते.परत संध्याकाळी सहा ते रात्रीचे दहा.मग घरी.यांची नणंदही येते इथे बसायला.
दिवसा अखेरीला सगळ्यांची दक्षिणा एक करुन समान विभागणी करुन उपस्थितांमधे वाटून घेतात.
पुजा-यांचा पण वाटा असतो काहो ?
न्हाई..आमीच सात जणं वाटून घ्येतोत.जो नाही आला त्याला काई द्येत न्हाईत.आमी दोघं,आमची नणंदबाई,तिची मुलगी,तिची मावशी अश्ये आमी घरातलेच सर्वे बसत्योत इथं.तुमच्यासारखे लोकं द्येतेत दहा,वीस,पन्नास रुप्ये.
एवढ्यात एक अवजड टोपलं डोक्यावर घेतलेली बाई...
बाईईई..ई..आमोशा वाढावो...म्हणत दाराशी आली.
तिला वाटेला लावले.तर अनसुयाबाई..
बाई आमोशीचं द्यावं हो..लई चांगलं र्रातया.
असूद्याहो. खूप मिळतं तिला या गल्लीत.
गरजूंना द्यावं,बरोबर ना ?
त्येबी बरुबर हाय.
परत जरा उरलं-सुरलं कागदात बांधून दिलं आणि निरोप दिला.

या विशिष्ट मंदिराविषयी माझं मत चांगलं नाही.एकतर मंदिरात मुळीच प्रसन्नता नाही.एवढं राबत्याचं मंदिर निट-नेटकं ठेवावं असं कुणालाही वाटत नाही.
हरीपाठ,पूजा,आरत्या,भंडारे,कथा सतत चालू असतात.बारा महिने एक बाई बाहेर बसून बांगड्या विकतात.भगवा औरस-चौरस मंडपपण अनेकदा ठोकलेला असतो.
In short this is the very popular temple of this area.भाराभर देव आणि ठिगळं जोडल्यासारखी त्यांची स्थानं.अगदी अजागळ कारभार आहे.तरी पण
भाविकांना आकृष्ट करायला हरत-हेचे प्रयत्न विश्वस्त(?)हिरीरीने आणि व्यावसायिकपणे करतात असं मला मनापासून वाटतं.

पण मग लक्षात आलं अशा पध्दतीने किती तरी गरजूना ही मंदिरं पोटाशी घेतात.निदान दोन वेळच्या जेवणाची तरी सोय लावली जाते.चौका-चौकातली मंदिरं,तिथले बारमासी कार्यक्रम,भंडारे,जूनी देवस्थानं,तिथल्या वार्षिक जत्रा..नाही म्हटलं तरी जेवण आणि विश्रांतीची हक्काची ठाणी.यातून गैर प्रकारांनाही चालना मिळते.पण खरंच ज्याला कुणीच नाही त्याला ही मंदिरं म्हणजे एक विसावाच आहेत नाही ?
रमजानमधे पण असंच दृश्य दिसतं.लोकही सणावारी सढळपणे दान देतात.त्यामुळे ही नितांत गरजू मंडळी किती आश्वस्त होत असतील नाही.
अमावस्या वाढयचही काही समाजोपयोगी शास्त्र असावं  असं वाटतयं.एका सदहेतूने चालू असलेल्या अशा  सोशल सिस्टिम्स एक अभ्यासाचं विषय मात्र नक्कीच आहेत.

No comments:

Post a Comment