Tuesday, 20 June 2017

कविता.

भांडी घासायला येणारी मनिषा,तीन मुलांची आई.एक मुलगी नववीत..पूजा,दुसरी दिव्या आठवीत.मुलगा लहान आहे.नवरा म्हणजे सगळ्याच अर्थाने कर्दनकाळ.
मुलींना सोबत घेऊन येते कामाला अर्थात शाळेच वेळापत्रक सांभाळून.
ख-या कामाच्या म्हणजे मनिषा आणि पूजाचं.
हसरी,कामसू पूजा घरातलं गैस-ओटा करणार,थोडफार बोलणार.वयात येऊ लागलेली.काजलभरे चमकदार डोळे,सळसळीत केस,हाताला मेंदी..तारुण्याने जादू केलेली.
मुलं त्रास देतात म्हणून घरी एकटी जायला घाबरणा-या पूजाच्या नवयौवनाला घाबरुन,परिस्थितीला कावून तिच्या आईने आत्ताच महिन्या पुर्वी तिचं लग्न लावून दिलेलं.
त्यामुळे आता आई बरोबर लहानखोरी दिव्या जबाबदारीने येते.अंगण झाडून जाते.आज पर्यंत त्या दोघींच्या कामसूपणामुळे हिच्याशी कधी फार संबंध आला नव्हता,जो आत्ता येतोय.
दिसायला पूजापेक्षा डावी,लहानशी,झिपरी,घोग-या आवाजाची आणि जराशी फटकळंच.

गेले दोन-तीन दिवस झाले सुशेगात अंगण झाडतांना गुणगुणत असते.ताला-सुरात.काय म्हणून विचारलं की तोंड लपवून हसते फक्त.
तर आज परत गुणगुणत होती.विचारलं की थांबलं गुणगुणणं.आज मीही चंगच बांधला.बरंच गोड बोलून,बोलकं करत उत्तर मिळवलं एकदाचं.

आमचं घरं महापालिकेच्या बागे जवळ आहे आणि बागेत मराठी कवींच्या सुप्रसिध्द कविता दगडांवर कोरुन त्या फरश्या स्तंभांसारख्या ठिकठिकाणी उभ्या केलेल्या आहेत.म्हणून ती बाग 'कवितांची बाग' म्हणून ओळखली जाते.मी तिथे एकदाच गेले आहे.

हो ना करता म्हणली मी कविता म्हणते काकू.
अरेवा ! कुठली गं ? सांग ना,म्हण ना..
मला सहावीच्या,सातवीच्या सर्व्या कविता येतेत.
ओहो.पण आज कुठली म्हणत होतीस गं ?
ती तिथं बागेत आहेना ल्हिलेली.
अगं पण तिथे तर खुप कविता आहेत.मला कसं कळणार तु कुठली कविता म्हणतेस ते ?
शेवटी मी काळ्या मातीत,टिफनं चालती वगैरे गाऊन दाखवलं,तरी पण बरेच आढेवेढे घेत एकदाची
कविता म्हणून दाखवली.मी लिहून घेतली.
तर कविता कष्टकरी शेतक-या विषयीची आहे ती अशी.....

शेतामधी माझी खोपं,त्याला बरोट्याची झापं.
तिथं राबतो,कष्टतो माझा शेतकरी बाप.
घेतो अंगावरी चिंध्या,खातो मिरची भाकर.

काळी उसाची पाचटं, जगा मिळाया साखरं.
............?
बाप फोडतो लाकडं,माय पेटवती चुल्हा.
आम्ही कष्टाचं खातो,जग करी हपाप.

रोज कामावर येता-जाता ही चिमुरडी त्या बागेतल्या कविता बघते.तोंडपाठही करते.
आणि निरागसपणे मोलं अंगण झाडतांना कविता गुणगुणते का गुणगुणतांना झाडते माहित नाही.

No comments:

Post a Comment