Thursday, 27 July 2017

Back to the future.

सध्या चार दिवस झाले दोघंच आहोत घरी.पावसाचा अंदाज घेत प्लान्टेशनसाठी सारखं हिरण्यला जाणं होतय.
थोडक्यात स्वैपाक प्रकरण आटोपतच घेण्याकडे कल आहे.😊
तर आज नाश्ता नकोच म्हटलं.चहाच खूप होतो.पोळीच खावी गरमागरम.😋
दोघच असल्यामुळे कारल्याच्या भाजीचा नंबर लागला.दोन-दोन तुकडे करून कारले पाण्यात ठेवून दिले.आणि इतर कामं करत मावशींची वाट बघत होते.
नेमकी सारीका जरा लवकरच आली.
अगं जरा एखादं काम करुन येना.
...ताई आज कुठ्ठेच काम नाही फक्त दोनच घरंच काम आहे.
...का बरं ? नागपंचमी का ?
...हं..आणि तुम्ही भाजी चिरुन द्या बरका..मला आज चिरायचं नाही.
...बापरे ! 🙄
मी एकदम Back to the future या चित्रपटातल्या हिरोसारखी ४०-४५ वर्ष मागे गेले.
माझ्या वडिलांची आई - आत्या(माझी) भारी कर्मठ होत्या.(अंतर्गत मराठवाडा अजूनही आहे) त्या आमच्याकडे असल्या की नागपंचमीला तवा(भाजणं)विळी(चिरणं),तळणं असं काही चालायच नाही बहूदा. मग आदल्याच दिवशी आई सगळं करुन ठेवायची.🤗
तर विस्मरणात गेलेल्या त्या गोष्टी झर्रकन आठवल्या.

हिंदू कॉलनीतली ही गल्ली भलतीच कर्मठ आहे बुवा.
कालही एकजण नाग-सापांसाठी ज्वारीच्या लाह्या विकायला आला होता.
...अगं काही होत नाही सारीका.
...नाही ताई..तुमचं आमचं वेगळं असतं. तुम्हाला नाही माहिती.
मग काय दिली भाजी चिरून.
...अगं तु आज आली नसतीस तरी चाललं असतं.

मग जरा गप्पा मारत तिच्या कडून अजून माहिती काढून घेतली.
लोखंडाचा तवा नाही चालत.एल्युमिनियमचा चालतो.कारण नांगर लोखंडाचा असतो आणि नांगरामुळे साप मारले जातात ना.
तळायच नाही त्यामुळे सणाची म्हणून पुरणाची पोळी न करता दिंड करायचे.( कणकेच्या पारीत पुरण भरुन मोदक,मोमोसारखे वाफवून घेऊन तुपाबरोबर खायचे)
काही जणं म्हणे तव्यावर पोळ्या न करता कढईत भाजतात.
...अरे वा ! ब-या सोई करून घेतल्या आहेत गं.
...हं मग ताई..अपायावर उपाय असतोच ना ?

No comments:

Post a Comment