Thursday, 27 July 2017

पायवाट... आठवणींची.

मागे दोन वर्षांपूर्वी फॉरेस्ट डिपार्टमेंट औरंगाबादजवळच्या म्हैसमाळ या उंच डोंगरांवर आमच्या सहकार्याने टेंट रिसॉर्ट डेव्हलप करत होतं.म्हणजे आमचं हिरण्य बघून त्यांनीच आम्हाला गळ घातलेली.पण नंतर तो प्रोजेक्ट डिपार्टमेंटच्या अंतर्गत वादामुळे थांबला.असो.

तर त्याची डेव्हलपमेंट होत असताना मी बरेचदा सुनितबरोबर म्हैसमाळला जात असे.
तर एक-दोन फे-यातच घाटात एका वळणावर आल्यावर आणि तिथून निघणारी पायवाट पाहिल्यावर माझ्या लक्षात आले की अरेच्या या पायवाटेने तर मी डोंगरमाथ्यावरच्या गिरीजादेवीच्या मंदिरात एकदा लहानपणी शेजारी रहाणारे काका,त्यांची विवाहोत्सुक मुलगी आणि आईबरोबर चाललेली आहे.
गेल्या अनेक वर्षात बरेचदा म्हैसमाळला गेले आहे पण ही पायवाट आणि तिच्या सुरवातीचं शेंदुरी दगड-मंदीर कधी नजरेस पडलं नव्हतं.जे आज एकदम ठळकपणे डोळ्यास आलं आणि त्याचा रेफरन्सही लागला.
मग परतल्यावर शोधाशोध करुन त्या ताईला शोधलं,फोन नंबर मिळवला.फोनवरुनच त्या सफरीची माहिती विचारली.आता तीन मुलींची आई असलेल्या तिलाही लगेचच फार काही आठवेना.पण माझं शंका निरसन व्यवस्थित झालं.मग सगळचं उकलत गेलं.

आम्ही कोटला कॉलनीत रहात असतांना आमच्या अगदी शेजारचे,अत्यंत घरोब्याचे संबंध असलेले देशपांडे कुटुंबीय बदलून दुसरं बि-हाड त्या घरात आलं.
ब-या पैकी मोठ कुटुंब व सगळे विशीच्या पुढचे.
आजी-आजोबा,त्यांचा विवाहीत मुलगा-सुन,परगावी राहणा-या मुलाची दोन लहान मुलं आणि एक अगदीच लग्नाची ताई.
१९७७-७८चा काळ. बहूदा त्या ताईच्या लग्नाचं म्हणावं तसं जमत नसावं.तिने काही मंगळवार या म्हैसमाळच्या गिरीजामातेसाठी कबूल केले होते.दर मंगळवारी ती तिच्या वयस्क वडीलांबरोबर या देवीच्या दर्शनाला जात असे.शहरापासूनचे अंतर साधारण ३०-३२ किलोमीटर. त्या काळचा प्रवासाचा सगळा भरवसा तोकड्या सरकारी वाहन यंत्रणेवरच असायचा.
थंडीचे दिवस होते.का कोण जाणे माझी आई आणि मी पण त्या वडील-मुलीबरोबर निघालो.बसस्टैंडवर गेलो तर नेमक्या काही कारणाने सगळ्या बसेस बंद होत्या म्हणे.मग आम्ही तेंव्हाच्या हिरव्या रंगाच्या टेंपोने दौलताबाद पर्यंत आलो.(हे मला काहीही आठवत नाही)
पण दौलताबादलाच आम्ही विनवण्याकरुन एका ट्रकमधे बसून घाटाच्या पायथ्यापर्यंत आलो होतो.
कारण ट्रक तिथून दुस-या विरुद्ध रस्त्याने जाणारा होता.
मग आम्ही पायीच घाट चढायला सुरवात केली म्हणे.
हेही मला आठवत नाही पण घाटाच्या हमरस्त्यातून आम्ही ही पायवाट जवळची व सोपी म्हणून निवडली असावी.या पायवाटेचा प्रवास मात्र अगदी ठळकपणे आठवतोय.उजव्या हाताला मराठवाडी ऐसपैस खडकाळ दरी आणि डाव्या हाताला झाडी-झुडपं.करवंदांच्या जाळ्या भरपूर.छोटी-छोटी हिरवी फळं पाहिल्यासारखी वाटताहेत.पायवाट संपल्यानंतरच काही आठवत नाही.ना मंदिर ना परतीचा प्रवास.
पण चाळीस वर्षांनंतरही मला ते अगदीच बेताचं शेंदुरी मंदिर,त्यापासची आडबाजूची डोंगराळ,खडकाळ पायवाट बघून सगळं आठवलं याचं फार विशेष वाटलं.

जेव्हापासून ही पायवाट परत दिसली आहे तेव्हापासून मुलं,बहिण,भाऊ,भावजयी,भाच्यांना घेऊन एकदातरी ही पायवाट चालायचीच असं अगदी मनापासून वाटलं.
अनेकदा हा विचार सगळ्यांना बोलूनही दाखवला.पण सगळ्यांच एकत्र येणं,इच्छा आणि सिझन याचा मेळ लागतंच नव्हता.

तर आत्ता मागच्या आठवड्यात माझी मुंबईची बहिण, मावसबहिण इथे आले होते.एकदम झटपट ठरलेलं गेट टुगेदर.आम्ही तर सगळे इथेच होतो.फक्त माझा मुलगा नव्हता.हिरण्यलाच रहायला होतो.हवेत छान बदल झालेला.मुंबईकर पाऊस घेऊनच आलेले.म्हैसमाळचा 'ह्रदयस्थ' पेंडिंग ट्रेक करायचा ठरलं.सगळेच उत्साही.
जेमतेम अर्धातासाची हसत-खेळत चालण्यासारखी चढाची पायवाट. हिरवागार निसर्ग,उंचावरच ठिकाण, खाली हिरव्या शेतांची गोधडी..रमत-गमत,थट्टा मस्करी करत मेन रोडला कधी लागलो कळलंच नाही.
भरपूर फोटो काढले.सगळ्यांना खूप मजा आली.
माझीही मनोकामना पुर्ण झाली.

जी पायवाट मी आणि आई फार पुर्वी चाललो होतो त्या पायवाटेवरनं सगळ्या भावडांना,आईने न पाहिलेल्या माझ्या मुलांना,भाच्यांना,प्रेमाच्या कुटुंबीयांना एकत्रितपणे या पायवाटेवरनं अधिकाराने,निश्चयाने चालवताना अक्षरशः त्या आभाळासारखंच मन भरुन आलं.

No comments:

Post a Comment