Saturday, 3 June 2017

चिदंबरम...


असचं जरा एक दिवस ठरवलं आणि आम्ही तिघी,आणि दुसरे आमच्या बरोबरच्याच चारजणांच्या कुटुंबियांनी मिळून एक मोठी गाडी केली आणि चिदंबरम् व कुंभकोणमच्या एक दिवसाच्या ट्रिपला निघालो. आमच्या तिघींपुरतीची संपुर्ण ट्रिप मीच ऑर्गनार्ईज केलेली.मी जे ठरवलं.. ते दोघींनी विश्वासानी मान्य केलं.बाकीचे चौघं आले तर मोठी गाडी नसता छोटी गाडी.बेतशीर ठरलेलं.पण या ट्रिपला मोठी गाडी सात डोकी...माझा एजेंडा फिक्स होता.चिदंबरम् करुन कसही करुन कुंभकोणमला भेट देऊन तिथून मला मोठी,तगडी पितळी समई आणायचीच होती.सगळ्या भारतात इथल्या समया प्रसिध्द आहेत. आमच्या हिरण्यच्या एक मेच्या 'अभिजात महाराष्ट्र'या कार्यक्रमासाठी मला एक चार-पाच फुटी देखणी समई हवीच होती. तिरुपती,वेल्लोर,कांचीपुरम,पॉन्डेचरी इथले बाजार बघून आता कुंभकोणमवरच आशा होती.गाडीतल्या कुणाचाही काही ठोस कार्यक्रम नव्हता तरी पण मी आधीच बजावून ठेवलं होतं की कुंभकोणमला मला असा वेळ लागणार आहे म्हणून. सुदैवाने साकारशी निगडीत असलेला मणी नावाचा ट्रैव्हल्सवाला तरुण खुपच समजूतदार होता.चांगलं हिंदी जाणणारा ड्रायव्हर दिला आणि वाटेवरचं एक शिव मंदिरही आवर्जून पहायला सांगितलं. सकाळीच निघालो.अंतर्गत तामिळनाडूत प्रवेश केला. सुपीक जमीन,भातशेती,नारळी...सुखावह प्रवास. दक्षिणेतलं फार महत्वाचं आणि नावाजलेलं शिव मंदिर,चिदंबरम्. गर्दी होतीच. भव्य गोपूरी प्रवेशद्वार..भलं मोठ्ठ प्रांगण..दुरुस्ती चालू आहे. नवयुवक ब्राह्मण पुजा-यांचा सुळसुळाट.अर्ध डोकं भादरलेलं..मागचा गोल चंद्र भला मोठा..लांबसडक केसांची शेंडी,कपाळी भस्म,धुत वस्त्र..चटपटीत रंगांच्या साड्यांमधल्या भक्त शिसवी महिला..खरा दक्षिण रंग.एकात एक बरीच मंदिरं..तेच ते नेहमीचं पैसे मोजून देवाच्या अधीक नजीक जाणं,जास्त साग्रसंगीत पुजा..फोटो नाही. कमी वेळेत आणि मोफत जेवढी दर्शनं घेता येईल ती घेतली.बाहेरच्या आवारात फिरलो.खुप मोठी,चहू बाजूंनी पाय-या असलेली पुष्करणी.बाजूलाच खुप मोठ सभागृह..दुरुस्तीला काढलेलं..एकूणच भरपूर चहल पहल असलेलं मंदिर..द्रोणी प्रसाद कम् नाश्ता पदरात पाडून घेतला.बाहेरच दक्षिणी रांगोळीचं सुंदर तामिळी पुस्तक मिळालं. झोकात माझं,गावाचं नाव,तारीख टाकली आणि निघालो कुंभकोणमला. वाटेतच वैतिस्वरम् हे मंदिर मणीच्या सांगण्यावरन पाहिलं. ऐस-पैस मंदिर,भव्य गोपूर..एकात एक चारी दिशांना अंधारी,काळपट,तेलकट मंदिरं..अंधारात तळपणारे दिवे..गर्दी नाही..निवांत फिरलो..पाईपने मंदिर आतून धुणं चालू होतं.बाहेरच्या मंडपात जेवणावळ बसलेली. यजमानांनी आग्रहाने बोलावलं..बसू का नकोचा घोळ न घालता मी पटकन एका पत्रावळीसमोर बसून घेतलं.
Absolutely no inhibitions !
इथे पण मोठी पुष्करणी आहे..तिच्या २-३ बाजूंनी अनेक खांबी,अनेक रंगी सुंदर गैलरी आहे.मंदिरातल्या भिंती सुध्दा देवदेवतांच्या चित्रणांनी छान रंगवलेल्या आहेत.भर उन्हाची वेळ तरीही चिदंबरमने गमावलेली मनातली जागा या मंदिराने पटकावली. कुंभकोणमला आधी जेवण केलं.अगदी यथातथाच चव,पण कांचीच्या कुर्मा-पराठ्याला तोड नाही.असो.
कुंभकोणम् गावाबाहेर समयांची दुकानं आहेत.टळटळीत ऊन..वैराण परिसर..दहा-बारा दुकानं..भाषेची अडचण..वेळ कमी..तरा तरा दोन-तीन दुकानं पाहिली..भरपूर,वैविध्यपुर्ण माल..पैटर्न,वजन आणि भाव याचा मेळ घालण्यात वेळ गेला..गाडीतल्या बाकीच्यांची कुरकुर..ऊन्हाने तेही कावलेले..हो ना करता पंचवीस किलोंची,पाच तुकडी,साडेचार फुटी सुरेख समई वाजवी दरात घेतली.छोटसं दुकान पैकिंगसाठी दणकट खोके पण पटकन मिळेनात.पळापळ करुन एकहाती खेळ जमवला एकदाचा.गाडीतलं तापमान वाढलेलं पण मी मात्र मनोमन सुखावत खुष झाले. कुंभकोणमला स्वतः जाऊन आणलेली समई हिरण्यसाठी ! Wow !
तिथून पुढे कुंभकोणम मधलेच नागेश्वर(?) मंदिर पाहिले.आता जरा कंटाळापण आला मंदिरांचा पण एक दोघं म्हणाले चला... चला तर चला.साधारण मंदिर पण उंच गोपूरांवर काही स्त्रिया बिभत्स रुपात दाखवलेल्या.चटकन नजरेत भरणा-या.नवल वाटले.तिथून पुढे महामाखाम टैंक नावाच्या मंदिरात गेलो.हे मंदिर भारतातल्या सात नद्यांच मंदिर आहे.मुर्ति रुपातल्या गंगा,यमुना,सरस्वती,गोदावरी, कावेरी,कृष्णा आणि बहुदा तुंगभद्रा असाव्यात.आपली गोदावरी मुर्तिरुपात इथे बघून धन्यता वाटली. मंदिराच्या बाजूला मोठे घाट असलेला तलाव.दक्षिणेतला पवित्र तलाव.दर बारा वर्षांनी गंगेतलं पाणी ह्यात येतं म्हणे. दरवेळेसचा गाडीतला चढ-उतार आणि नाही म्हटलं तरी मंदिरांमधला तोच तो पणा.आणि वेळे अभावी फक्त दर्शनच.शिल्पकलेतलं सौंदर्य वगैरे जाणून घेणं दुरच.पोहोंचायचीही घाई होती.निघालो.
मला जरा तिथला सोने बाजारही नुसता बघायचा होता.
भारतातली काही ठिकाणं पुराण काळापासून सोन्याच्या वैशिष्ट्यपुर्ण दागिन्यांसाठी प्रसिध्द आहेत.त्यातलं एक कुंभकोणम् आहे.पण टाळलं.समई जमली हेच खुप झालं. तामिळ मधे समईला कुत्तुविलक म्हणतात. ही अवजड,धातुची,तुकड्यांमधली समई परततांना विमानात चढवे पर्यंत फार मनस्ताप झाला.It was a lesson not to be forgotten.ऑरोविलेचं वेळापत्रक चुकल्यामुळे तंजावर रहीत करुन आम्ही चेन्नईला एक दिवस राहिलो.दुस-या दिवशी चारची फ्लाईट होती.अवजडपणामुळे समईचे खोके फाटले.दुसरे खोके परत तसलेच तकलादू मिळाले.पार्सल कुरियर करायलाही वेळ नव्हता.तरी TN nagarला जाऊन शॉपिंग केलं.निघायच्या दिवशी माझ्या शाळेतल्या मित्राकडे जेवायला गेले.तो खुप दूर रहातो.ओला कैब केली.ड्रायव्हर डांबरट निघाला.माझं नवखेपण,भाषा न येणं अर्ध्या रस्त्यात सोडायची भाषा करायला लागला.मग मित्राची बायको आणि ड्रायव्हरचं तामिळ मधून समजावणीचं बोलणं,मित्राने ड्रायव्हरला हिंदी-इंग्लीशमधून दिलेल्या धमक्या,ओला ऑफिसमधून ड्रायव्हरला समजेल अशी दिलेली निर्वाणीची तंबी,आणि मला इंग्लीशमधून दिलेला दिलासा..परत ड्रायव्हरचं माझं तोडकं-मोडकं बोलणं... इतक्या भाषेच्या हर त-हेच्या उड्या मारुन देखील पठ्ठ्याने मला हाय वे वरच सोडलं,पैसे मोजून घेतले आणि पळाला.
गप्पा-जेवणाने जरा रिलैक्स होत नाही की निघायची वेळ झाली.खुप ऊन.मित्राच घर ते एयरपोर्ट व्हाया हॉटेल अशी टैक्सी ठरवली.मैत्रिणी सामान घेऊन खाली रिसेप्शन मधे येऊन बसलेल्याच होत्या.आठवणीने माझं मोबाईल चार्जर व इतर वरच सामान त्यांनीच पैक केलेलं.तिघींच सामान खुप त्यात ती तुटक्या-फुटक्या बॉक्समधली अवजड कुत्तुविलक.घड्याळ पळतयं. हॉटेलवाले चापलूस.आम्ही परस्पर टैक्सी आणली म्हणून एकजण मदत करेना.नशीब टैक्सीवाला बरा होता.सामानासह स्वतःला कोंबलं आणि सुसाट एयर पोर्टकडे निघालो.माझं एकटीचं तिकीट वेगळं होतं बाकीच्यांच एकच व्हाऊचर होतं.चेक इन काऊंटरला तरुण मुलगा. त्याला रिक्वेस्ट केली की बाळा माझं व्हाऊचर एकटीचं असलं तरी आम्ही सगळे एक आहोत.त्यामुळे वजनाचं गणित सगळ्यांच मिळून कर म्हणजे मला एक्स्ट्रा लगेज चार्जेस फार लागणार नाही.तो बिचारा गोंधळला.केबीन लगेज माझ्यासाठी एडजस्ट करा म्हटलं तर आमच्याही ग्रुप मधलं सौहार्द संपुष्टात येऊ लागलेलं.तरी केलं कोऑपरेट सगळ्यांनी.बैगाच्या आदला बदलीत एकीची कात्री,एकीचा चाकू तिथेच टाकावा लागला.
सगळा वैताग मी आणि माझ्या समईपाशी पोचायला लागला.
वैतागले.पंचवीस किलो वजन जास्तीचे पैसे भरुन नेणं.
काय परवडली असती ती समई ?
फाटक्या खोक्यातनं AK 47 सारखी ती तुकडा-तुकडा समई बाहेर डोकावतीये.जास्तीचे पैसे भरले तरी समई सुस्थितीत घरी पोचेल का नाही अशी काळजी लागली ती वेगळीच. Last 10 minutes..लढो जमके.तेवढ्यात एका पोलिसाचं त्या पितळी नळ्यांकडे लक्ष गेलंच.संशयाने त्याने खुणेनीच विचारलं काय म्हणून..कुत्तविलक म्हटल्यावर त्या दोन्ही खोक्यातनं बाहेर डोकावणा-या पितळी नळ्या बघून त्याची खात्री पडली. नजरेत कौतुक,आदर झळकला.
कुत्तुविलक..कुत्तुविलक करत त्याने दोन्ही खोके बिनबोभाट थ्रु करुन दिले आणि अक्षरशः मी निश्वास सोडला. समई सुस्थितीत पोहोंचली.अशीच समई पुण्यातही मिळाली असती पण बरीच महाग पडली असती.असो.
अनुभव आणि कौतुकामुळे it's invaluable now !

No comments:

Post a Comment