माझी खरवसाची सगळ्यात जूनी आठवण नांदेडची आहे.जमीनीवरच ठेवलेल्या शेगडीवर मोठ्या ताटात दोनावर-एक अश्या सुंदर,मोहक दुधीरंगाच्या, मगजदार,लुबलुबीत ठोकळा चौकोनी गोड वड्या.टोपदार जाळीखाली झाकून ठेवलेल्या.
मधल्या काळात कधी खरवस खाल्ल्याच आठवत नाही.मुंबईत काही हलवाई विकायचे तो खाल्लेला आठवतोय.
पण माझा संसार सुरु झाल्यावर मात्र बरेचदा खरवस केल्या जातो,खाल्ल्या जातो.नियमीत केल्यामुळे हातखंडाही झाला आहे.आणि आता हिरण्यमुळे तर कायमच कच्च दूध मिळतं,त्यामुळे पाहूणे येणार असतील तर,काही सेलेब्रेशन असेल तर माझ्याकडची स्पेशल डिश म्हणून खरवसाच्या वड्या आवर्जून करते.घरातले सगळे आवडीने खातात.मुलाला तर ह्या वड्या फार आवडतात.
औरंगाबादचा दूध पूरवठा आसपासच्या झालर खेड्यातनंच होतो.त्यामुळे हिरण्यच्या आसपास भरपूर गवळीवाडे आहेत.हिरण्यच्या गवळ्यांना सांगितलं तर बाराही महिने कच्च दूध मिळू शकतं.पण पचायला अवजड आणि प्रचंड प्रमाणात लागणारी साखर यामुळे कधीतरीच आम्ही हे दूध मागवतो.ब-याच जणांना आणूनही देते.तर माझ्या वहिनीच्या आई-वडिलांचा लग्नाचा पन्नासावा वाढदिवस साजरा केला त्यांनी.भेटवस्तु-पुष्पगुच्छ नकोच असं आवर्जून सांगण्यात आलं होतं.तर त्यांना खरवस खूप आवडतो व मी नेहमी कच्चं दूध त्यांना आठवणीने देत असते.तर म्हटलं आज आपण हिच भेटवस्तू देऊ यात.पण नेमक्या दिवशी गाय-म्हैस जनली (व्यायली,बाळंतीण)
नाही.त्यामुळे बेत रहीत झाला.तर आत्ता चार दिवसापूर्वी दोन लिटर गाईचे कच्चे दूध मिळाले.एक बाटली त्यांना पोहोंचती केली एका लिटरच्या वड्या आम्ही केल्या-खाल्ल्या.रुचकरच लागतात त्या.
पण झालं काय की मागच्याच आठवड्यात दूधाचे उत्पादन आणि त्याची वाईट बाजू याची एक क्लिप फेसबूकवर पहाण्यात आली.हल्ली कसं जास्त उत्पादन देणा-या गाई-म्हशीच पाळल्या जातात,औषधं देऊन जास्त दूध प्राप्त केलं जातं.नवजात बछड्यांना मातेपासून दूर लोटलं जातं..वगैरे..वगैरे.
अशा गोष्टी नेहमीच वाचनात येतात.थोडावेळ अस्वस्थता येते,चीडही येते.पण परत आपलं येरे माझ्या मागल्या.
दूध,दही,ताक,तुप,लोणी,चिज आणि अनेक मिठाया..आस्वाद घेणं सुरुच रहातं.
मुल जन्माला घातल्यानंतरचं पौष्टीक दूध बाळाच्या पुढच्या आरोग्यासाठी फार महत्वाच असतं.त्यासाठी सगळ्या अनुभवी माता,जाणकार,डॉक्टर्स अगदी आटापीटा करतात.जेणे करुन या भुतलावरचा नवागत बाळ आरोग्य संपन्न राहील ही सदिच्छा असते.
निसर्गाने प्रत्येकच जिवात ही किंवा थोडी निराळी व्यवस्था केलेली आहे.पण आपण मात्र त्या खरवसापायी एका वासराचा-पाड्याचा जन्मसिध्द हक्क हिसकावून घेतो.कच्च दूध काय किंवा रोजचं दूध काय,आपण फारच अन्यायाने वागतो असं मला हल्ली फार वाटतयं.
माझ्या नव-याला डायबेटिस आहे,पण तो ऐलोपथीने साखर लेव्हलमधे ठेवायच्या फार विरुध्द आहे.त्यामुळे सतत प्रयोग सुरु असतात त्याचे.तर सध्या त्याने दूध आणि दूधाचे कुठलेही पदार्थ व्यर्ज केले आहेत आहारातनं.बाकीही इतर पदार्थ जाणीवपुर्वकच घेतोय पण त्याची शुगर लेव्हल कमी होत आहे.
तसही कैलशियमसाठी दूधाचा मारा करणारे विचार जरा मागे पडताहेत.आरोग्यासाठी आयुष्यभर दूध पित रहाणं हे किती योग्य आहे हे आता बघायला लागेल.कुठलाही प्राणी आयुष्यभर दुध पित नाही.दुधा वेगळी झाली की मातेलाही दुध येईनासं होतं.पण आपण माणसं मात्र आयुष्यभर दूधाचा वापर करतो आणि त्यासाठी त्या जनावरांना अतिरेकी पध्दतीने वेठीला धरतो.
हेमलकस्याला गेले तेव्हा कळलं अदिवासी कोरा चहा पितात.कारण गाई-म्हशींच्या दूधावर फक्त बछड्यांचाच अधिकार असतो असं ते मानतात.
Very seriously we have to think about it.
Socially and individually also.
एका चुकीच्या कन्सेप्ट भोवती जग फिरतय(फिरवलं जातंय) का ?
आणि त्यापायी किती मुकी जनावरं,माता,बछडे भरडले जाताहेत.
अभ्यासायला पाहिजे हे सगळं एकदा.
समजून-उमजून आपल्यापुरते तरी निर्णय घ्यायची वेळ आली आहे असं प्रकर्षाने वाटतयं.
Wish this should be the last 'Kharwas' of my life !
No comments:
Post a Comment