Saturday, 27 May 2017

मेतकुट,मुरमुरे आणि मराठवाडा.

मेतकुट,मुरमुरे आणि मराठवाडा.

मला वाटतं प्रत्येक प्रांताची अशी काही खान-पान पध्दती असते.अगदी पंगत प्रपंच जरी नसला तरी दुपारचं-मधलं खाणं सुध्दा प्रत्येक प्रांताचं काहीतरी वैशिष्ट्यपुर्ण असतंच.
जसं कोकण म्हटलं की कुळीथ आणि कोकम आठवतंच तसच मराठवाडा म्हटलं की मेतकुट आणि मुरमुरे आठवलेच पाहिजे इतके ते घराघरात सर्वमान्य आहेत.
नांदेडजवळच्या आमच्या आईच्या गावी आम्ही सगळे जमलो की मोजून एक डझन शाळकरी मुलं असायचो.दिवसभर खूप हुंदडायचो.नदीवर जाणे,आंघोळी,म्हशी हाकणे,तीन मजली चिरेबंदी वाड्यात हुंदडणे.
ओसरी,माजघर,स्वैपाकघर,बाळंतीणीची खोली,लादनी,
भिंतीतले जिने,पक्षकारांची खोली,गच्चीतली गच्ची,
तळघर,भयाण अंधारं न्हाणीघर,शेजा-याच्या विहिरी.दिवसभर धुमाकुळ असायचा अगदी.आणि चार वाजता ती भुती
खाय-खाय.मग आमच्या आया एका मोठ्या परातीत मुरमुरे,कच्चं तेल,मेतकुट,मीठ,तिखट,कच्चे शेंगदाणे कालवून द्यायच्या.मोठे लोकं कांदे हाताने फोडून या कालवणाबरोबर आवडीने खात.
तेंव्हाचे तरुण मामा भुतांच्या,चकवा-चेटुकच्या,चोर-डाकुंच्या देमार कथा सांगत आम्हाला असे गुंगवून ठेवायचे की बसल्या-बसल्या परातभर लावलेले मुरमुरे फस्त व्हायचे.न कुरकुरता.
हि माझी मुरमुरे-मेतकुटाची पहिली आठवण.
माझे बाबा या तरुण मामांची खूप मजा घ्यायचे.आम्ही सगळे बसलो पराती भोवती की म्हणायचे हं..बसली का मामा कंपनी कडबा खायला ? कधी आईला म्हणायचे लागतंच काय तुझ्या माहेरच्या लोकांना.दिले परातभर लावलेले(मेतकुट)मुरमुरे की बसतात चरत.
But believe me..एक दोन अपवाद वगळता आम्ही सगळी भावंड,पोक्त मामा,त्यांची मुलं-मुली-सुना सगळे अजूनही अत्यंत आवडीने मेतकूट-मुरमुरे खातो.परवाच एक मामा सांगत होता एका मामाचा दोन वर्षाचा नातू सुध्दा भुक लागली की त्याच्या आईला 'मुम्मुले'मागतो.So sweet.
उन्हाळ्यातले लंबे-चौडे दिवस मी अजूनही मुरमुरे-मेतकुट लावून-खाऊन सुसह्य करते.माझ्या नव-यालाही प्रश्न पडतो.काय तुला ते मुरेमुरे-मेतकुट आवडतं कळत नाही.
अगदी परवाची गोष्ट.मी माझ्या नांदेडच्या चुलतभावा बरोबर गुजरातला जाऊन आले.नर्मदा किना-या जवळील एका आश्रमात राहुन आले.तिथल्या एका महान स्वामींचे ते अख्ख कुटुंब भक्त आहेत.स्वामी आठवड्यातून फक्त गुरुवारी दर्शन देतात.स्वतः तिथल्या देवांची पूजा करतात.माझ्यामते ते दिवस-रात्र असा दिवस न पाळता चंद्राच्या कलांप्रमाणे पुजापाठ करतात.नेमकं या वेळेसची पूजा-आरती रात्री एकच्या पुढे.आश्रमातले सगळे भक्त-शिष्य इतक्या रात्री शुचिर्भुत होऊन बसलेले.बहुतेकांचा गुरवारचा उपास.आश्रमाच्या रिवाजा प्रमाणे पूजा-दर्शन विधीवत होईपर्यंत पहाटेचे तीन वाजलेले.मनाजोगं स्वामींच दर्शन,
आशिर्वाद,नर्मदा किना-याचं गार वारं,टिपूर चांदणं...लगेच झोप लागणं शक्यच नव्हतं.उपासवाल्यांना भुक लागलेली.भावाचा फतवा निघाला.लावा मुरमुरे.वहिनीही सगळ्या तयारीने आलेली.
आश्रमातल्या स्वैपाक घरातून मोठ्ठ पातेलं आणलं.भरपूर मुरमुरे,मेतकुट,तेल,मीठ,तेल,शेंगदाणे(सगळं नांदेडहून बांधून आणलेले) कालवले आणि आठ-दहा जणांनी मनसोक्त गप्पा मारत खाल्ले.एखाद्या तपोभुमीत ब्रह्मप्रहरी मेतकुट-मुरमुरे एखादा मराठवाडीच आवडीने खाऊ शकतो.
अध्यात्म-भक्ती एक जगह और पेट-पूजा अपनी जगह.
तर असा आहे मुरमुरे-मेतकुटाचा मराठवाडी महीमा.

हे सगळं आठवायचं कारण आत्ताच मुरमुरे लावलेत-खाल्लेत.त्यामुळे स्फुरण चढलयं!

1 comment:

  1. So true my father reminisced all this just last week

    ReplyDelete