Thursday, 11 May 2017

अभिजात महाराष्ट्र..अनुभव चार...

'अभिजात महाराष्ट्र' १ मे या महाराष्ट्रदिना निमित्य हिरण्य फाऊंडेशन ने साज-या केलेल्या संगीत मैफिलीचे पडघम सर्व दूर पसरले.आलेल्या प्रत्येकाने गायन,घटम,मृदंग व अनोख्या मोर्चिंग वादनाचा आस्वाद अगदी मनापासून घेतला.
कलावंतांना भरभरुन दाद दिली.त्यांच्याशी कार्यक्रमा नंतर ह्रद्य संवाद साधला.न ऐकलेली वाद्य असल्यामुळे आधीच फार उत्सुकता होती.त्यात आणिक तरबेज महिला कलावंतांनी दमदार वादनाने अनोखे रंग भरले.अख्खी हिरण्यची व्हैली घटमच्या लयदार टणकारांनी आणि मोर्चिंगच्या झणकारी ट्यैंव..ट्यैंवनी गुंजली.रसिकांनी तर अक्षरशः कानात प्राण आणून घटम,मृदंग आणि मोर्चिंगच्या जुगलबंदीचा अविस्मरणीय अनूभव घेतला. या वर्षी लहान मुलही खूप होती.ती सुध्दा स्तब्ध उभं राहून मोबाईलमधे हा अविष्कार टिपण्यात दंग झाली होती.
सातत्याने स्वबळावर अशा अनोख्या वाद्यांच्या मैफिलीची पर्वणी औरंगाबादकरांना दिल्याबद्दल रसिकांनी हिरण्य फाउंडेशनचेही कौतूक केले.त्यातही पुन्हा हिरण्यच्या निसर्ग सुंदर परिसराने मैफिलीला चार चांद लावल्याचे आवर्जून सांगीतले.
तसेच औरंगाबादकरांनी अशा देखण्या व श्रवणीय मैफिलीला भरभरुन प्रतिसाद न दिल्याची खंतही बोलून दाखवली.
लागून सुट्ट्या आल्यामुळे या वर्षी रसिकांची हजेरी जरा कमीच होती.शहरापासूनचं अंतर,येण्या-जाण्याची गैरसोय आणि एकूणच कलेच्या बाबतीतली घाऊक उदासीनता.
जे आले त्यांचे मनापासून आभार आणि जे नाही येऊ शकले त्यांनी पुढच्या वर्षी जरुर यावे ही सदिच्छा मनात धरुनच पुढच्या नियोजनाला लागायचं.
टाईम्सच्या सहयोगाने कार्यक्रमाचे आयोजन असल्यामुळे त्यांचाही सहभाग होताच.
परप्रांतियांच्या संघटनांनाही आमंत्रण केली होतीच.
त्यांचे ही काही प्रतिनिधी आले.स्टेजवरच्या तिन्ही महिला कलाकार तामिलनाडू,आंध्राप्रदेश आणि कर्नाटकाचे प्रतिनिधीत्व करणा-या होत्या हे एक विषेशचं.
इस तरहा मेहफिल काफी देर तक वादीयों में गुंजती रही।

दुस-या दिवशी कलाकार महिलांचा दिवसभर मुक्काम होता.
सकाळच्या चहापासून सूरु झालेलं हितगुज अजूनही चालू आहे म्हटलं तरी चालेल इतकी छान मैत्री या तिघींशी झाली.
कलाकार म्हणून त्यांचे कष्ट,अडचणी,कौतुकं याविषयी गप्पा झाल्या.संगीत कलेतल्या राजकारणावर त्यांनी प्रकाश टाकला.खंत व्यक्त केली.इथे येऊन कला सादर करता आली याच त्यांना फार कौतुक वाटलं.
मग दक्षिणी दागिने,कपडे,खाद्यपदार्थ इ.अशीही एक गृह कृत्य दक्ष जिव्हाळ्याची ट्रिप झाली.घ्रष्णेश्वरला जाऊन आलो.
दुपारच्या जेवणात खास मराठी खान्देशी मांडे(पुरणपोळी)
भाकरी,पिठलं,ठेचा असा बेत ठेवला.
हातासरशी दोन-दोन मांडे सोबत बांधून दिले.बिबी का मकबरा पाहिला.अवखळपणे त्यांनी खूप फोटो काढून घेतले.एकूणचं कालची सिध्दहस्त कलाकार म्हणूनची ओळख आणि आजची गृहिणी आणि मैत्रीपुर्ण रुप मनाला निश्चितच समृध्द करुन गेलं.
त्यामुळे एखाद्या मैफिलीला किती लोकं जमतात आणि किती प्रायोजक मिळतात याच्या वरुन मैफिलीच यश न ठरवता,जे रसिक येतात त्यांना काय वाटतय आणि जे कलाकार कला सादर करतात त्यांना काय आनंद होतोय हे जाणून घेतलं कि आपलं पाऊल बरोबर पडतय याची खात्री पटते.
एवढ्या अजस्त्र वैश्विक पसा-यात आपणही आपली चिमुटभर पॉझिटिव्ह एनर्जी कुठेतरी निर्माण करतोय,करु शकतोय या भावनेनी कृतकृत्य नक्कीच वाटत रहातं.


No comments:

Post a Comment