आज एक रस्त्यातल्या चकत्या गोळा करण्याविषयी पोस्ट टाकली आणि दोघांनी बिया जमवण्याच्या उल्लेख केला.
गेली अनेक वर्ष मला तरत-हेच्या बिया जमवायचा छंद जडला आहे. credit goes to Hiranya.
आमच्या जागेत आम्ही गेली अठरा वर्ष झाली चुकत-माकत भरपूर झाडं लावत आहोत.कमी पाऊस,खडकाळ जमीन,जेमतेम माती,
सांभाळण्याच्या आमच्याही मर्यादा...फार यश मिळतच नाही.तरी आपलं आला पावसाळा की जिवाचं रान करत लावायची झाडं.
पहिली सात-आठ वर्ष नर्सरीतून रोपं आणायचो.बराच पैसा त्यात जायचा.पण केलं.मग जसं जसं हिरण्य हिरवं होत गेलं तशी बुलबुल,मैना,वटवाघळं,खारुटल्यांमुळे आता इथून-तिथून गचपणातल्या मातीतून,जागेतून बरीच रोपं मिळतात.पण दोन्ही बाजूंचे डोंगर हिरवे करायचे तर बरच कठीण काम आहे.खडक,उतार..माती आणि पाणी दोन्हीही वाहून जातात.दरवर्षी शेकड्यांनी रोपं वाया घालवण्या पेक्षा मग आम्ही सहज उगवतील अशा बियाचं टाकतो जिकडे-तिकडे.त्यामुळे बिया जमवायचा छंदच लागला.सिताफळांची तर एक बी आम्ही फेकत नाही.पण त्यामुळे झालं काय की बिया शोधायचही वेड लागलं.
आणि एकगठ्ठा जमा झालेल्या कुठल्याही,कश्याच्याही बिया फार छान दिसतात.आला ऊन्हाळा की नजर भिरभिरतेचं.या दिवसात कुठलही अनोखं झाड फळांवर आलेलं दिसलं की जमीन हुडकायचीच.
या छंदात सगळ्यात मस्त काय गवसलं असेल तर लाल-काळ्या गुंजा.चटपटीत रंगातल्या,गुळगुळीत,चमकदार गुंजाच्या टपो-या शेंगा असो का गचपणातून हुलकावणी देणं असो या गुंजांना तोड नाही.दौलताबादचा परिसर या गुंजांच्या वेलींनी बहरलेला आहे.अख्या परिसरात बोरी,बाभळी,सिताफळ,हिवरच्या एकात एक जाळ्या आणि त्यावर येथेच्छ पसरलेल्या गुंज वेली.कुठलीही बकरी तोंड लावू शकणार नाही.सावलीत सुकवलेला गुंज पाला विड्याच्या पानात घालून खातात.घश्याला चांगला असतो म्हणतात.
मी आपली गुंजांवरंच फिदा.
आता तर माझ्या स्टाफने पण धसका घेतलाय या माझ्या गुंजा जमवायच्या वेडाचा.ऊन उतरलं की घ्यायचं खुरपं आणि निघायच मोहीमेवर.चढत,घसरत,फरकत त्या काटेरी जाळ्यांमधे शिरायचं,शेंगांचे झुपके तोडायचे,गळालेल्या गुंजा खुरपीने आत्मसात करायच्या.कुडत्याचे खिसे कींवा ओढण्यामधे हा ऐवज बांधून आणायचा.उद्या सकाळी अजून वरवरच्या तोड बरं शेंगा अशी बरोबरच्याला तंबी द्यायची.
शेवटी एकाने विचारलंच..मैडम..तुम्ही हे का बरं जमा करता ?
अरे या बिया मला फार आवडतात..मी याला भोकं पाडून माळा करणार आहे.सोनं मोजायला सगळ्यात छोटं युनिट म्हणून गुंज वापरली जाते.अस म्हणतात की कुठल्याही लहान मोठ्या गुंजा घ्या,त्यांच सगळ्यांच वजन सारखंच असत म्हणे.
तर वजनी दोन एक किलो गुंजा नक्कीच जमल्या आहेत.आता फक्त सोनं घ्यायचीच खोट आहे.
या दिवसात जंगलात,झाडीत जरुर जावं.भरपूर प्रकारच्या बिया मिळतात.या काळात अजिंठ्याला जाणं जिवावर येतं पण तिथल्या जंगली झाडांच्या बियांच्या मोहाने I never miss the opportunity.
चांगली लिंब,पपया,खरबूजं,वाळकं,आंबे,जांभळं इ. खाण्यात आली की बिया जमवायच्याच.लावायच्या.फार लक्ष देणं होत नाही,यशही माफकच मिळत.पण छंद चांगलाच मनमुराद आनंद देतोय.
आम्हा मायलेकींना लाल भोपळ्याच्या वाळलेल्या बिया गॉसिप्स करत खायचा फार नाद आहे.बाजारातून टचटचीत बियावाला भोपळा जास्तीच्या बिया देण्याच्या बोलीवरच विकत घ्यायचा.बिया धुवून,वाळवून खायच्या.
Its a healthy timepass.बियापण,गॉसिप्स पण !😀
तर आज अगदी मार्च महिन्याच औचित्य साधत पसारा काढून फोटो काढले आणि आता पोस्ट करत आहे.
Hope all you may like it.प्रत्येक फोटो बरोबर पण काही नेमकी माहिती देणार आहे.
हे लिहीतानाच मनात आलं..नुसत्या बियां विषयी लिहिण्या ऐवजी झाड,पानं,मुळं,पाणी,फुलं,फळं..असा एकेका झाडाचा जीवनक्रमच डॉक्युमेंट करुन ठेवायला पाहिजे नाही का ?
No comments:
Post a Comment