Thursday, 16 March 2017

Sri Aurobindo Ashram...


मला वाटतं शिबीर सुरु झाल्यावर २-३ दिवसातच आम्ही श्री अरविंदांचा आश्रम पहायला,समाधी दर्शन करायला बाहेर पडलो.साकार पासून फार अंतर नाहीये पण नविन जागा आणि तिघींच मत..बहुदा रिक्षानेच गेलो. साकार अगदी कोळीपाड्यात आहे तर हे समाधी स्थान मध्य फ्रेंच वसाहतीत आहे.एकदम sea change.सरळ रेषेतले प्रशस्त देखणे रस्ते..फ्रेंच आर्किटेक्चरचे रिफ्लेक्शन असलेले टुमदार एकसारखे बंगले.टुकीच्या गैल-या,सुखद आणि निटसं रंगसंगती,कुंपणा लगत बोगनवेली बहरलेल्या..झाडांच्या गर्द सावल्या,त्यामधून आखीव-रेखीव रस्ते..रिक्षावाल्याने आश्रमाजवळच सोडलं.कुठेही फार कलकलाट नाही,आरडा-ओरडा,हॉर्नचे आवाज नाही.एकूणच परिसर गंभीर आणि चित्रातल्या सारखा टापटीप. चपला-बुट काढून समाधीस्थळी.मोबाईल्स बंद..फोटोही नाही.. बोलायचही नाही..लाईनीतच दर्शन घ्यायच.इमारतीच्या मधल्या अंगणात गुलमोहराचं-पेल्टोफोरमच झाड आहे आणि तिथेच अरविंदाची आणि मदरची समाधी आहे.समाधी अगदी साधी पण नखशिखांत विविधरंगी फुलांनी सुंदर सजवलेली.शेजारीच कुंड्यांमधे भरपुर फुलझाडं. खुप शांतता.समाधीला नमस्कार करा इच्छा असेल तेवढा वेळ तिथे शांत,एकचित्त व्हा.लगतच्यात इमारतीच्या वरच्या मजल्यांवर अरविंदजी व बाजूच्या खोलीत मदर रहात असत.तिथे प्रवेश नाही.दुरुनच बघायच त्यांच निवासस्थान.समाधी पासून उठलात की बाजूलाच पुस्तकांच विक्री केंद्र आहे.पुस्तकांसह इतरही स्टेशनरी मिळते बहुदा.आता आठवत नाही आणि फोटोंची तर बातच नाही.चिडीचुप बाहेर पडलो..बराच वेळ फ्रेंच कॉलनीतनंच फिरलो..फारसं सुसंगत आठवत नाहीये पण बहुदा समुद्र किना-यालगत फिरुन साकारला परतलो. पुढेही या ठिकाणी दोनदा जाऊन आलो.चिक्कार सतत राबता असतो इथे भक्तांचा,देशी-परदेशी पर्यटकांचा.स्थानिक लोकही नियमीत येत असतात समाधी दर्शनाला.पण सगळीकडे शांतताच शांतता.थोडीफार कुजबुज. माझी पहिली नवलाई संपली आणि मग मात्र जरा चौकस नजरेनी मी गोष्टी टिपायला सुरवात केली. काही लोकं अरविंदाच्या,मदरच्या समाधी ओट्यावर डोकं,हात टेकून अगदी सश्रध्दपणे शरीर टाकून लीन होतात. अगदी भान हरपल्यासारखे.एखाद्या ट्रांसमधे गेल्यासारखे बराच काळ तसेच रहातात.काय दिलासा मिळत असेल आणि कोणते स्पिरिच्युयल व्हाईब्ज जाणवत असतील बरं ? मला हे फार अनाकलनीय वाटलं-वाटतं.इतकं हुकमानी आलं मनात की मेडिटेटीव्ह मुडमधे कसं जाता येत असेल ? तेही सर्वसामान्यांना आणि इतकं जाता येता सहज डोकावताना.निशब्दतेचं दडपण इतकं की प्रश्न विचारायचीही सोय नाही. दुस-या भेटीत तिथल्याच अजून आतल्या एका पुस्तकालयाला भेट दिली.तिथे परत एक मेडिटेशनचा हॉल...बाजूला जिना.जो मदर नेहमी वापरायच्या म्हणे.मेडिटेशन हॉल पुर्ण चकचकीत पांढरा.. परावर्तित प्रकाश तिथेच फिरणारा.इथेही बहुदा मदरचा मंद हास्याचा हॉंटिंग फोटो आहेच.आसपास चकाकणारा डिव्हाईन ऑरा.. त्याकडे एकटक बघत,डोळे मिटून लोकं निशब्द एकाग्र झालेले. एक महिला मदर ज्या जिन्याने खाली यायच्या त्या जिन्याच्या रेलिंगवर माथा टेकून स्तब्ध ऊभी.शेवटी मी कुजबूजत कुणाला तरी विचारलं हा काय प्रकार आहे तर जिथे-जिथे मदरचा स्पर्श झाला आहे त्या -त्या ठिकाणी भक्त असेच नतमस्तक होतात असं मला सांगण्यात आलं.अचंबीत झाले. असो एकेकाचे भक्ती विषयक विचार आणि एकेकाची श्रध्देची त-हा. But for me it was a sheer bouncer.Absolutely I could not relate to this. शिबीर आठ दिवसांच होतं आणि संध्याकाळी तसा मोकळा वेळ मिळायचा.मग रोज बाहेर पडायचो.आणि पॉन्डी तस खूप लहान आहे.त्यामुळे अगदी मार्केटमधे जरी साड्या बघत फिरलो तरी परत एक चक्कर आश्रम भागात व्हायचीच.समुद्रही जवळ असायचा.हवेशीर फिरत परतायचो. तर अशाच एका भेटीत समाधी स्थळाच्या मागच्या भागात फिरत होतो.इथे आश्रमाशी निगडीत अशी बरीच पुस्तकांची,क्राफ्टची,हैन्डमेड गोष्टींची विक्री केंद्र आहेत त्यामुळे कुठल्यातरी खरेदीच्या निमित्ताने तुम्ही इथेच गोल गोल फिरत रहाता.हं तर समाधी इमारतीच्या मागच्या रस्त्यावर एक वयस्क पुरुष कोपर्यात उभं राहून एकटक वरच्या बाल्कनीत बघत होता.जरा विचीत्रच वाटलं म्हणून चौकशी केली तर कळलं ती मदरची गैलरी आहे आणि मदर बरेचदा त्या गैलरीत कधीकाळी उभं रहायच्या म्हणून हे गृहस्थ आज रस्त्यात उभं राहून गैलरीकडे टक लावून बघताहेत. ये भक्ती समझना अपने बस की बात नही है असं म्हणत कपाळावर हात मारुन घेतला. निघायच्या आदल्या दिवशी आश्रमातला नाश्ता घ्यायचा ठरलं.इथली वेळा पत्रकं,शिस्त अगदी काटेकोर.धावतपळत वेळ गाठली.बरेच जणं करड्या रंगाच्या कपड्यात.डोक्यावर विशिष्ट टोपी.रंगारंग कपड्यातले आम्हीच.आपापली थाळी,वाडगा उचलायचा,रांगेतनंच नाश्ता घ्यायचा.दुध-पावाचा नाश्ता निशब्दपणे जागा मिळेल तिथे बसून खाल्ला.कूठे बसू?चांगलं का वाईट अशी कुठलीही कचकच नाही. पण हां नजर टाकू तिथे मदर आणि मदरचेच फोटो.छताजवळ मदरचेच अनेक पेंटिग्ज.. आकाशातनं तेजप्रकाश पृथ्वीवर पोहोंचतोय आणि त्या प्रकाशा बरोबर एक ऐंजल स्त्री पृथ्वीवर येत आहे.जिथे-तिथे स्त्री प्रतिमा आणि तिच्यासोबत ऑरा..हेलो..डिव्हाईन लाईट. अतिरेक वाटला आणि नकोस झालं. कदाचित ही माझी मर्यादा असेल, but I am putting it very straight. आत्ता हे लिहीतांना उगाचच मीना प्रभुंच्या रोमराज्य पुस्तकातलं वाक्य पुसटसं आठवतय.एखाद्या महत् थोर व्यक्तीला त्याच्या भक्तां इतकं कुणीच नामोहरम करत नसत. आपल्या हिंदू संत-महात्म्यांनाही जे चुकलं नाही ते एका परदेशी ग्लोबल व्यक्तीच्या बाबतीतही घडतय हे प्रकर्षाने जाणवल.भक्त इथून-तिथून सारखेच. Cult झाला की सगळं विचित्रच होत जात नाही ?

No comments:

Post a Comment