पॉन्डेचेरीला शिबिरासाठी म्हणून आले खरी पण ऑरोविलेतल्या मातृमंदिरा विषयी काही विषेश कल्पना मला नव्हती.त्यामुळे फार उत्सुकताही नव्हती ना दडपणही होतं.पण इथे आल्यापासून समाधी स्थळ व मातृमंदिराचा अगदी अपुर्वाईने सगळ्यांकडून उल्लेख होत होता.त्यामुळे उत्सुकता चाळवली गेली.
श्री अरविंद घोष आणि त्यांच्या अगदी नजीकच्या शिष्या मदर यांचे समाधी स्थळ मनात येईल,जमेल तसं पुन्हा-पुन्हा पहाता आलं वा येतं सुध्दा.पण मातृमंदिर म्हणजे एक वेगळाच खाक्या आहे.ठराविक दिवशीच,ठराविक वेळेलाच जाऊन रांगेत ऊभ राहून पासेस मिळवावे लागतात.पास देतानाच ते तुम्हाला २-४ दिवसातली एक वेळ देतात.त्याच वेळेत तुम्हाला मातृमंदिरात क्रिस्टिल बॉल असलेल्या मेडिटेशन हॉलमधे जाता येत,बसता येतं.एका वेळेस बहुदा ८० जणं आणि काही अडचण नसल्यास रोज अशा ४-५ बैचेस घेतात.म्हणजे साधारण ४०० लोकं एकादिवशी या मंदिराला मेडिटेशनसाठी म्हणून भेट देतात.
इथे जगभरातून खूप लोकांचा राबता असतो त्यामुळे आमच्या सारख्या एकगठ्ठा ४० शिबिर्थींना पासेस द्यायला तिथली No arguments वाली मैनेजमेंट मुळीच तयार नसते.जरी आम्ही अरविंदांच्याच शिबिरासाठी आलो होतो तरी त्या इंटरनैशनल जागेवर आम्ही त्यांची सिस्टिम बिघडवणारे कलकले सामान्यच होतो.त्यामुळे लवकरच्या तारखेचे पासेस मिळवावेत म्हटलं तर तिथे कोणाचीच मात्रा चालेना.त्यामुळे आपापल्या ग्रुपला धरुन रांगेत उभं राहून शक्यतो एकाच तारखेचे,वेळेचे पासेस पदरात पाडून घेणं हे आमचं परम कर्तव्य झालं.एक तर पॉन्डीपासून मातृमंदिर वीस किमि दूर आहे आणि एकेकट्यानी तिथे जातील असे कुणी आमच्यात नव्हते,आणि अपेक्षितही नव्हतं.
पहिल्यांदा पासेस मिळवायला सगळे मिळून गेलो तर पासेस द्यायची खिडकीच बंद.No questions please.दुरुनच मातृमंदिर,परिसर बघून परतलो.
अरविंदांच्या पट्ट शिष्या फ्रेंच महिला मदर यांच्या विचारांनी या ऑरोविलेची स्थापना झाली.देशी-विदेशी उच्चपदस्थांच्या उपस्थितीत पाया भरणी झाली.अजूनही डेव्हलपमेंट चालूच आहे.मोठा परिसर आहे.दोन-चार मेन बिल्डिंग्ज् आणि मातृमंदिरापर्यंतच रोजचे व्हिजीटर्स जाऊ शकतात.इंन्फर्मेशन बिल्डिंग मधे दर तासाला संक्षिप्त रुपात ऑरोविले का,कसं निर्माण झालं याची फिल्म दाखवली जाते.
इंग्रजी,हिंदी आणि बाकीही काही परकीय भाषेतही असावी.
जगातल्या सर्व मानवांनी जात-पात-धर्म-देश विसरुन एकोप्याने पृथ्वीवर नांदावं असं स्वप्न उराशी बाळगत मदरने ही संस्था,ठिकाण स्थापन केलं.या कल्पनेचा जगभरात उदोउदो झाला..आजही कौतुक होतयं यात तिळमात्र शंका नाही.पण आम्ही मावळे श्री अरविंदांच बोट धरुन इथपर्यंत पोहोंचलो खरं पण वाट चुकल्यासारखेच भिरभिरत राहीलो.
सुंदर,प्रशस्त परिसर,गोंधळ नाही,गडबड नाही..सगळं आपलं शिस्तीत.परत हाताची घडी तोंडावर बोट.आणि बोलू म्हटलं तरी इथल्या दुरस्थ,करड्या वातावरणाचं इतकं दडपण येतं ना कि बसं !
खोकायची भिती,शिंकायची धास्ती.त्यात आमची सिनियर सिटिझन्सची मराठी झुंड.काही विचारु नका.कधी एकदा ही शाळा सुटते आणि बाहेर येऊन आवाजी श्वास घेतो असं झालं.असो.
दुस-या फेरीत मात्र पासेस मिळाले.तरी पण आमचा थोडा गोंधळ झाला.त्यामुळे शिबिर संपलं तरी एक दिवस जास्तीचा राहून परत मातृमंदिरातील मेडिटेशन साठी जाव लागलं.नियोजित तंजावर दर्शन रहीत करुन चेन्नईला परतावं लागलं.
एकदा वाटलं जाऊदे काय तो मेडिटेशन हॉल अन क्रिस्टिल बॉल बघायचा ? पण परत विचार केला मी स्वतःहून या वाटेला यायची शक्यता फार कमी.चला सगळ्यांबरोबर आपलही दर्शन.
दिलेल्या तारखेला ऑरेविलेला पोहोंचलो.सकाळची ११ची वेळ.तासभर आधी पोहोंचण अपेक्षित असत.एका ठराविक ठिकाणी जमलो.कुजबुज सुरु.काय होणार माहित नाही.Wait and watch.
एका बस मधन आम्हाला मातृमंदिराच्या जवळच्या टप्प्यात नेऊन ठेवलं.
इतरही भारतीय,परदेशी नागरिक मोठ्या संख्येनी होते.बहूदा पहिली बैच बाहेर पडायची होती अजून.१०-१५ मिनिटांनंतर चालत मातृमंदिरात प्रवेश.अतिव शांतता.तरुण परदेशी व्हॉलेंटीयर्स न बोलता मार्गदर्शन करायला.
सुंदर भव्य घुमट..अतिशय स्वच्छ,निरामय,निरव...
ग्राउंड फ्लोअरला मध्यभागी उतरत्या पाकळ्यांच,उच्च प्रतिच्या मार्बलचं,प्रशस्त व्यासाच पुर्ण विकसित फुल-कमळ..आमच्या अजिंठा-वेरुळच्या कोरीव लेण्यांमधल्या सभामंडपांच्या छतावर आहेत तशीच ! त्याच्या बाहेरच्या,व्यासाच्या कडातून पाणी खळखळ वहात,अनेक पाकळीदार फुलाच्या मध्य भागातून खाली जातयं...नेत्रसुखद दृश्य आणि चित्त वेधक खळखळ..फुलाभोवती गोलाकार शिस्तीत,शांत बसत वीस मिनिटं इथे एकाग्र व्हायचय.
As per me it was like conditioning for further meditation.
Pin drop science...खळखळ...खळखळ..वाहत्या निर्मल पाण्याकडे एकटक बघताना खरंच भान हरपतं.
इथून नंतर मेन हॉल मधे.आतमधे अंधार..चटपटीत मार्गदर्शक आहेतच मदतीला.आत जायच्या आधी तिथलेच सॉक्स घालून पुढे जायच.
मार्गदर्शक दाखवतील तसं गोलाकार बसायचं.मधे तो जगातला मोठा क्रिस्टिल बॉल ठेवलेला.बाहेरची सुर्य किरणं त्यावर पाडून प्रकाश परावर्तित केल्या जातो.आपण त्याकडे एकटक बघायचं.हेच ते मेडिटेशन.नवख्याला बावचळून टाकणारं.काही काळ नजर स्थिर करणं जमेल पण मनाचं काय ? You need a hell lot of desire, determination and practice also for this.
वीस-पंचवीस मिनिट मिळतात.एक दोघांना खोकल्याच्या उबळी आल्या त्यांना तत्परतेने हात देऊन व्हॉलिंटियर्सनी बाहेर जायला मदत केली.व्यक्तिशः मला तर इतका वेळ मांडी घालून बसणही कठीण होतं.तिथे गुडघेवाल्यांसाठी काही सोफे पण ठेवलेत बसायला.असो.
इतक परकं आणि अनोखं वातावरण असत की नाही म्हटलं तरी दडपण येतचं.त्यात आपल्यामुळे इथली शिस्त,शांतता नको भंगायला म्हणून तर अजूनच धाक.काय ध्यानधारणा होत असेल ते ज्याच त्यालाच माहीत ?
वेळ झाली.प्रकाश निवला.चिडीचुप उठलो आणि शिस्तीतंच पण तरातरा बाहेर आलो.
आल्यासरशी मातृमंदिर पहाण्याचं,अनुभवण्याचं समाधान मिळालं.
अनुभवलं नसतं तर अरे ते राहिलंच अस वाटत राहिलं असतं आणि परत स्वतःहून तर माझी तरी इतकी मजल मारली गेली नसतीच.
सगळ्यांच्या तोंडी ध्यान धारणा केल्यापेक्षा मातृमंदिर बघीतल्याच,एक जगप्रसिध्द अनुभव घेतल्याचंच समाधान जास्त होतं.
मला स्वतःला श्री अरविंदाच आयुष्य म्हणजे एकाहून एक अतर्क्य घटनांचा क्रम वाटतो.बंगालच्या उच्च कुळात जन्मलेल्या अरविंदांना त्यांच्या वडीलांनी भारतीयपणाचा स्पर्शही होऊ नये म्हणून बालपणीच इंग्लंडला शिकायला ठेवले.पण वयात आल्यानंतर अरविंदानी ब्रिटिशांच्या आहारी गेलेल्या वडीलांना न जुमानता तिथली एक उच्चभ्रु परिक्षा मुद्दाम नापास व्हायच ठरवलं.भारताच्या ओढीने नंतर ते भारतात परतले.आणि बडोद्याच्या सयाजीरावांच्या आश्रयाला येऊन नोकरी करु लागले.
तिथेच ते भारतीय स्वातंत्र्य संग्रामाला जवळून जाणून घेऊ लागले आणि ब्रिटीश विरोधी कारवायाही भुमीगत राहून करु लागले.एक संतप्त संग्रामी अशी त्यांची ओळख झाली.बॉम्ब बनवायच्या गुन्ह्याखाली त्यांना अटकही झाली.आणि जेलमधे असतानाच त्यांना आध्यात्मिक साक्षात्कार झाला आणि मग त्यांच्या आयुष्याने वेगळेच योगिक वळण घेतले.भारतीय वेद,योगांवर अभ्यास करतांना त्यांना पॉन्डीला परम मानसिक स्वास्थ मिळालं आणि इथेच बरीच वर्ष राहून इंटिग्रल योगावर अभ्यास,लिखाण करताना मदर त्यांच्या संपर्कात आल्या आणि त्याही भारावून इथेच राहील्या.अरविंदांनी १९५० मधे देह ठेवला तर मदरच देहावसान १९७३ साली झालं.
ऑरोविलेची स्थापना १९६७मधे झाली तेव्हा अरविंदांना जाऊन सतरा वर्ष झाली होती.So I feel it's more of a mothers vision.
ऑरोविले विषयी जे वाचनात येतं की कुठल्या देशाचे नागरिक इथे जात-पात-धर्म विसरुन या पृथ्वीचे सुह्रद म्हणून राहू शकतात.जरुरीपुरते आणि आवडीचे काम करु शकतात वगैरे.आम्हा शिबीरार्थिंचा हेतू मातृमंदिर बघणे,अनुभवणे होता त्यामुळे या विख्यात
ऐक्टिव्हिटीज देखील बघणं जमलं नाही.
साकारपासच्या समुद्र किना-यावर मी एकटीच सकाळ-संध्याकाळ बरेचदा फिरुन यायचे.भारताचा पुर्व किनारा आणि उचंबळणा-रा सागर रेषेमागून उगवणारा तेजोनिधी..पहिल्यांदा पाहिलेला.
कोळीवाड्यातले काही कोळी अगदी पहाटेच एकेकटे बोट घेऊन त्या अथांग समुद्रात उतरलेले दिसायचे.जणू काही दर्या में खसखस सारखे कर्मयोगीच.तर काही एकांडे नाविक किना-यावरच निश्चलतेने सागर लहरींकडे हरवून पहात बसलेले दिसायचे.जणू काही उचंबळणारं पाणी त्यांना ध्यानाचा मार्ग दाखवत आहे..मनाला शांत करत आहे.
So simple way to meditate ! And absolutely perfect for me to get connected !
No comments:
Post a Comment