सध्या इंक पेनाने स्केचेस करत आहे.पेनं तर कधीची आणून ठेवली आहेत.तोही एक झटका छंदच आहे.तर थोडे निट चालून झाली ना त्यांची कूरकूर सुरु.बहूदा शाई वाळली असावी.पाण्यात भिजत घातले.थोड्याच वेळात पाणी गहिरं काळं झालं.झटकून,फुंकून पेन साफ केले.आणि शाई भरायला घेतली.बाटलीतनंच न सांडता डायरेक्ट पेनात भरली.वरचं तोंड जरा फिरवून पेन उलटा धरुन निब खाली असा बाटलीत पकडला आणि त्याचे तोंड भराभर फिरवत पक्क केलं..हे करतांनाच निबमधून काही थेंब खाली पडले...कागदावर काही रेघोटलं...छान चालला की पेन.बाकी सगळं झटपट आवरून टाकलं.काळ झालेलं बेसीन स्वच्छ केलं.Just a matter of ten minutes.
शाळा आठवली.आमच्या लहानपणी शाईचं पेन वापरायला लागणं म्हणजे आपण आता मोठे झालो याची जाणीव होती.पाचवीत जाण्याआधी आता आपल्याला शाईचं पेन वापरायला मिळणार ही कल्पनाच थरारक असायची.शाळा सुरु झाल्या की वह्या-पुस्तकांबरोबर शाईची पेनं आणायची,शाईची बाटली आणि ड्रॉपर पण.मग शाई कशी भरायची ते शिकायचं.ती पण एक कसरतंच असायची.काही ना काही गफलत व्हायचीच आणि मग राडा व्हायचा.पेनातली शाई तरी सांडायची किंवा बाटली तरी फुटायची.नवलाई संपली की हमखास ड्रॉपर हरवायचं.मग थोडी शाई झाकणात ओतून मग पेनात भरायची.अगदी काठोकाठ.अंदाज यायचा नाही.निबचं तोंड बसवलं की सांड-लवंड व्हायची.ती निस्तरावी तर अजून रंगारंगी व्हायची.भावंडांचा गलका,मोठ्यांची रागवा रागवी.
इथेच मग ते शिक्के कपाळावर मारले जायचे.
वेंधळी कुठली!फुटक्या हाताचा!
पाचवीत तर शाई भरणे हा मैत्रीणींबरोबर मेंदी काढण्यासारखा सामुहिक कार्यक्रम असायचा.अजून एक क्रियेटिव्ह उद्योग म्हणजे देखरेखीखाली शाई भरुन झाली की पुडाचा दोरा बाटलीत टाकून,शाईत बुडवायचा आणि तो निळा ओला दोरा वहीच्या मागच्या दोन पानांमधे कसाही गोल फिरवून टाकायचा आणि दाबून सण्णकन् असा बाहेर काढायचा की छान फुलपाखरी सिमिट्रिकल डिझाईन उमटलंच पाहिजे.मोठ्यांच लक्ष नसलं की पानंच्या पानं भरवायची या आर्टने.
माझी मोठी बहीण तर शाई भरलेलं पेन चालवून बघण्यासाठी हाती लागेल ती दिसेल त्याची वही ओढायची आणि खरखर वही ज्याची असेल त्याच नाव लिहून टाकायची.त्या वयात तिला लिही..लिही..
लिहायचाच फार नाद होता.आणि मला फक्त वाच..वाच..वाचायचा.
आई फार वैतागायची कि मोठी कधी वाचायला लागेल आणि धाकटी कधी न कंटाळता लिहायला लागेल म्हणून.मी चौथीत असतांना माझ्या लिहिण्याच्या कंटाळ्याची ones and for all जिरवायची म्हणून अख्ख इतिहासाचं पुस्तकंच तीने इरेला पडून माझ्याकडून लिहून घेतलं होतं.
शास्त्री-नेहरु,वल्लभभाई पटेल,लाल-बाल-पाल,दादाभाई नवरोजी,
फुले,अरविंद घोष,सरोजिनी नायडू...काही विचारु नका.तेव्हापासूनच इतिहासाची गोडी लागली वाटतं.
सध्याची आमच्या घरातली ओसंडून वाहणारी लायब्ररी आणि माझ्या लिखाणाच्या डाय-यांच्या थप्प्या बघून माय माऊली नक्कीच सदगदित झाली असती.असो.तर ये थी घर घर की कहानी.
शाळेत तर मुलांची अजूनच त-हा असायची.एकमेकांच्या युनिफॉर्मच्या पांढ-या शर्टांवर मागून शाई शिंपडायची.दप्तरात शाईच्या बाटल्या आणायच्या,त्या गलथानपणामुळे फुटायच्या..तेवढचं जरा करड्या
शिक्षणातून निळं विषयांतर आणि अख्ख्या वर्गाने फिदी फिदी हसायची सैराट मज्जा.गळक्या पेनातली शाई टिपायला म्हणून खडू वापराचे.त्या खडूंनी खिसे भरायचे.मग ते खडू एकमेकांना मारायचे.हल्ली काही कलावंत तांदुळावर गायत्री मंत्र लिहीतात,तसंच खडूवर देखील ILU असं लिहून,कुणाला तरी नेमका खडू मारायची करामत या पोरांनी केली असायची शक्यता नाकारता येत नाही.धन्य त्या शिक्षकांच्या संयमाची आणि पालकांची शाळेवरच्या विश्वासाची.
शाई पुराणातल्या अशा रंजक कथांची मजा हल्लीच्या मुलांना काय कळणार? नाही का ? बघा आत्ता सुध्दा मी कीती रमले.
असो.त्यांच्या पोतडीत वेगळाच अल्लाउद्दीनी खजाना असेल!
शेवटी शाळेचा भाबडा रंगमंच महत्वाचा...नाटक कशाचही असूद्या हो.
No comments:
Post a Comment