मागच्या वर्षीच्या ह्याच दिवसातल्या पॉंडेचरी-तामिलनाडू ट्रिपचा वृतांत आत्ता लिहायला घेतला आहे.एक तर ग्रुप बरोबर शिबीरात गेले होते,त्यामूळे सलग असा निवांत वेळ कमीच मिळायचा.तरी तत्कालीक अनूभव लगेच पोस्ट करायचे पण बाकी फिरण्याविषयीचं लिहीणं जमायचंच नाही.आता मात्र फोटो गैलरी बघून आठवेल तसं लिहीत आहे.
२८फेब्रूवारीचा पहिला मुक्काम एकमताने(माझं हो ला हो)तिरुपती.
पुणे-चेन्नई फ्लाईट घेतली तरी तिरुपती गाठे पर्यंत मध्य रात्र झालेली.
खूप पुर्वी आर्ट स्कुलच्या ट्रिप बरोबर इथे आले होते पण फारसं काही आठवत नाही.डोंगरावरचंं देवस्थान..पाऊस आणि ढग खाली आलेले व निवांत झालेलं दर्शन एवढच आठवतय.
आज तर खूपच रात्र झालेली पण अख्खा डोंगर उजळलेला आणि भरपूर चहल-पहल.डोंगरातला रस्ता सुध्दा छान प्रकाशमान,भरपूर रुंद,झाडं लावून देखणा केलेला.इतकं तर रामोजी सिटीपण छान नाहीये.
देवस्थान आणि परिसर खूप भव्य..मोठाल्या धर्मशाळा..अहोरात्र चालणारी चहा-कॉफीची दूकानं..तत्पर मदत करणारी यंत्रणा.निर्धास्तच वाटलं.
बेतास बात असलेली धर्मशाळेतली खोली तिघींसाठी म्हणून घेतली आणि सकाळी लवकर उठायच्या धाकाने झोपलो.
बरोबरच्या भाविक मैत्रीणींनी दर्शनाचे-पुजेचे बुकिंग जरा जास्त पैसे भरुन आधीच करुन ठेवलं होतं.मी या अशा पैसे मोजून जवळून दर्शन घ्यायच्या विचारात नव्हते.त्यामूळे अगदी पहाटेच्या अंधारातला,गोविंदाच्या गजरातला टपरीवरचा पहिला चहा घेऊन,आंघोळी करुन आम्ही पांगलो.मी एकटी,त्या दोघी.
सकाळचे साडे सहा वाजलेत.तिरुपती टक्क जागं.प्रशस्त रुंद रस्ते..
शंभर-दिडशे खोल्यांवाल्या अनेक धर्मशाळा,दुकानं,चौकशी सेंटर्स..
चुकायचा प्रश्नच नाही.
तरी माझ्या मनात प्रचंड घालमेल.
काय करु ? कुणाशी बोलू ? का बोलू ?
माझा निर्णय,मीच ठरवणार..अशा विचारांची अनेक आवर्तनं करत,विचारत,मजले उतरत,बुट,सामान,मोबाईल सुपूर्त करत एकदाची पोहोंचले..जिथे मुंडण केलं जात त्या हॉलमधे.तुडुंब गर्दी.
लांब केसवाल्या बाया बापड्या,पुरुष,मुलं..खाली येतानांच हातात दिलेली आपापली ब्लेड हातात धरुन नंबर लावून उभे.हॉलच्या तिन्ही भिंतींना टेकून मुंडण करणारे बसलेले.शेजारी पाण्याच बकेट,केस ओले करायला.त्यांच्या समोर नंबरवारी बसायचं आणि डोकं त्यांच्या हातात द्यायचं.पाच मिनिटात डोकं सफाचट करतात.दहा मिनिटं कावरं-बावरं होऊन बघण्यातंच वेळ घालवला.बाकीचे निर्ममपणे मुंडण करुन घेताहेत आणि तडक आंघोळ करुन दर्शनाला जाताहेत.
मनात खूप घालमेल आहे.तिरुपतीला यायचा माझा हट्ट नव्हताच,पण आले तर आता मुंडण करायचचं हे मात्र पक्क होतं.पण हिंमत होत नव्हती.
इथे येऊन मुंडण करुन घेण्याच कुठलही धार्मिक कारण नाही.माझ्या आजीचं(वडीलांच्या आईचं)वपन केलेलं होतं,आजोबा गेल्यावर,१९५५-५८च्या दरम्यान.त्या विषयी मी आधी लिहिलेलंच आहे.नंतरही वपन केलेल्या काही वृध्दांना भेटले,बोलले त्यांच्याशी.
कुठल्याही स्त्रिला मुंडण करणं मनातून आवडतंच नाही-नव्हतंच.
पण समाजाकडून होणारी हेटाळणी नको,वाळीत टाकणं नको म्हणून मन मारुन सगळ्या स्त्रिया राजी होत वपनाला.म्हणजे समाजातल्या रुढीं विरुध्द त्या नाही जाऊ शकल्या म्हणूनंच माझी आजी व इतर विधवा स्त्रियांंनी वपन केलं,त्यांना करावं लागलं.याचा मला फार मानसिक त्रास झाला-होतो.सामाजिक दबावाच्या त्या बळी ठरल्या.
And so I decided to defy the society and went ahead with my decision of doing mundan.
कुणाशीही बोलले नव्हते.मुलीला कुण-कुण होती.
हिंमत होत नव्हती.हॉल गच्च भरलेला.कमरे पर्यंत केस असलेल्या ग्रामीण बायका अत्यंत श्रध्देने मुंडण करुन घेत होत्या.मग आपणंच का डगमगतोय ? कसल्या खुळचट कल्पना घेऊन वावरत असतो आपण ? केसांसारखे केस! वाढतील उद्या.आणि केलं एखाद्या महिलेने टक्कल तर काय बिघडलं ? पुरुष नाही का करत मुंडण ? आजारपणात केस जातात,वयामूळे जातात.त्याचा एवढा इश्यु करायच कारणच नाही.
वाईट दिसू ? दिसू दे!
लोकं अचंब्याने बघतील ? बघू देत ! आपल्या मनाला पटलयं ना ? Its my life, my beliefs and my decision.
Go ahead.
निर्णय पक्का केला,आजी आणि तमाम अभागी स्त्रियांना आठवलं आणि समोरच्याच्या हातात डोकं दिलं.
कर..कर...कर...पाच मिनीटात सगळे केस उडवले.डोक्यावरनं हात फिरवला..my god !
कुठलीही प्रतिक्रिया द्यायला कुणीही ओळखीच नाही आसपास.
And that's the real boon.
परत निघाले.आधी एक चहा घेतला दहा मिनिटं शांत बसले.सेल्फी घेतला.आणि बालाजीच्या दर्शनासाठी निघाले.छान उजाडलेलं तरी प्रसन्न शांतता,गर्दी असूनही.इथल्या शिरस्त्या प्रमाणे बुट-मोबाईल सरंडर केला आणि लोंढ्यात सामिल झाले.इथे बरेच टप्पे पार करावे लागतात.सगळं बंदीस्त,जाळ्या,सिक्युरीटी..गर्दीबरोबर चालत रहाणं..डोंगर उतरतोय..गोविंदाचा गजर घुमतोय.माझं मुंडण इथे कुणाच्याही गावी नाही.Things are so relative.आपणही एका विचारधारेच्या जाळ्यातंच बंदीस्त असतो नाही ?
दिड एक तासाच्या भ्रमणा नंतर एकदाची त्या मंदीराच्या आवारात पोहोंचले.रांग होती तरी रेटारेटी करुनंच 'दर्शन'घ्याव लागलं.इथली मंदिरं एकात एक अशी अरुंद होत जाणारे २-४ अंतर्गत गाभारे असलेली असतात.त्यामूळे मुख्य देव-मुर्ती खूप दूरुनंच दिसते,लहान दिसते.त्यातही त्या बालाजीला इतकं फुलात सजवून ठेवलं होतं ना की मुर्ती दिसली या म्हणण्यालाही काही अर्थ नाही.
दर्शन आटोपून बाहेर ओवरीवर मिळेल ती जागा घेत बसले..शांतपणे.
तर शेजारी दोघीजणी मराठी बोलणा-या.एक जण मराठीच तर दुसरी भारतीय चिनी महिला.मराठी बोलणारी.त्यांना फार कौतूक वाटलं माझ्या मुंडणाच.दोघीही भाविक.नियमीत येतात इथे.छान गप्पा मारल्या.वपना विषयी पण.मैत्रीच झाली मग.
तिघीही मिळून बरचसं फिरत जेवायला गेलो अन्नछत्रात.
दालनच्या दालनं पंगती बसताहेत.कुठेही गोंधळ,कल-कल नाही.
चकाचक स्टीलच्या खुर्च्या-टेबलं,तत्पर वाढपी.प्रसादाचं जेवण..भात,रस्सम,शिरा आणि ताक.मस्त जेवलो.थोडंफार फिरलो आणि तिघीही तिरुमला डोंगर पायथ्याशी असलेलं पद्मावती देवीच मंदिर बघायला निघालो.खाली-वर बसेसची सतत ये-जा सुरुच असते.बालाजीची ही एक बायको..पदमावती.
बायकांची गर्दी,दुकानांची रेलचेल..परत so called darshan.
आता तर हे मंदिरपण मला आठवत नाहीये.मोबाईल परत काढून घेतलेले त्यामूळे आतले फोटो पण नाहीयेत.बाहेर आल्यावर मैत्रीणिंना फोन लावला.सकाळ पासून या मोबाईल काढून घेण्यामूळे आमचा संपर्कच होत नव्हता.
उद्या वेल्लोर मार्गे कांचीपुरमला जायचे आहे.टैक्सी ठरवायची आहे.
खोलीत आल्यावर माझं मुंडण केलेलं डोकं बघून त्या चरकल्याच.आता पुढचे दहा दिवस कसे जातील म्हणून मनातल्या मनात धसकल्याही असतील.
बाजारात फिरलो,टैक्सी ठरवली,शुल्लक पण देखणी खरेदी केली.
ठरल्याप्रमाणे ड्रायव्हरला चार-चारदा फोन करुन झुंजूमुंजू वेळेला निघालो पण.
हां...तिरुपती !
ऐस-पैस डोंगर,त्यावरचा राजमार्गी रस्ता,औरस-चौरस देवस्थानाचा अवाढव्य परिसर..हजारोंनी भक्त..पावला-पावलांवर चौकशी डेस्कस्..मदत करणारे पोलिस..कोप-या-कोप-यांवर चहा -कॉफीच्या गाड्या..कुठेही लांडी-लबाडी नाही.सगळा कारभार अतिभव्य पण सुनियोजीत आणि सुरक्षित.सगळ्या गोष्टी अगदी वाजवी दरात.
मी तर मुंडण,दर्शन,जेवण सगळं बाराच्या आत संपवलं तेही मोफत.बाकीचे २-४ हजार भरुनसूध्दा पस्तावले.असो.
माझा मुंडणाचा वैयक्तिक अनुभव वगळता तिरुपती-बालाजी दर्शन म्हणजे डोंगर पोखरुन उंदीर निघण्यासारखं आहे.माझ्या मते.
समाजाची भाविकता,सिस्टिम,भव्यता बघायला जायला हरकत नाही.
अर्थात ज्यांना दर्शनानेही शांती-समाधान मिळते त्यांना प्रणाम.
No comments:
Post a Comment