Tuesday, 14 March 2017

संध्याछाया...


नुकतीच एका फेसबुक मैत्रीणीची पोस्ट वाचली आणि विचारात पडले.गेले पंधरा दिवस छळणारं पाणी आज जरा बरं आलय...तिकडे हौद सरसर भरतोय आणि इकडे माझेही विचार सुसंगत होताहेत. विषय असा आहे रिटायर्ड माणसं आणि त्यांच आयुष्य म्हणजे दिनक्रम,वेळ घालवायच्या पध्दती..त्यातलं चांगलं-वाईट...इत्यादी. अगदी सुशिक्षीत,सुस्थितीतल्या घराघरात हा प्रोब्लेम आहे. साधारण आपल्याकडे झापडबंद आयुष्य जगायची पध्दत आहे .त्यामुळे ज्यांनी आयुष्यातली ३०-३५ वर्ष फक्त इमाने इतबारे नौकरी केली आहे,पैसे कमावले आहेत अश्यांच्या आयुष्यात ६०-६५ नंतर एकदम रिकामपण येतं.हातातल्या वेळाच काय करावं कळत नाही.नवलाईचा आराम होतो,घरकामात मदत (?) होते,फिरणं होतं पण कशाचीही बांधीलकी नसते.आणि त्याचीच आपल्याला सवय झालेली असते.आठवीत चांगले मार्क घेऊन सुरु झालेली पळापळ,घोडदौड वयाच्या साठीलाच थांबते.म्हणजे पन्नास वर्ष एकाच पटरीवर धावणारी गाडी एका वेगळ्या वळणदार,स्लो,आडबाजूच्या पटरीवर आली की स्त्री-पुरुष सगळ्यांनाच भांबावायला होतं.काय करावं सुचत नाही.तुंबलेलं पाणी जसं वाट मिळेल तिथून बाहेर पडतं तसच काहीस होतं.आहे त्या परिस्थितीत ज्या गोष्टी पटतील,रुचतील त्या केल्या जातात,कराव्या लागतात. छंदांच्या-सोशल वर्कच्या मागे धावायच म्हटलं तर शारिरीक,आर्थिक क्षमता पाहिजे. सगळ्या अर्थाने झिज सोसायची तयारी लागते.उतारवयातला लागणारी पुंजी संपवता येत नाही.आयुष्यभर फार बांधल्या सारखी(सारखा) धावले,आता नाही कशालाही बांधून घेणार हे म्हणणं सोप्प असतं पण इतरांच्या व्यस्त वेळात आपलं हळू चालणारं घड्याळ पाहिल कि घर,वेळ,दिवस,संध्याकाळ खायला उठतात.बरं सोशल स्ट्रक्चरही अस नाही की कुणाच्या ज्ञानाचा,अनुभवाचा नियमीत आदरपुर्वक उपयोग कुणी करुन घेईल.अगदी जत्रेत हरवल्यासारखी अवस्था होते खुप जणांची. अगदी सगळं-सगळं जरी आलबेल असलं तरी ही निवृत्त माणसं, सुखवस्तु महिला आणि यांचे वेळ घालवण्याचे उद्योग-निरुद्योग हा फार मोठा डोमेस्टिक आणि सोशल इश्यु आहे. You need to have a burning reason to be active.. physically.. mentally also. माझ्या वडीलांचच उदाहरण आहे.आईच्या पश्चात घरं बघणं शिकत बघाव लागलं.मग भावाचं आजारपण यशस्वीपणे निभावणं हे त्यांच एकमेव महत् कार्य होतं.पण तो गेला आणि ते दुःखाने,एकटेपणाने,रिकामपणाने इतके सैरभैर झाले की त्यांना सांभाळणं,रिझवणं फार कठीण होऊन बसलं.माझे वडील नौकरीत असताना देखील करमणूक म्हणून पत्ते खेळायचे पण थकल्या नंतर वेळ जावा म्हणून घरात कॉम्प्युटरवर सॉलिटायर खेळायला ते कधीही शिकले नाहीत. वयाप्रमाणे थकणं,काळ सुसंगत काही नवं न शिकणं,लवचीकता नसणं,फार चंचल होणं,अविश्वासू होणं किंवा कुणा एकावरंच फार अवलंबून रहाणं मग त्याचे फायदे-तोटे. एखाद्या लहान मुलासारखं वागणं होत जातं.सांभाळणा-याला फार लवचिकता आणि संयम ठेवावा लागतो. कधी कधी फार डॉमिनेटींग वयस्क घरात असतील तर सगळं घर वेठीला धरलं जातं.तरुणांची घुसमट होते.हे सगळं साधारणपणे कुटुंब व्यवस्था,साठीपुढे आणि सगळ्या क्षमतांचा -ह्यास होतांना काय याच सुनियोजन नसल्यामुळे होतं.Of course destiny also plays it's own suspicious role. हातात वेळ आहे मग कुणी सतत टीव्हीच(बातम्या,सिरियल्स,खेळ..) बघत रहातात,कुणी देव-देवतांच्या मागे लागतात,कुणी शेजार-पाजार भटकत रहातात,नातेवाईकात फिरत रहातात,कुणी दवाखान्यांचाच पिच्छा धरतात..स्वैपाकघर तर all time favorite रणांगण आहे.. कशाचीही काटेरी-टोकाची भुमिका घेतली की खुप दुखणी तयार होतात इथे घराघरात. टीव्हीची अखंड वेळा पत्रकं,दवाखान्यांच्या भेटी,लग्न-मुंजीच्या हजे-या,घरातलं अति किंवा नच लक्ष देणं,किंवा मी दिवसभर काय करु सारखा यक्ष प्रश्न...list is really end less. जीतके पेसिव्ह होतं जातात माणसं तितके हे प्रश्न भणाणुण सोडतात. मला वाटत जरा जास्त सुखवस्तु होणं,कुटुंब व्यवस्थेची चौकट,(मुलांच,नातवांच करायच्या प्रेमाखातरचे सगळे गुंते) सुरक्षीततेची अवाजवी भीती,दिर्घ आयुष्य आणि ठोकताळी जीवन शैली ही काही कारणं असावीत या प्रॉब्लेमची. उद्या जर प्रत्येक पुरुषाने आपल्या पुरतं चहा-पाणी,जेवण बनवायला,दैनंदिन कामं करायला सुरवात केली तर खुप चांगलं होईल नाही त्यांच्या दृष्टीने.(मला माझचं शिजवायला,करायला लागणार आहे ही अपरिहार्य भावना मात्र पाहिजे) तसच महिलांनी पण काही नियमीत पैसे मिळवायचे उद्योग(पर्यायच नाही या जाणीवेने) केले तर सगळ्यांनाच त्याचा थेरपेटीक उपयोग होईल नाही. आपले राजकरणी बघा बरं कसे सत्तरीच्या पुढे सुध्दा कसे तरुणांना लाजवतील असं राजकारण करतात.भले भले म्हातारे मंत्री,पंतप्रधान व्हायची स्वप्न बघतात. अर्थात शारिरीक,मानसिक व्याधींपुढे नाईलाज आहे.अटलजी-जॉर्ज फर्नान्डीस आजकाल रोज सिरियल्स बघतात हे कळल्यावर तर पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा हे खेदाने पटलं. तशीच आपली हातावर पोट असलेली कष्टकरी वर्गातली माणसं. काय वाट्टल ते होऊ दे सण-वार,उन-पाऊस ते आपले भाजी-फळांच आणि कशाच दुकान चालवणारंच.कारण रोजचे शे-दोनशे कमावण्याशिवाय पर्यायच नाही आहे त्यांच्या पुढे.अदिवासींमधे तर जो कमावत नाही त्या व्यक्तीला घरात थारा नसतो.शेवट पर्यंत कमावणं आणि आपापलं रांधण,दैनंदिन व्यवहार करणं चुकतंच नाही त्यांना. तसच त्या वैचारीक बैठकीचं,ताकदीचं पण. वयाची सत्तर वर्ष जगल्या नंतर येणारं शहाणपण(?) चाळीशीच्या मुला-सुनेला,शाळकरी नातवाला सुनवाल तर कसं चालेल ? (मीच कुणाचं चालवून घेतलं नाही आणि घेत नाही). We are born as an independent soul.I have my own way of leading and exploring life.How someone can dictate me or why I should dictate someone ? कावळे-चिमण्या,वाघ-सिंहीणी बघा बरं...घरट्यात घरटं कधीच नसत.आपापली शिकार करायची आणि आपलं पोट भरायचं.मुलांचेही लालन-पालन काही काळच.नंतर ज्याचे ते. माझ्यामते सर्वसाधारण व्यक्तिला ऐषो आराम मिळाला,जगण्यातला अटीतटीचा संघर्ष संपला की ही दुखणी मागे लागतात. भाकरी सुध्दा नाही फिरवली तर करपते आपण तर माणसं आहोत. वाचका पैकी कुणालाही वाटेल या फारच बोलतात हो..यांच सगळं आयडियल आहे का ? तर नाही.माझा उद्या मला माहित नाही.मलाही माझ्या उत्तर आयुष्यातल्या सगळ्या तथाकथीत संकटांची धास्ती आहेच. पण माझे जवळ-दुरचे नातलग,मित्र परिवार यांच्याशी जेव्हा माझं ह्रदगत होतं तेव्हा या गोष्टी जाणवतात,नजरेस येतात.त्याचा मी माझ्या कुवतीनुसार अर्थ लावते. दुरस्थपणे का होत नाही पण त्यावर विचार केला जातो,काही संगती लावली जाते. कदाचीत मी पण सुनबाईंच्या घरात राहुन कटकट करायला लागले तर त्याही म्हणतील...यांना जरा सोडा बर आठवडी बाजारात किंवा द्या सोडून एखाद्या जत्रेत.😟 एवढं सगळं एकटाकी लिहीलय खरं,पण अजून खुप काही लिहीण्यासारखं आहे.विषेशतः सुखवस्तु महिला,त्यांची मानसिकता, भावनिकता,वेळापत्रकं आणि एका भयाण पोकळीत जगणं आणि अतिशय बथ्थडपणे त्या पोकळ्या रंगवणं आणि त्यात स्वतःला रिझवणं. सर्वार्थाने उत्तम स्थितीतल्या सुजाण नागरिकांनाही सुखासिनता इतकी पोखरते ही फार दुर्दैवाची गोष्ट आहे आणि प्रगतिशील सोशल इव्होल्युशनला,कुटुंब व्यवस्थेला देखील एक चपराक आहे.

No comments:

Post a Comment