कांचीहून निघून अगदी भर दूपारी उन्हात महाबलीपूरमला पोहोंचलो.रण-रण उन..समुद्रकिनारा चिडीचूप..विक्रेतेही सावलीला बसलेले.सावलीच्या आशेने आधी किना-यावरच्या सुबकशा दुकानांमधे फिरलो.टिपिकल पर्यटकी, बीच कल्चरी मार्केट..शंख-शिंपले,नारळ करवंट्यांच्या वस्तू,दागिने..इथलं खास वैशिष्ट्य असलेलं दगडी कोरीव वस्तू..जाळीदार लैम्प शेड तर नजर वेधकंच..शिक्षित कलावंत इथे काम करतांना बघायला मिळतात..इथे पोहोंचतांनाही ठिकठिकाणी लहान,मोठ्या शिल्पांची खूप दुकानं दिसली.हे गाव म्हणजे शिल्पकारांची वसाहतंच आहे.थोडीफार पितळी खरेदी केली..बोललेल्या किमतीला दूकानदार तयार झाल्यामूळे काही वस्तू घ्याव्याच लागल्या..दगडी वस्तू सांभाळण्याच्या धाकापायी नाईलाजाने टाळल्या.
इथे आमचा दुसरा चार जणांचा ग्रुप आम्हाला सामील झाला.भवन्स नावाच्या रेस्टोरंटमधे जेवलो आणि जरा तिरपी किरणं झाली की पहिलं त्रिमुर्ति केव्ह टेंपल पाहिलं.तासा-दिड तासासाठी गाईड घेतला.त्यालाही घाईच होती आणि आम्ही तरी कुठे निवांत होतो?
इतक्या कमी वेळात ही इथली शिल्प बघणं म्हणजे अन्यायच आहे पण इलाज नव्हता.आर्ट स्कुल ट्रिप बरोबर आले होते पण काहीही जून्या खुणा दिसनात.गाईड सराईतपणे भरभर सांगतोय..फोटोंसाठी पाच मिनीटं देतोय..नुसती नजर घाईत फिरवतेय.
समूद्रकिना-या जवळचे हे कोरलेले एकजीनसी अजस्त्र खडक..बांधीव नाहीत..हीच खरी इथली खासियत!
भारतीय देव,पूराणातल्या कथा,व्यक्ती,सर्वसामान्यांच जीवन अत्यंत तरलपणे व सफाईदारपणे सैन्ड स्टोनमधे कोरले आहेत.कथा,व्यक्ती आपल्या परिचीत असतात म्हणून पटकन कळतात.उतरत्या उन्हातलं,गुलबट दगडातली ही कोरीव शिल्प अभ्यासकांना फार भुरळ घालतात.आपण फार कमी वेळ देतोय हे पुन्हा-पुन्हा पटतय म्हणून भराभर फोटो काढत आहे.
This is the place for art students and art seekers.
ब्रह्मा,विष्णू आणि महेशाच हे त्रिमूर्ति मंदिरानंतर अर्जूनाचं प्रायश्चित्त-शिक्षा असं नाव असलेला एक मस्त प्रशस्त शिल्पसमूह पाहिला.पंचतंत्रातल्या कथा,कृष्ण कथा,गाईंच दुध काढणा-या महिला..प्राणी,माणसांनी गच्च भरलेला हा शिल्पपट-खडक नजर खिळवून ठेवतोच पण इथले बाकीचेही लहान-मोठे खडक फार रंजक आहेत.
तिथून पूढे किना-यावरच्या शिव मंदिरात गेलो.ह्या वास्तू जागृत देवस्थानं नाहीत.तरी पर्यटकांचा चांगला राबता.बे ऑफ बेंगालच्या अगदी किना-यावरचं हे मंदिर बरचसं इरोड झालेलं असलं तरी अतिशय रम्य ठिकाण आहे हे.इथे दोन घटका बसायला पाहिजे खरं.असो.
तिथून पाच रथ नावाच्या खडक-शिल्पसमुहाकडे गेलो.
पाच पांडवांच्या नावाने हे पाच छोटे-मोठे,कोरीव खडक ओळखले जातात.सुंदर कोरीवकाम..तब्येतीतला हत्ती आणि नंदी लक्ष वेधून घेतात.आणि सोनेरी सायंकिरणातले ते कोरीव रथ-खडक त्यांच्या अंगभूत गुलबट-पिवळ्या रंगानी,कोरीवपणाने सगळ्याच निसर्ग दृश्याला चार चांद लावतात.
महाबलीपूरमला योग्य न्याय देता आला नाही अशी एकांडी रुख-रुख आणि परत कधी निवांत इथे यायचा निश्चय मनात घेऊनंच गाडीत बसले आणि निघालो पॉन्डेचरीकडे.
No comments:
Post a Comment