Thursday, 2 March 2017

कांचीपूरम्...


वेल्लोर करुन झटपट कांचीपूरमला निघालो.भर उन्हात पोहोंचलो.छोटसंच गाव आहे त्यामूळे गाडी धडक गावातच शिरली. रखरखीत,रुक्ष गाव.जगप्रसिध्द कांची सिल्क साड्यांची दुकान ठिक ठिकाणी.भांडी बाजारपण शेजारीच.हॉटेलमधे चेक इन केलं असत तर मग बाहेर पडायचा कंटाळा केला असता म्हणून बाहेरच फिरत राहिलो. सात-आठ हजारांच्या अगदी साध्या वाटतील अश्या सिल्क साड्या.कुणाच्याही मनात रुपाने,पैशाने भरेनात.दुकानदारही सुस्तचं.पर्यटनस्थळी असणारं चकचकीत,साखरी वातावरण अज्जीबातच नाही. जुनी भांडी पण शोधली पण चित्तवेधक काहीही दिसलं नाही पुढच्या प्रवासातील वजनाचीही काळजी होती,आणि समईच्या बाबतीत तर कॉम्प्रमाइज नव्हतंच करायचं.आत्ता तर कुठे प्रवास सुरु झालाय. थोड्याफार चौकशी नंतर एक घरगुती साडीचा व्यापार करणा-या कुटुंबाचा पत्ता मिळाला.उन्हापासून बचाव,वॉश रुमची शक्यता आणि वेळ सत्कारणी लावायला गेलोच त्यांच्या घरात.शिरता क्षणी येवल्याची आठवण झाली.जुन्या पध्दतीच अरुंद घर २-३ मजली.एक-दोन खोल्यात साड्या-कपडे.सासरा-सुन-नातू आणि २-३ कर्मचारी कपडे दाखवायला.जुन्या पेढी सारखी ठेवण. पहिले पंधरा-विस मिनिटं तर तद्दन लेटेस्ट साड्या,कपडे दाखवले. आम्हाला काय हवय तेच त्यांना कळेना.मग नंतर आतल्या कपाटातून जरा चांगल्या हैन्डलुम कॉटन व सिल्क बाहेर आलं.आल्यासरशी थोडीफार खरेदी केली आणि दिवेलागणीला जवळच्याच देवराजास्वामी मंदिरात गेलो. फारशी कल्पना नसतांना पाहिलेल्या गोष्टी कधी-कधी चकीत करतात.तसंच या देवराज मंदिराचं झालं.अंधारुन आलेलं.संध्याकाळच्या दर्शनाची-आरतीची स्थानिकांची गडबड.पूजारीही तयारीत.भव्य,उंच गोपूर..दिव्यांनी उजळलेला.तामिळ भाविकांची लगबग..आरतीत सामिल झालो.विष्णूचं देवालय.प्रचंड आवार..एकात एक मंदिरं..आपण फिरत रहायचं..बाहेर आलं कि परत हरवल्यासारखं होतं.कुठे ही पैसे-तिकीट-रेटारेटी नाही.जागृत देवालयाचा छान घरगूती अनूभव आला.वाटलंच नाही कि आपण कांचीपूरम् मधल्या एका भव्य मंदिरात आहोत म्हणून.मंदिराच्या प्रांगणात अजून काही दुय्यम मंदिरं..सभामंडपं..इथे बहूतेक वैयक्तिक दिर्घ पूजा-पाठ होत असावेत.आत्ताही ब्राह्मण भोजन चालूच आहे.आज पर्यंत फक्त पुराण कथांमधेच टिपिकल भारतिय ब्राह्मण भोजनाच्या रंजक पंगतीं विषयी वाचलं,ऐकल होतं त्याचा आखों देखा हाल या पुरातन मंदिराच्या पार्श्वभूमीवर,रजनीप्रकाशात मनावर अमिट छाप पाडून गेला. लाडू,अनारसे व मुरकू असा प्रसाद विकत घेऊन निघालो.इथेही कल्याण-मंडप,पुष्करणी आहे पण मंदिर बंद व्हायची वेळ झाल्यामूळे निघालो.रुमही ताब्यात घ्यायची होती अजून. रुम ताब्यात घेऊन जवळच्याच सुमार हॉटेलात जेवलो.नविन हॉटेल शोधायचाही कंटाळा आला होता.विचार करुन कुर्मा आणि पराठे मागवले.जे काय समोर आलं ते अक्षरशः गिळवेना. One of the most worst food I ever had. लोणचं फासून कसे-बसे ते मैद्याचे वातड,कच्चट पराठे खाल्ले आणि कुर्म्याला तर तिलांजलीच दिली. कूणाचा बदला घ्यायचा असेल तर हे जेवण फार योग्य आहे शिक्षा म्हणून.पुढेही आमच्यातलीच कुणी जेवणा बद्दल अवाजवी कुरकुर करायला लागली तर आम्ही लगेच म्हणायचो..हिला कुर्मा-पराठे द्यागं..फार नखरे आहेत हिचे म्हणून! सकाळी लवकरच उठून एकांब्रनाथार मंदिरात गेलो.कांचीमधलं सर्वात मोठ मंदिर.शंकराचं.बारा हेक्टर्सच आवार असलेलं.प्रचंड मोठ्ठ.. प्रदक्षिणा पथ मोठा-लांब-रुंद..त्यालगतही काही मंदिरं..पिंडींची रांग..देवाच्या पालख्या-दोरखंड-लाकडी हत्ती-घंटा-समया-दिवे-दानपेट्या..सगळं काही अजस्त्र..भिरभिरत पहातोय..इथे देवांना वस्त्र वहातात..आणि कुणी मागितलं तर पुजारी ते देतात सुध्दा.पुजारी पण भरपूर.सकाळची वेळ..कमी भक्त आहेत मंदिरात..निरव असे प्रदक्षिणापथ..जमिनीवर प्रशस्त रांगोळ्या..फोटो काढत मी जातीये..एक तरुण घरंदाज तामिळी स्त्री,तामिळ पध्दतीने साडी नेसून तरा तरा चालतीये..तिच्या जोडव्यांचा आणि पैंजणांचा आवाज त्या दगडी पैसेज मधे इतका छान घुमतोय ना ! ती महिलापण खुप देखणी आहे..मोजकेच पण हि-यांचे दागिने लखलखताहेत.हा तिचा रोजचा नियम दिसतोय..छम-छम-छम..देवासमोर थांबून,गुडघे वाकवून,मस्तक जमिनीला लावून देवाला वंदन कि परत तर-तर-छूम-छूम..परत एका देवाला वंदन..ती आणि आम्ही जोडीनेच फिरतोय. त्या दगडी मंदिरात घुमणा-या तिच्या छम-छमची,तुरु-तुरु चालीची,उच्चभ्रू देखणेपणाची भुरळ पडून शेवटी तिला सांगितलंच..you are very beautiful and your saree is also very pretty...चालण्यात व्यत्यत न येऊ देता मानेनीच दखल देत thank you म्हणत बाई परत तरु-तुरु दुस-या देवाकडे वळल्या.इथल्या बहूतेक मंदिरात नॉन-हिंदूना प्रवेश नाहीये..इति पुस्तकातून. एका पुजा-याला विचारुन तिघींनी तीन देवाला वाहिलेले वस्त्र घेतले.फुकट घ्यायला कसंतरीच वाटलं.देऊ केलेले पैसे पूजा-याने आनंदाने घेतले.बाहेर आलो.दहा रुपयाला अख्खा द्रोण भरुन कढीपत्ता आणि कापूर घालून केलेला मसाले भात..गरमा-गरम प्रसाद.उत्तम चवीचा.कालच्या जेवणाची उपासमार आणि आजचा नाश्ता म्हणून भरपूर चापला.जगात कुठेही जा..भाताला तोड नाही. तिथून निघालो आणि कामाक्षी अम्मन मंदिरात वळलो.अगदी गजबजाटातलं पार्वतीचं मंदिर.बायकांचच राज्य,त्यामूळे कलकलाट.त्यात मंदिराचा जिर्णोद्दार चालू त्यामूळे खुपच अडचण.इथेही कल्याण मंडप,पुष्करणी आहे..पण बांधकामामूळे पर्यटकांना प्रवेश बंद. हे दर्शन जरा उरकलंच.पण इथे अगदी टिपिकल तामिळी ब्राह्मण स्त्रिया बघायला मिळाल्या.गडद निळ्या-जांभळ्या रेशमी साड्या.मागे नि-या,पदर घ्यायची पध्दतही वेगळी.काना-नाकात खडे,कुरळे केस,बुचडे..आणि इतरांच्या स्पर्शापासून स्वतःला वाचवत चालणं. बाहेर निघालो तर चक्क त्या छोट्या गल्लीत हत्तीला चालवत होते.दक्षिण भारतात बहूतेक मंदिरात हत्ती सांभाळतात.प्रत्येक मंदिरा बाहेर टोलेजंग लाकडी रथ असतो.स्थानिक उत्सवाला त्याची मिरवणूक निघते.बाकी वेळेस पत्र्यात बंद करुन ठेवतात.एकदा एखाद्या उत्सवालाच अशा ठिकाणी यायला पाहिजे. तिथून निघालो ते तडक कैलासनाथ मंदिराकडे.आमच्या शिल्पकलेच्या विश्वात या मंदिराला अनन्यसाधारण महत्व आहे. जरासं बाजूलाच असलेलं हे भक्तांशिवायचं शिव मंदिर.कांचीपूरम् मधलं सगळ्यात जूनं आणि शिल्पकलेच्या वैशिष्ट्यांनी अतिशय प्रेक्षणीय. पाहताच पट्टडकल,ऐहोळे,बदामीची आठवण झाली.सेन्ड स्टोन मधल्या सुंदर शिल्पांनी मंत्रमुग्ध करणारं.परदेशी पर्यटक(here anyone is allowed) आणि कलेचे अभ्यासक इथे आवर्जून येतात.आज मात्र अगदीच कुणी नव्हतं.खरंतर मी इथे खूप वेळ देऊ इच्छीत होते पण दिवसाच्या उजेडात वरदराज पुन्हा एकदा निट बघायचं होतं, पुढेही तासा-दिड तासाचा प्रवास करुन महाबलीपूरम् पाहून अजून पूढचं पॉन्डेचरी गाठायचं होतं.थोडं पाहिलं,फोटो काढले आणि निघालो वरदराज मंदिराकडे.दिवसा अजूनंच भव्य वाटतोय गोपूर.पण आम्ही आधी कल्याण मंडपाकडे वळलो.हा लग्न मंडप फार नावाजला जातो.हजार खांबी मंडप म्हणून.मोजले तर शंभरच्या आत आहेत आणि तेही इतके दाटीने की हजार खांब तिथे असणं अशक्यच. पण प्रत्येक खांब कोना कोनाचा..चांदणी सारखा.बहूदा प्रत्येक बाजू तशी मोजून हजार खांब म्हणत असावेत. अत्यंत कोरीव खांब..सगळे देव..सगळे अवतार..सर्वसामान्यही कोरलेले.काही हिडीस शिल्पही आहेत.काय प्रयोजन असेल बरं अशा शिल्पांच,तेही लग्नवेदी जवळ.दगडातलीच,कोरलेली चौरंगासारखी लग्नवेदी..तिच्यावर चढायला नक्षीदार पाय-या..बाजूलाच मोठी पुष्करणी(बांधीव मोठा हौद..पाण्याने भरलेला)इथलं एक विषेश म्हणजे एका दगडातनं कोरलेले भक्कम दगडी साखळदंड. मला वाटतं तेंव्हाचे राज्यकर्ते अहमिकेने मंदिरं कलात्मक बनवत असावेत.नुसता बांधकामशास्त्रानी जरी विचार केला तरी थक्क व्हायला होतं.पैशाची जोड, त्या-त्या विषयातील निष्णात लोकं,कामगार, कलाकार हेरायची नजर,करवून घ्यायचा आवाका.. खूप आश्चर्य-कौतुक वाटतं. हल्लीचे राज्यकर्ते विमानतळं,मेट्रोज,धरणं आणि गेला बाजार क्रिकेट स्टेडियम्सवरंच सगळं लक्ष केंद्रीत करतात नाही ? भरपूर फोटो काढले,फारंच घाईत असल्यामूळे कांचीपूरमला मनासारखा न्याय नाही देता आला म्हणून चुटपुटत निघालो महाबलीपूरमकडे.

No comments:

Post a Comment