Thursday, 23 February 2017

बंधूप्रेम...


नुकतीच कोल्हापूर-बेळगाव-सांगली-नरसोबाची वाडी-खिद्रापूर-पुणे-औरंगाबाद असा ५-६दिवसांचा प्रवास करुन परतली आहे.आपल्याकडे जसं दर दहा मैलावर भाषा बदलते म्हणतात तसंच दर शंभर मैलावर निसर्ग वैशिष्ट्ये-माती-घरं-राहणी-खान-पान असं बरच काही बदलत असतं.त्यामूळे प्रवासात असतांना बघण्यात,फोटो काढण्यातंच इतकं लक्ष असतं,वेळ जातो की त्यावेळी सुचलेलं लगेच लिहीलं जाईल याची शक्यता फार कमी असते.तरी झोपायच्या आधी विचारांच अत्तर थोडं तरी डायरीत शिंपडतेच.मग वेळ मिळेल तसं विस्ताराने लिहीते. सांगलीहून व्हाया जयसिंगपूर नरसोबाच्या वाडीकडे,तिथून अजून नदी किना-याने आतील प्रांतात खिद्रापूर कडे वळलो.वारणा-कृष्णेचा संगम सांगलीत.पुढे कृष्णेच्या किना-यावरंच नरसोबाची वाडी आणि खिद्रापूर आहे. ओतप्रोत,दमदार कृष्णा तिच्या दिमतीला वारणा,पंचगंगा..पाठीवर पश्चिम घाटाचा वरदहस्त..काळीशार-दळदार माती..तलम निळं आकाश.. वळणदार रस्ता..त्याला खेटूनंच दोन्ही बाजूंनी ऊसाची भरगच्च लागवड..दणदणीत तरारलेला हिरवागार ऊसंच ऊस पाहू तिथे..क्षितीजा पर्यंत फक्त हिरवी गोधडी.. बांधांवर ताड-माड झुलणा-या नारळी..एखादा आंबा.. ठिकठिकाणी खळखळ पाणी..ड्रिप इरिगेशन पाझरतय.. मोजकीच माणसं शेतात.. कुठेही रंगाचा बेरंग करणारी काडी-कुपाटी नाही..बाभळी-बोरी नाहीत..शेण-मुत-गोठे-नाले-पतझड नाही..एकदम सुबत्तेचं,भरभराटीचं आलबेल निसर्ग दृश्य.अगदी कुठल्याही शेतक-याला स्वप्नवत वाटेल असं. नाही म्हणायला ठराविक अंतरावर आपल्या मराठवाड्यातल्या दुष्काळी भागातल्या ऊस तोडणी कामगारांच्या उठवळ-तरटी झोपड्या मात्र आहेत,नजर लागू नये म्हणून.त्यात सध्या गळीपाचा तिथला हंगाम संपलेला.त्यामुळे साखर कारखान्याला लागलेले ट्रैक्टर्स 'पट्टा पडला'(कारखान्यात ऊस पोहोंचवायच काम संपणे) म्हणून झिरमाळ्या-रिबिनींनी टकाटक सजवलेले.आणि मागे ट्रोलीत बसलेले आपले मराठवाडी मजूर बांधव-बायका कडसरीला चार पैसे पडले म्हणून,गावी जायचं म्हणून आनंदात. माझा शेतीशी तसा काहीही संबंध नाही तरी पण काळजात चर्र झालं. महाराष्ट्रातलेच दोन भाग,दोन शेतकरी बंधू पण एकाला असं भरभरुन मिळतय तर दुसरा असा पोटासाठी कुटुंबापासून,घरापासून,वावरापासून असा दूर राब राब राबतोय.दुष्काळामुळे देशोधडीला लागणारे आपले बीड-उस्मानाबादकडचे अल्पभुधारक.आज पर्यंत ऊस तोडणी कामगारांचे जातांनाचे,येतांनाचे घुंगुरवाळे जथ्थेच फक्त पाहिले होते,ऐकले होते. आज ते ज्या भागात घाम गाळून ऊसाची गोडी वाढवतात त्या तृप्त देखणेपणातलं त्यांच रापलेलं,काळवंडलेलं,भणंग रहाणं पाहिलं आणि अक्षरशः भडभडून आलं मला.दिवस-रात्र त्या भरभराटीच्या हिरवाईत काम करतांना त्यांना तर काय वाटत असेल बरं ? कुठे ही आपल्या लेकरांसाठी अखंड वाहणारी कृष्णा,भरभरुन देणारी काळी आई आणि कुठे आपला अवर्षणग्रस्त वैराण,खडकाळ ग्रामीण मराठवाडा ? सगळे आपलेच असल्यावर असुया वाटायचं कारण नाही पण खरं सांगते इथल्या पाण्याची,मातीची,हिरव्या सुबत्तेची असुया नक्कीच वाटली आणि आपल्या भागातल्या ऊस तोडणी कामगारबंधूं विषयी अगदी पोटातंन तुटलं. जे मला जाणवलं ते राज्यकर्त्यांना जाणवत नसेल का ? P.S.इथे तर वितभर वावर सुध्दा कोरडं नाही हो..इति ड्रायव्हरकाका. हं..सधन लोकं आहेत..करा तुमच्या मुलाला इथलीच मुलगी. ...पोरगी आणली तरी आपल्याकडे टिकणार नाही हो..पैले तर बापंच देणार नाही आपल्याकडं मुलगी...कुठं हे कुठं आपण...इथला शेतकरी खरा सुखी.

No comments:

Post a Comment