Tuesday, 28 February 2017

जूनं...१


मध्यंतरी मुलगी पुण्याहून आली होती,फार दिवसांनी त्यामुळे फर्माईशवर इडली आणि सांबार करायचं ठरलं.काहीतरी कामात होते म्हटलं जरा चिंच भिजव गं..बाईंनी गोळाच भिजवला.उरलेली चिंच आणि पाणी फ्रिजमधे ठेवलं.मग गावाला जाणं झालं.पंधरा दिवसात फ्रिजमधे पण त्यावर बुरशी आली शेवटी बायकांना म्हटलं वरवरची आपली तांब्या-पितळीची भांडी धुता का ? त्याही तयार झाल्या आणि कोप-यातली ,स्टोअर मधली मोठी भांडी काढली ना चमकवून, झटपट. चकाकणा-या विवीध आकारातल्या तांब्या-पितळी बघून माझेही डोळे दिपले.म्हटल चला आता आपल्या या छंदाविषयी,कलेक्शनविषयीच काही लिहू यात.पटापट फोटो काढले आणि डायरेक्टच लिहायला लागले. हिरण्यमुळे एकूणचं आम्हाला इतिहासाची गोडी लागली आहे. त्यात मला आयुर्वेदाचीही आवड आहे.त्यामूळे जुनी बांधकामं,वस्तू,रहन-सहन,खान-पान पध्दतींच अप्रुपच आहे. आणि त्यातूनच मग सूरु झाला हा दैनंदिन जीवनातील वस्तू जमवायचा छंद.माझा एक मित्र एनर्जी कन्झर्वेशनवर काम करतो.त्याच्याशी बोलतांना कळलं आपली रोजची भांडी,त्यांचे आकार हे फार शास्त्रीय अभ्यासानुसार बनवले आहेत.थोडक्यात रोजच्या वापरातले धातू आणि गरजेप्रमाणे बनवलेली भांडी,त्यांच स्थान वैशिष्ट्य दाखवणारे त्या भांड्यांचे विवीध आकार आणि उपयोग जाणून घ्यायचा एक वेड कम् छंदच लागला. कुठल्याही निमीत्ताने कुठेही जा,एक चक्कर भांडी बाजारात टाकायचीच. निदान एक तरी भांड-वस्तु आठवण म्हणून आणायचीच. वेळ खूप जातो,पैसाही जातो.परत बरोबरच्यांची कुरकुर, आपण करतोय ते बरोबर का चूक ह्याच्याही कळा येतात अधून-मधून. संग्रहीवृत्तीचाही तिटकारा येतो कधीतरी.तरी पण या छंदापायी एक छान समृध्दी येते जीवनाला. असे अनेक संग्राहक,दुकानदार मैत्रीच्या टप्प्यात येतात.त्यांच्या बाह्यरुपावरुन काढलेले त्यांच्या ज्ञानाचे आडाखे पार मोडीत निघतात.तसंच ये तो अभी दूध पिता बच्चा है असेही वाटायला लावणारे हुषार कार्यकर्ते भेटतात.हा ऐंटिक्स् जमवायचा-विकायचा धंदा कसा चालतो याचाही थोडा अंदाज येतो. अगदी नांदेड-पुसद पर्यंत दिल्ली-मुंबई-हैद्राबादचे व्यापारी नियमीत पोहोंचत असतात.त्यामुळे माझ्या सारख्या नवख्या व हौशी बाईला जून्या वस्तू न दाखवणारे मुरलेले दूकानदारही खुप भेटतात.त्यामुळे लोकल माणसाला पकडून,ओळख काढून,खात्री देउन गोडावून मधली पोती उपसावी लागतात.माझे पांढरे केस आणि रहाणी बघून तर परगाववाल्यांना मी कुठली तरी धाड घालणारी इन्सपेक्टरंच वाटून ते बाहेरच्या बाहेरंच वाटाण्याच्या अक्षता देतात तेव्हा फार चिकाटीने खिंड लढवावी लागते.कधी दुकानदार आपल्या नवखेपणाचा फायदा घेत उल्लू बनवतात तर कधी त्यांच्या ज्ञानाचा फायदा पण होतो आपल्याला.एक जिव्हाळ्याचा ऋणानुबंध तयार होतो. मी तर येता-जाता डोकावते खात्रीच्या दुकानात.तेही कधी चांगली वस्तू आली की आठवणीने फोन करतात.माझ्या कडच्या या पोस्ट मधल्या वस्तू सरासरी ५०-६०वर्षांपुर्वीच्या आहेत.शंभर वर्षापुर्वीच ऐंटिक म्हणलं जातं.शहरांमधे गि-हाइक बघून नगावर वस्तू विकतात तर छोट्या गावांमधनं अजूनही वजनावर वस्तू मिळतात. दोन-तीन आठवड्यां पुर्वी मला एकांचा फोन आला.आपण गणपतीत एका भांड्यांच्या दुकानात भेटलो होतो.तुम्ही जूनी भांडी जमवता नं ? माझ्याकडे आहे एक मोठा हंडा.या एकदा घरी बघायला.आवडला तर घ्या विकत.लगेच घरी गेले.मुलं परदेशी असलेले..पोक्त आई-वडील.पैठणचे..पैठण वर तुडूंब प्रेम असलेले. पैठणचा छप्पा-छप्पा माहित असलेले.शेती-चिरेबंदी वाड्याचे मालक. तो हंडा राहीला माळ्यावर पण आम्ही आता एकत्र पैठणला जाणार आहोत.जूने वाडे,गल्ल्या,वस्तू बघणार आहोत.तसचं नाथ षष्ठीचा छबिना-जत्रा,त्यांचं शेत-घरचा पाहूणचार... program is fixed.निघायचाच अवकाश. So all in all...मजा येते हे सगळं माहित करुन घेतांना,जमा करतांना,घासून-पुसून घेतांना(ताई..तुम्हाला लयचं आवडं हाय काईपण जमवायची.घासू-घासू हातं दुखू -हायलेत...वाढवा आता पैशे!)फोटो काढतांना,फेसबूकवर पोस्ट करतांना देखील. तर आज आता एवढचं.प्रत्येक फोटो बरोबर थोडी माहिती देईनंच.पण बाकी अनुभव परत कधी.

No comments:

Post a Comment