माझी या आधीची पोस्ट ग्रामीण भागात दारुमुळे कीती कौटुंबीक दुरावस्था होते या विषयीची होती.तर आज जरा त्या पिण्यातली गंमत सांगणारी घटना सांगते.
आम्ही दोघही नवरा-बायको या वर्षीचं स्वागत करायला म्हणुन दोन दिवस जळगाव जिल्ह्यातल्या पाल अभयारण्यात मुक्कामी गेलो होतो.आडरानातल्या,आडबाजूच्या भटकंती नेहमीच विविध रंगी-ढंगी असतात.खरंतर गेल्या दोन महिन्यात खुप भटकंती झाली आहे पण इतके बैक टु बैक इव्हेंट्स आणि फिरणं चालू आहे की सलगपणे लिहायला वेळ मिळत नाहीये,मुडही लागत नाहीये.पण आधीच्या लिखाणावर जरा वेगळा उतारा म्हणून हे लिहीत आहे.
वन विभागाच्या रेस्ट हाऊसमधे आमचा मुक्काम होता.
ऐस-पैस डोंगरावरचं ठीकाण.महाराष्ट्र-एमपी बॉर्डरवरचं.पोहोंचे पर्यंत रात्र झाली.पहिलाच सुखद धक्का म्हणजे दोन मिनिटांच्या अंतरावर ऊरुस भरला होता.आत्माराम खुष झाला.जत्रा त्यात ऊरुसाची..सोने पे सुहागा.
महाराष्ट्राच्या या टापूत मुस्लिम समाज खुप आहे.बहूदा जवळच्याच बुरहानपूर मुळे असेल.मुगल राजवटीचं,शहाजहानच्या कारकीर्दीतलं महत्वाचं ठिकाण होतं बुरहानपुर.
लगोलग एक चक्कर मारुन आलो.रात्री मुशायरा होता पण नाही गेलो.सकाळी मात्र लवकर निघून अदिवासी पाड्यांवर,गावांमधे फिरायच असं ठरलं.आमच्या दिमतीला माहितगार म्हणून पावरा समाजाचा काशी नावाचा उत्साही माणूस मिळाला.तो इथे पगारी पडेल ते काम व वॉचमनगिरी करतो.
सकाळी तयार होऊन निघालो तर किडकिडीत,काळा पण स्वच्छ हसणारा काशी बायकोला घेऊन आलेला.म्हणला हिला जरा बरं हिंदी येतं,ती पण येईल आपल्या बरोबर.भाषेची जरा अडचणंच आहे इथे.काम अडत नाही पण गप्पा होत नाहीत.बाईंच नाव क्यारी..हसरी..आनंदी.चला म्हटलं की दोघंही टुणकन गाडीत मागे बसले..एकमेकांना खेटून.
गप्पा मारत..ठिकठिकाणी थांबत,पावरा लोकांचे,जंगलाचे फोटो काढत चौकश्या करत निघालो.
काशी उतावळा,बालिश खुदूखुदू हसणारा तर क्यारीबाईपण तोडीस तोड हसणारी,डोळे मिचकवणारी..बिनधास्त बोलणं..नव-याशी पण, आमच्याशी पण.आम्ही आपले आवाक्...कुठलंही बुजलेपण नाही..नवखेपण नाही.मनात म्हटलं हे पावरे जरा मोकळे-ढाकळेच दिसताहेत कारण रस्त्यात ब-याच तरुण बायका-मुली पायी बाजाराला निघालेल्या दिसल्या.साडी नेसायची पध्दत पावरांच...डोक्यावरनं ओढणी घेऊन पण ओठ मात्र भडक रंगवलेले.नवलंच वाटलं.
जरा पाव-यांचे रीत-रिवाज,लग्न पध्दती,पंचायत विषयी त्यांना बोलकं करत होते.
दोघही पुर्ण अशिक्षित..५ मुलं..सगळे विवाहीत..धाकटा फक्त सातवी पर्यंत शिकलेला..पण नातवंड मात्र सगळी शिकताहेत.
लहान वयात लग्न होतात.घरदार-मुलाचं चाल-चलन,खेती-बाडी बघून लग्न ठरवतात.मुलाकडच्यांना मुलीच्या बापाला पैसे द्यावे लागतात..
बोली ठरते.पटलं तरंच लग्न ठरतं आणि मग लग्नात जेवण आणि पिंपातून दारु वाटली जाते व-हाडींना,गावाला.
स्त्री-पुरुष सगळेच जमके दारु पितात..भरपूर नाचतात फेर धरुन.
कोण कीती दारु पाजतो हा मोठा इभ्रतीचा इश्यु असतो.हे सगळं दोघही हसत-खिदळत,चेव आल्यासारखं सांगताहेत.
...अरे बापरे..औरता भी दारु पिते क्या ?
हां..फिर...दारु नई पियेगी तो वो नाचेगी कैसी ? और नाच नई तो शादी कैसी ? इति क्यारी डोळे मिचकावून.
धमालंच आहे.
...तो काशी..क्यारी के पिता को आपने कितना पैसा दिया शादी के टैम ?
रोमांचित होऊन हसत..मैने भोत कम दिया..सिर्फ सतरासो रुपिया और दो पिपा दारु...अबी तो जादा पैसा देना पडता..दारु बी जादा लगती.१५०००-१८०००-२०००० रुपिया लगता.
और लडकी अच्छी हुई तो उसका बाप और जादा पैसा-दारु मांगता...
...इसका मतलब क्यारीबाई अच्छी नही है,जो सतरासोमें लाये हो ?
परत एकमेकांकडे बघत मुरकून हसणं दोघांचही.
और १३-१४ साल ये उमर है क्या शादी की ? क्यों क्यारीबाई ?
तो फिर ? जल्दी शादी ना करो तो लडकी भाग जाती किसिके साथ भी...(परत खसखस हसू)फिर पंचायत में झगडा करना पडता है..पैसा भौत लगता छुडानेको..
उस्से अच्छा पैलेच अच्छा लडका,खेती-बाडी देखना,
अच्छा पैसा-दारु लेना और शादी कर देना.
...क्युं काशी...रोज का पिना है क्या तुम्हारा ?
परत खळखळून दात दाखवत..लाजत..अभी-कभी-थोडा-थोडा...
...क्यारी..तुम झगडती नही काशी से ?
रोज दारु..रोज पैसा गवाना..झगडे नही होते तुम्हारे ?
झगडे काय कू ? दारु पियेगा तो सो जाये गा..
हमारे इधर दारु पिके कोई नई झगडता..गाली देना-तंटा करना कुछ नई होता..
शाम को दारु पिया,मच्छी खाया की सो जाना..
दारु पिया की आदमी सो जाता है..हम नई झगडते.
बाईंनी माझी समजूत घालावी अश्या अविर्भावात मलाच ऐकवलं.
एवढ्यात नव-याने समयसुचकतेने खाकरुन घेतलं !
गप्पा मारत..बाजार,गावं,शेतं,जंगल बघत शिरवेल(MP)पर्यंत मजल मारली.परततांना शिरवेल गावात पावरा साड्या मी खरेदी केल्या.क्यारीची इच्छा दिसली मी तिला साडी घेऊन द्यावी म्हणून पण मी बधले नाही.
सकाळी उत्साहात खळखळणारी जोडी आता बरीच शांत झालेली.माझ्यावर नाराज झाले असं मला वाटलं.जत्रेत तिलाच घेऊन फिरले.तिच्या छोट्या नातीही आमच्या बरोबर फिरल्या.त्यांना माळा घेऊन दिल्या.क्यारीला एक स्टिलचा डबा आवडला पण पैसे नव्हते.तर तिला तो डबा घेऊन दिला.तरी ब्याट्री आपली डाऊनंच.काशीलाही काही पैसे दिले तर स्वारी काळ्या पिशवीत मासे आणि खिशात क्वार्टर टाकून चार्ज होत तुरु तुरु घरी गेली.
सकाळी निघालो.गाडीत त्यांच्या विषयीच बोलत होतो तर ड्रायव्हर म्हणाले मैडम ते दोघंही काल सकाळी घेऊनंच(दारु)आले होते.काशीनीच सांगीतलं मला.आणि काल रात्रीही दोघांनी घेतली इथे ओट्यावरंच.झोपलेही इथेच.आत्ता सकाळी घरी गेले.
तर कालच्या त्यांच्या मोकळ्या-ढाकळ्या वागण्याचं हे इंगित होतं तर ?
तरीच संध्याकाळी इतके डिसचार्ज झाले होते दोघंही जणं.
No comments:
Post a Comment