आमच्याकडे पुर्वी हुरडा पार्टीतच कामाला येणा-या एका वयस्क विधवा बाईंच निधन झालं मध्यंतरी.त्यांचा मुलगा, दोन्ही सुना आमच्याकडेच कामाला आहेत.तसेच त्या गाव कम् वस्तीतले ३-४ पुरुष,६-७ बायका पण नियमीत येत असतात कामाला आमच्याकडे.या गावातनं जेव्हा एक पहिली महिला ९७ साली आमच्याकडे कामाला आली तेंव्हा तिला गावातनंच बराच त्रास झाला,सोसावं लागलं होतं.पण आता मात्र या महिला खुप विश्वासाने,आपलेपणाने येतात कामाला.
जुने संबंध आहेत गावाशी-गाववाल्यांशी.मी महालक्ष्म्या ज्या दिवशी जेवतात त्या दिवशी ह्याच गावात असते.घरोघर दर्शनं व भेटीगाठी घेत सगळ्यांच्या घरी जाते.तर शांताबाई पण त्याच वेळेस या वर्षी भेटल्या.. शेवटचं.
थकलेल्या..आजारी..ओट्यावरंच बसल्या होत्या.नजरेनीचं ओळख दाखवली..थोडंसच बोलल्या..माझी दोन पाखरं तुमच्या ओटीत टाकलीत..सांभाळून घ्या बरं.
शांताबाई आणि त्यांची सख्खी बहिण एकाच गावात रहातात.दोघी जणी फक्त हिवाळ्यातंच कामाला यायच्या.भरीताची वांगी भाजणं आणि नंतर चुलीपाशी बसून दिवसभर भाक-या टाकत रहाणं हेच त्यांच काम.
जवळचं त्यांच गाव.घाटातल्या रोडने आलं तर दूर पडतं,पण डोंगर उतरुन पायी आलं तर जवळ पडतं आणि गाडीची वाट पहाण्यात वेळ जात नाही.तर येतांना ही बहुतेक मंडळी पायीच येते पण संध्याकाळी जातांना मात्र काळी-पिवळीने जातात.रात्र झाली तर आम्हीच सोडतो.
तर एकदा या बाई जातांना डोंगरात फिरत होत्या काय करताय विचारलं तर म्हणाल्या जाता-जाता सरपण नेते ना.उद्याच्याला काही नाहीये घरला.
म्हणजे बघा सकाळचं घरचं आटोपून हिरण्यला पायी यायच..दिवसभर चुलीजवळचा कामाचा रगाडा..जातांना इथल्या-तिथल्या डोंगरातल्या काटक्या-कुटक्या जमा करत..भारा डोक्यावर घेउन डोंगर चढत घरी.परत घरची कामं.वय साठीच्या पुढचं.मला फार आश्चर्य वाटलं त्यांच्या त्या सहज कष्ट करण्याच्या वृत्तीचं.कालांतराने त्यांचा मुलगा,सुना स्थिरावले आमच्याकडे,मग मात्र या घर आणि नातवंड सांभाळत घरीच राहू लागल्या.
दोन-तीन दिवस झाल्यावर भेटायला गेले..संध्याकाळची.निटसं घर पण मिणमिण उजेड.ब्राह्मणाकडून गरुड पुराणाचं वाचन सुरु होतं.वयस्क नातलग बायका बसलेल्या.वाचन संपवून ब्राह्मण गेला.त्यांच्या आठवणी काढून थोडं बोललो.मुलींनी आईच्या कष्टांचे पिळे उकलले.मग गावातल्याच इतक्यातल्या इतरजणांच्या मृत्युंबद्दल बोललो.आमच्याकडे अगदी पंचवीशीलाही न पोहोंचलेल्या दोन-दोन पोरांच्या आया असलेल्या २-३ विधवा मुली कामाला आहेत.प्रौढ विधवा पण आहेत.खोलीत शांताबाईंच्या मुली,सुना,जावा,बहिणी बसलेल्या.तर गावातले बहुतांश मुलं-पुरुष दारु पिऊन,आजारी पडून,आत्महत्या करुन गेलेले,म्हातारे खाकत-खोकत खाटांवर.ह्यांचाही नवरा दारुग्रस्तच होता.सगळा संसार या बाईंनी कष्टाने,उपाशीपोटी रेटलेला.तिथे बसलेल्या एका बाईंना तर चार मुलं पण सगळे गेलेले त्यातले तिघं दारुनेच गेलेले.म्हातारे आई-बाप रेटताहेत सुना-नातवंडांचा गाडा.खरंतर गाव इतकं लहान आहे की तिथे कुठलंच दुकान नाहीये पण आपल्या गावबंधूंची दिवसरात्र सोय लावायला घरातूनंच विक्री करणारे संधीसाधू इथे आहेत.एकेकीचा तळतळाट ऐकून सुन्न झाले.
चिडीचुप छोटं गाव..अंधारलेलं घर..पिवळ्या उजेडातल्या,त्या दुःखी खोलीत,आयुष्यातलं इतकं कहरी अवर्षण पचवलेली जूनी खोडं...
काष्ठवत झालेली शिशवी शरीरं..रापलेले हात-पाय..शरीरभर जुन्या-नव्या दुःखाच्या सुरकुत्यांच गोंदण..धुरकट चष्म्याआड नजर हरवलेले डोळे..एका अपार हतबलतेची,अपरिमित कष्टांची स्थितप्रज्ञ मुर्ति.
त्या दारुच्या तडाख्यातनं कुणीही न सुटलेलं..वय वर्ष वीस ते सत्तर..सगळ्याजणी दारुच्या समग्र दशावताराला साक्षी राहिलेल्या..भरडल्या गेलेल्या...
म्हटलं तर खंबीर,म्हटलं तर कोलमडलेल्या...
आपल्याला इतकी आच लागत नाही त्या बेताल दारु पिण्याची पण ह्या वितभर गावात..टिचभर खोलीत मला त्या दारुचं भयानक बिभत्स रुप दिसलं.
स्वतः व्यसनी होतं झिजत,विकृत होऊन संपायचं आणि दुसर्यांचाही जीवनरस शोषून त्यांनाही उध्वस्त करायचं!
अक्षरशः गलबलून आलं त्या महिलांना बघून.
म्हणजे निसर्गातलेच दोन जीव..स्त्री आणि पुरुष.पण एक अत्यंत बेजबाबदार..स्वनाशाकडे जाणारा तर दुसरा अतिशय सोशिक,कष्टाळू,चिवट आणि आहे त्यातनं भरारी घेणारा..उद्याची उमेद देणारा.
No comments:
Post a Comment