नविन वर्षातला पहिला असा सोमवार जो आरामात घालवत आहे.दिवसभर घरातच. शेवटी आळस झटकून जवळच तुडुंब भरणा-या आठवडी बाजारात फळं आणायला म्हणून गेलेच.हल्ली दोन्ही मुलं पुण्यात आहेत व जरा प्रेमात आहेत त्यामुळे मी जे काय खाद्यपदार्थ काळजीयुक्त प्रेमाने पाठवत आहे त्याचा आदरयुक्त प्रेमाने स्विकार होत आहे.त्यामुळे जैम,जेली,लोणच्याचा धुमधडाका सुरु आहे.तर कवठाची जेली करावी म्हणून या बाजारात गेले.हमरस्त्यावरचा लोकप्रिय आठवडी बाजार..माणसांची,वाहनांची,हातगाड्यांची खुप गर्दी...पण भरपूर भाज्या,फळं चांगली व स्वस्त मिळतात म्हणून सर्व थरातले लोकं अवश्य येतात.त्यात अजून थंडी मग काय विचारता? नुस्त्या राशी आहेत फळांच्या,भाज्यांच्या.
अंधारलेलं,गर्दी,बाजार संपण्याचा गोंगाट..बाहेर-बाहेरुनंच जरा फळं-भाज्या घेतल्या आणि कवठांचा मागोवा घेत फिरले तर एका ठिकाणी खरबूजं वाटावीत अशी कवठं होती..भाव विचारला,थोडी घासाघीस, केली,उत्तम दर्जाची आहेत ना हे विचारलं..भाजीवाला पांढ-या केसातला पोक्त माणूस..प्रश्नांची उत्तर देतांना अचानक थांबला आणि म्हणाला..कोटला कोलनी?..पाध्ये?
अरेच्या तुम्ही कोण ?
मी भाजी विकायला यायचो ना पुर्वी कोटला कॉलनीत..
होका..काय नाव तुमचं ?
भाऊराव आहे पण बाबू म्हणतात मला..खुप वर्ष यायचो मी तिथे...xyz नावं घेतली..काही जणं घरी पण येऊन गेलेत माझ्या.
मग आता काय करता ?
सोमवारचा इथला आणि छावणीतला गुरवारचा बाजार करतो फक्त..हा माझा मुलगा..चार मुलं आहेत मला...
पण तुम्ही मला कसं ओळखलं हो ?
तुमच्या आवाजावरुन ओळखलं तुम्हाला...काका कशेत..भेटायचे अधून-मधून..
हं..बाबा गेले..आई तर आधीच गेली..
पुन्हा थोड्या गप्पा,कवठांची खरेदी करुन चकीत होऊन निघाले.
७० ते ८५च्या दरम्यान हा भाजीवाला गाडीवर भाजी विकायला यायचा.केवढी मोठी ती कोटला कॉलनी.दोनशेच्यावर कुटुंब. घरटी २-३मुलं व निदान तीन तरी प्रौढ व्यक्ती.गृहीणी असलेल्या आया आम्हाला अशी किती वेळा भाजी घ्यायला सांगणार? आणि आमचही वय कसलं ? सांगकाम्याचं!पैसे द्यायचे आणि उचलायची सांगीतलेली भाजी.आणि या बाबू भाजीवाल्याला ३५-४०वर्षांनंतरही इतक्या गोंधळी रेटारेटीत माझा आवाज ऐकून तक्षणी ओळख लागावी याची मला गंमत आणि कौतूकही वाटलं.स्त्री सुलभपणे जरा साशंकही झाले.बरं असही नाही की फार जगावेगळा चिरका,घोगरा,भसाडा आवाज आहे लक्षात रहायला.But he could recollect it so instantly. Amazing!
मनातनं हेलावले.किती साधी छोटी(?) माणसं आपल्या आसपास वावरत असतात.निमित्ताने आपल्या सहवासात येतात आणि आठवणींच्या शिदोरीत अडगळीला पडतात.तेव्हा नगण्य वाटलेली माणसं बदललेल्या काळामुळे,मानसिकतेमुळे किती जिव्हाळ्याची वाटतात.And they evoke so many memories and can connect you to the gone era.कुणीतरी कुठे तरी भेटतं आणि मग त्या गत काळाला उजाळा दिला जातो.त्याकाळातले सरकारी दुकानदार,रॉकेलवाले,फळवाले,पेपरवाले,ब्रेडवाले,देवाच्या फुलपुड्या वाटणारे..कुठे असतील हे सगळे ?कॉलनीतला सगळा काळ डोळ्यापुढे आला..आई-बाबा-भावंड-मित्र-मैत्रीणी आठवल्या..आमचे परिचीत आठवले.काही असतील,नसतील..मागोवा काढावा त्यांचा. छान वाटेल नाही ?
माझी आई शिवण शिवायची तेव्हा आठवड्यातनं दोन वेळातरी गावात(बाजार)जाणं व्हायचंच.सुया,दोरे,बटणं,लेसेस आणणं तसेच काजं,पिको,ओव्हर लॉकिंग या कामांसाठी ठराविक दुकानातंच जावं लागायचं.जाणं-येणं सगळं पायी.मी तर खुपदा जायची आई बरोबर गावात.मोजकीचं दुकानं त्यामुळे विक्रेते आणि खरेदीदार छान ओळखायचे एकमेकांना.तर आता मी कधी त्या दुकानात जाते तर तेव्हाचे तरुण दुकानदार आजही पाध्येबाईंची मुलगी म्हणूनच मला ओळखतात.आणि मी सुध्दा जवळपासची दुकानं सोडून तिथेच जुन्या दुकांनामधे जाते.त्या जुन्या पाय-यांवर उभं राहिलं की आपण आपल्या आईचा काहीतरी चांगला वारसा चालवतोय आणि देणं फेडतोय या भावनेनी मला अपार शांती मिळते.कदाचीत त्यांनाही छान वाटत असेल ना की त्याबाईंची मुलगी सुया-बटनं-दोर्यांशी-रेशमांशी अजूनही ह्रद्य ऋणानुबंध ठेवून आहे म्हणून!
कुणाचे कोण ? म्हटलं तर काही संबंध नाही. पण वाटुनंच घ्यायच म्हटलं तर आपण सगळेच एका अगम्य ऋणानुबंधाने बांधले गेलेले आहोत.क्षणाक्षणाने इतिहास होणारा हा काळ खुप काही गिळंकृत करतो पण पदरात हे आठवणींच सदावर्तही टाकतोच नाही का ?नाहीतरी पांथस्ताला अजून काय हवं असतं हो पुढची मजल गाठायला?
No comments:
Post a Comment