Wednesday, 7 December 2016

देणं...

मधे दिवाळीत एका मैत्रीणीने जुने-यातनंच करवून घेतलेल्या १०-१२ गोधड्या आणून दिल्या.माझ्या आवाहनाला प्रतिसाद देत. माझ्याहीकडे १२-१५ गोधड्या होत्याच.थंडीचाही कडाका वाढलाय.तर आज ठरवून अनाथ मुलींच्या वस्तीगृहाला भेट दिली.
वय वर्ष सहा ते अठरा पर्यंतच्या मुली इथे रहातात व बाजूच्याच संस्थेच्या शाळेत शिकतात.बालिकांपेक्षा तरुण मुलींच जास्त प्रमाण.पुर्णतः अनाथ,एक पालक असलेल्या,दोन पालक असलेल्या मुली.अख्ख वसतीगृह कडेकोट जाळीबंद व कडीकुलपात.लोकप्रिय देवस्थानांसारखं.चहूबाजूंनी खोल्या मधे मोठा मोकळा चौक.चौकात मुली खेळताहेत,उन खाताहेत,एकमेकींच्या उवा काढताहेत...आज दुपारी त्यांच गैदरिंग आहे.वर जायचा जिना सुध्दा कडेकोट,कुलुपबंद.किल्ल्यांचा तर हा मोठ्ठा,जडच्याजड डब्बा.कॉमन हॉल,संडास-बाथरुम उघडं पण स्वैपाकघर,लहान मोठे स्टोअर्स,शिवण खोली,झोपायचे हॉल,कॉम्प्युटर खोली,पेटी खोली,दप्तर खोली...बरचसं कुलुपबंद.
फक्त झोपायला बंकर बेडयुक्त मोठे कॉमन हॉल,तर पेटी खोली म्हणजे क्लोक रुमसारखी सर्वांच फक्त सामान ठेवायची सामूहिक खोली.इतकं कडेकोट का तर मुली मग सारख्या पांगतात म्हणे.पाचवी पुढच्या मुली स्वतःच कपडे धुतात.जेवणाची भांडी धुतात.गरज पडलीच तर स्वैपाकघरातही वरची मदत करतात.शिवण,कॉम्प्युटर शिकवायला बाहेरचे शिक्षक येतात,काऊंसेलर्सही येतात संवाद साधायला.
का कुणास ठावूक..not getting connected.
कडेकोटपणाच दडपण आलय का समजत नाही.
मोठ्या मुलींना बंकर बेडस्,गाद्या आहेत.लहान मुलींना फक्त चटया.लहानांसाठी म्हणून गोधड्या सुपूर्त केल्या.

अश्या ठिकाणी खुप जणांकडून तरतर्हेची मदत केली जाते.पण किती गोष्टी,पैसे पुर्णपणे गरजुपर्यंत पोचतात कळत नाही.देताना भरुन पावतो आपण पण माघारी काय होतं पत्ता लागत नाही.सगळ्या गोष्टी विश्वासाच्या.
तरीपण हल्ली अशा मदती करताना मनात जरासा किंतुच असतो हे मात्र खरं.स्वतःशी प्रामाणिक रहात आपल्याला पटतं ते देणं देत रहावं.
अशा कडीकुलपात वाढलेल्या व्यक्ती पुढील आयुष्यात किती विश्वासार्ह निघतील किंवा दुस-यांवरही किती विश्वास टाकू शकतील बरं ?
मुलींशी गप्पा मारायला परत येईन असं हेड सिस्टरना म्हटलं खरं पण बाहेर आले ती निर्लेपच !
बघू पुढे.

No comments:

Post a Comment