Saturday, 3 December 2016

हळवे..दुखरे कोपरे...

RYE'sना घेऊन एक दिवसाची ट्रिप पैठण रोडवर.झाडांची नर्सरी,वृध्दाश्रम आणि विकलांग मुली-मुलांच्या शाळेला भेट.
माझ्या मित्राची विस्तीर्ण नर्सरी..उंच्यापु-या झाडात लपलेली.विविध प्रकारची फळ,फुलं,पानांची रोपं.
देशी-विदेशी..रंगाने न्यारी..रुपाने निखारी..सावलीने प्यारी तर गुणांनी बहारी.प्रशस्त ग्रीन हाऊस फुललेलं..ताजं तवानं.
फॉगची तृषार्त मजा..ट्री हाऊसवर जेवण..
हिरवाईचा निरोप.

वृध्दाश्रमाच्या दारात..दाराशीच देखणा वटवृक्ष वृध्दाश्रम पोटाशी घेऊन ऊभा..परिसरात फेरफटका...
वृध्द स्त्रियांना नमस्कार..राम राम करत...
आपापल्या बिछान्यावर खोकत-खाकरत..येथेच्छ वैयक्तिक पसा-यात पडलेल्या,बसलेल्या..एकीने वेलकम म्हणून स्वागत केलं..खोलीत बोलावलं..तोकडं इंग्लिश..पांढरी पडलेली अविवाहीता..खुटखुटीत..लोभसं..sit..sit...old age is very bad.Come again.
१०४ वर्षांच्या हस-या,गुटगुटीत आजी..चमकदार डोळे..
एकच मागणं..उचल आता..किती जगू ?
लई कंटाळा आला गं माय आता म्हणत हात जोडले.
आंध्रातल्या आजी हरवल्यासारख्या..भाषेच्या प्रश्नासह अख्ख्या जगण्याचंच प्रश्नचिन्ह चेह-यावर घेऊन ऊन खात बसलेल्या...

पस्तीशीचा कनवाळू मेनैजर...
पुरुषांपेक्षा बायकांच प्रमाण जास्त इथे..सुनांशी न पटणं हे मुख्य कारण..शुल्लक गोष्टी,पण आई का मी ?च्या निवडीत आई इथे पोहोंचते.सुरवातीचे २-३ आठवडे बावरतात,मग रमतात,रुळतात,स्थिरावतात,रुसतात,भांडतात...
कधी काहीजणं परतही जातात पण २-३महिन्यातंच परत फॉर्म भरतात इथला.
बहुतांशाचा मृत्यु इथेचं होतो.दहनही इथेच होतं कारण बॉडी न्यायलाही कुणी येत नाही.अधून-मधून एखादीचा मुलगा येतो भेटायला.सुनांचा तर प्रश्नच येत नाही.

बायकांची संग्रही वृत्ती फार..कपाटं,बिछाने ओसंडून वाहतात.खाद्यपदार्थ सडतील पण कुणाला देणार नाही.खुप आवरावा लागतो महिलांचा जनरल वॉर्ड(पैसे न भरता रहाणारे) वेळ प्रसंगी रागवावं लागतं.भांडतात,तुझं-माझं करतात.त्यामानाने पुरुष जुळवून घेतात.संग्रही नसतात त्यामुळे टाप-टीप वाटतात.महिलांच्या खाण्याच्याही तक्रारी जास्त असतात.
परिचितांपेक्षा अपरिचितांना भेटायला,बोलायला जास्त आवडते.शाळेची मुलं आलेली आवडतात.पुर्व आयुष्यात रमतात.तेच तेच परत सांगतात.पण ह्यांच कोणी ऐकून घेतलं की बरं वाटतं.घरी यांच कोणी ऐकून घेणारं नसतं हाच खरा प्रॉब्लेम आहे वृध्दांचा.
इतक्या वृध्दांचे(मेनैजरच्या मते ११२ आई-वडीलांचे)आशिर्वाद मेनैजरला मिळताहेत.ते इथे काम करुन कृतार्थ आहेत.
RYE's कधीच बाहेर पडलेत मीच जरा रेंगाळत,घुटमळत निरोप घेतला.

डोंगर पायथ्याशी धुळकट रस्त्याने ग्रामीण विकलांगांच्या निवासी शाळेत. मुक-बधीर व शारीरिक व्यंग असणा-या लहान मुलांची शाळा.सुंदर लोकेशन..शाळाही छान किलबिलणारी.अपंग आहेत म्हणून उत्साहीपणात जराही उणीव नाही.कष्टाळू शिक्षक..आमची गोरटेली मुलं खुप रमली..जन्मजात अपंगत्व घेऊन आलेली ही अत्यंत गरीब घरातली ग्रामीण मुलं..
निवासी शाळा..एकदा मुलाला शाळेत घातलं की बरेच आई-बाप फिरकत पण नाहीत पुन्हा इकडे.
किडकिडीत,नकोशी,अपंग मुलं..कसं होणार यांच ?
आमच्या गो-या गोमट्या मुलांना बघून शाळा हरखली..
खाणा खुणांनी तुडूंब बोलली..मोकळेपणानी खेळली.

उतरती उन्हं..पाठीशी डोंगर..आणि भवताली ही निरागस आनंदी फुलपाखरं...दिवस सार्थकी लागला.
निरोप घेतला.

डोंगरा जवळ गेलो..चिंचोळी व्हैली..छोटासा तलाव..निळं आकाश..अगदी निरव,स्वच्छंद,निरभ्र कोपरा...निसर्गाच्या कुशीतला..मन प्रसन्न झालं..वृध्दाश्रम आणि शाळा बघून आलेलं दुखरेपण,हळवेपण कमी झालं...
मुलं सुसाट डोंगर माथ्यावर गेली..मीही स्वमग्नपणे तलावातली प्रतिबिंब टिपत फिरले...

सुर्य अस्ताला जातोय..सुवर्णांकीत डोंगर सावळताहेत..
चोर वाटांनी गारवा आलाय..चरायला गेलेलं गोधन घराच्या ओढीने परतू लागलयं...
दुरवर जाणारा घुंगरांचा आवाज आणि हेमरंगी गोधुलीत
दिवस मावळला.
परतलो.

No comments:

Post a Comment