Tuesday, 13 December 2016

जेली पेरूची...

सगळ्याच फळांचे जैम किंवा जेली होत नाहीत.ज्या फळात पेक्टिन जास्त असते त्या फळांच्या जैम-जेलीज् छान होतात.
त्यातही काही फळं जैम साठी सहसा वापरली जातात तर काही जेली साठीच.जैम म्हणजे फळांच्या बारीक फोडी लिंबू रसाबरोबर साखरेसह एकजीव शिजवणे तर जेली म्हणजे फळांचा अर्क काढून साखरेत लिंबू रसाबरोबर शिजवणे.जैम मगजदार होतात तर जेलीज् चकचकीत पारदर्शक होतात.
नैसर्गिक मोसमी ताजी फळं,लिंबू,साखर व शिजवण्याचं योग्य प्रमाण असलं की हे पदार्थ वर्षभर टिकतात.

मी स्वतः आंबा,अननस,सफरचंद व मिक्स फ्रुट जैम(संत्री,पपई,केळी,द्राक्ष,अननस) नेहमी करते तर पेरु,कवठाची जेली पण नेहमी करते.जांभूळ,आलुबूखारची जेलीही छान होते म्हणतात.
तर थंडीत मी पेरूची जेली करतेच करते.एकतर औरंगाबादला हिवाळ्यात पेरू मस्तच मिळतात आणि आमच्या हिरण्यच्या हुरडा पार्टीत आम्ही रानमेव्या मधे इतर गोष्टींबरोबर पेरू पण देतो.
कच्चे,पक्के,दोडे पेरू हिरण्यला खुप खाण्यात तर येतातच पण रविवार-सोमवार उरतातही बरेच.त्यामुळे २-३वेळा जेली करून होते.कुणाकडे गेलं की आवर्जून देते ही मोहक जेली, कारण पेरूची जेली सहसा केली जात नाही.

अर्ध कच्चे,पिके मोठे(५-६) पेरू धुवून घेणे.बारीक चिरून फोडी बुडतील एवढ्या पाण्यात मंद फ्लेमवर मऊ शिजवून घेणे.
शिजलेला मगज पातळ कपड्यात चक्क्यासारखा बांधून पाणी गाळून घेणे.पाण्याच्या ३/४प्रमाणात साखर आणि ४-५लिंबांचा रस पेरूच्या सत्वयुक्त पाण्यात टाकून जड कढईत गरम करायला ठेवणे.साखर विरघळेपर्यंत सतत हलवत रहावे.नंतर मंद-हाय फ्लेमवर सतत लक्ष देत अधूनमधून हलवत रहाणे.
मिश्रणाचा रंग बदलत गडद होत जातो.मिश्रण आटते पण.
अधूनमधून मिश्रण थाळीत थोडं टाकून फुंकर मारून गार करावे.ओघळ न जाता मिश्रण जागीच लपलपले तर जेली झाली असे समजावे.(इथे जरा अनुभवंच कामाला येतो)
मिश्रण जरा कोमट झाले की बरणीत भरावे.
सुंदर रंग,स्वादिष्ट चव आणि चित्तार्षक काचेरी चकचकीतपणामुळे ही जेली आपण केली यावर विश्वासंच बसत नाही.

चमच्याचा स्पर्श झाला की ही गही-या मधी रंगाची लपकेदार काच थरथरली की अक्षरशः रोमांचित व्हायला होतं.आणि मनोमन सलाम केला जातो त्या मानवी जिज्ञासू वृत्तीला ज्यामुळे हे असे आणि अनेक पाकशास्राचे थोर शोध लागलेत!

No comments:

Post a Comment