Saturday, 17 December 2016

योगायोग...

फेसबुकवरच्या मित्रयादीतले एकजण चित्रपट,त्यातील कलावंत,गाणी,संगीत,फोटोग्राफी,डायरेक्शन या विषयी फार मनस्वीपणे लिहीत असतात.मी स्वतः फार चित्रपट वेडी नाहीये.आणि जे काही चित्रपट बघते तेही फार मनलावून किंवा अभ्यासूपणे बघत नाही.त्यामुळे सहसा काहीही आवडतं तरी किंवा काहीच आवडत सुध्दा नाही.
पण यांच लिखाण आवर्जून वाचते.रसिकपणे,अभ्यासपूर्ण लिहीलेलं वाचतांना मजाही येते आणि जरा संस्कारही होतात.

तर त्यांची एवढ्यातली पोस्ट देव आनंदच्या 'तेरे घरके सामने' या चित्रपटा विषयी होती.सध्या त्यांनी देवसाब विषयीच लिहायचा सपाटा लावला आहे.त्यामुळे प्रत्येक पोस्ट देव आनंदच्या दिलथाम रोमेंटिक नजाकतींनी भरलेली.
वाचताना कळलं तेरे घरके सामने हा सिनेमा १जानेवारी १९६३ला रिलिज झाला आणि तुफान यशस्वी पण झाला.सदाबहार देव आनंद,मोहक नुतन,सुंदर गीतं, चाली,आवाज...रोमांसची शेकोटीच पेटली जणू.
तर पुढे वाचताना 'देखो रुठा ना करो' हे लता,महमद रफीचं गुणी गाणं याच चित्रपटातलं आहे हेही कळलं,आणि सुखद धक्काच बसला.
माझ्या तरुण वयात (म्हणजे टेप रेकॉर्डर, टीव्ही,मोबाईल नसण्याचा काळ) कधीतरी दोन,चारदा रेडिओवरुन कानावर पडलेलं हे गाणं,पण का कुणास ठावुक मला फार आवडलही व मनातही गुंजत राहीलं...अगदी आजतागायत.
माझ्या जन्मदिवशी-वर्षी रिलिज झालेला हा जूना सिनेमा मी तेव्हाही पाहिला नव्हता,लिरिक्सही फार कळत होते असही नाही,गाण्याशी निगडीत असा कुठला अनुभवही नव्हता पण या फक्त ऐकीव गाण्याने मनावर काय जादू केली माहीत नाही.हे गोड,लाडीक गाणं असं काही अनाहतपणे मनात रुंजलं की वो आजभी अपने जिगर के पासही है ।
अर्थात सगळं क्रेडीट गीतकार,संगीतकार,गायकांनाच !

असतात नाही काही योगायोग विस्मयकारकरित्या सुखदायक !

No comments:

Post a Comment