ग्रामीण भागात जेवण झालं का ऐवजी भाकर-तुकडा खाल्ला का असं विचारलं जातं तर त्राग्याने,वैतागाने तुझं मढं गेलं चुलीत असही सर्रास म्हटलं जातं.
तर आज हिरण्यवर त्याच चुलीवर मातीच्या गाडग्यात खिचडी शिजवायचा प्रयोग आहे.खिचडी कशी होईल माहित नाही पण चुल कशी पेटवायची,भाकरी कशी थापायची,शेकायची याचा मात्र छानंच उबदार वर्गपाठ झाला.
न पेटलेल्या चुलीत बारीक काटक्या घालून पेटता कागद सरकवला की काटक्या पेटतात.मग त्या जाळाला फुंकणीने प्रज्वलीत करुन मोठं लाकूड(ठणठण पेटणारं)चुलीत सारायचं.तवा ठेवायचा चुलीवर व परातीत ज्वारी-बाजरीचं पीठ घेऊन मनगटी जोराने मस्त तिंबायचं.तो एकजीव अलवार गोळा हातात जरा फिरवून मोठा करायचा.मग परातीत जरा कोरडं पीठ टाकून दोन्ही हातांच्या पंखी तळव्यांनी एका लयीत भाकर धपधप थापायची.सराईत हात थापता-थापता गोल व एकसारखी पातळ भाकरी सहज करतात.ऐस-पैस तयार भाकरी मग अलगद उजव्या हातावर उचलून झोपलेल्या लेकराला आल्हाद पाळण्यात झोपवावं तशी गरम तव्यावर हलकेच टाकावी.टाकलेल्या भाकरीच्या वरच्या बाजूने पाण्याचा हात हलकेच फिरवावा.ह्याचाच नंतर खरपूस,कडक पापूद्रा तयार होतो.परत फुंकणीने जाळ प्रज्वलीत करत भाकरी तव्यावर एकदाच बाजू बदलत छान शेकावी.कमी-जास्त आच हवी असेल तर जळती लाकडं-काटक्या मागे पुढे कराव्यात.जाळ सगळीकडे समप्रमाणात राहिल हे बघावं. नंतर चुलीतल्या जळल्या लाकडाचे छोटे तुकडे(आहार) सराट्याने चुली बाहेर काढून त्या आहारीवर भाकरी चुलीला टेकून उभी ठेवून थोडी डागी शेकावी.ही पापूद्र्याची बाजू.एक-दोनदा भाकरी फिरवावी...खरपूस वास दरवळला की भाकरी झालीच समजावी.
हे सगळं करतानांंच परातीत परत पीठ मळून-रगडून गोळा करून दुसरी भाकरी धपधप दोन्ही तळव्यांनी बडवून तयार ठेवायची !
अर्थात अधून-मधून धुरामुळे चुरचुरणारे डोळ पदराने पुसायचे हे सांगणं नकोच !
टोपल्यात गोल ठेवलेल्या भाक-या बघणं हा एक तृप्तीचाच क्षण असतो तर तवा उतरवलेली,लाकडं बाजूला सारुन ठेवलेली विझू-विझू,निस्तेज चुल बघणं हे फारंच अध्यात्मीक वाटत रहातं.
No comments:
Post a Comment