Saturday, 24 December 2016

जळण..जाळणं...जळणं....


पुण्याहून शिवनेरीने औरंगाबाद...सकाळची दहाची बस..लग्नाची धुम बघता जरा लवकरच आलो तर बस लागलेलीच..चालकही स्थानापन्न..सामान टाकलं,जागा पटकावली,मुलीचा निरोप घेतला आणि शांत बसले.बस तशी रिकामीच,अर्थात दहा वाजायचेत अजून.चालक निवांत फोनवर खणखणीत बोलतोय..लक्ष वेधुन घेण्यासारखं..हेलही वेगळा आहे.मराठवाडी नाही.कानोसा घेत बसले... "...हां..तर काम कर की तू..शेतात जावं..बंधा-याचं कामं चालू हायती..तिथं काही काम बघावं..तुराट्या,कुपाट्या,चिपाट्या.. पाटं हायता...काम करना-याला काय ? नुस्त वावराला जीव जरी लावला तबी कामंच कामं निघत्येत..काय ? .......... काय ? लाकडं आन्ली ? आन ती कश्या पाई ? काय..चुलीसाठी लाकडं ? आता तुमाला सैपाकघरात ओटा करुन द्येला,ग्यास द्येला आनं तू कशाला लाकडं आन्लीस रे ? सांग की..लाकडं काय जाळायला आन्ली मला ? आरं पन ग्यास हाय मग सरपन लागतेच कशाला ?काय बी बोलू नगं यड्यावानी. व्हय रं द्येवानं डोकं दिलंय ते अशी बुध्दी चालवायला रं ? आं.. म्हने लाकडं आन्ली पोतं भरुन..रिकामी कामं. काय माझा मुडदा जाळाचा का त्या लाकडांनी ? काय पन बोलतोस आन करतोस गड्या...जरा मी सांगतो ते ऐकत जा... काय ? लाकडं काढीतो ? कुठून ? आर तिच्या मायला...लाकडं आनी सोफ्याखाली ? आरं जरा डोकं वापर की ? सोफ्याखाली लाकडं ठेवतेत व्हयरे ? तुझ्या बानं कदी अशी उरफाटी कामं केली न्हाय. तुमची त्या शिमिटाच्या घरात राहाची आन ग्यास वापराची लायकीच न्हाय..आजच्या आज ती लाकडं भाहीर काडून ठेव..समजलं का ? आन त्या शेजारच्या मंदावैनी बरोबर वावरात जायचं..काय ? बाया सारख्या बाया घरादाराचं बघून वावरात राबत्यात आन तुला जमना काय बी काम ? काय गड्या तू ! तर आलं का लक्षात मी काय म्हन्तो ते ? सकाळी लवकर उठाचे आणि घरंच आवरुन रोज वावरात जायाचे.. भाजी-पाला,ऊस,ज्वारी,कपास,बैलं-पानी,इहीर...कामाला काय तोटाच नसते वावरात दिसभर.येकदा आपलं मानलं की सगळ सुचते मान्साला.कळलं का ? नुस्त बसून रहाचे न्हाई आन् रिकामे कुटाने कराचे न्हाई. आलं लक्षात ? रविवारला येऊ राहलो मी..समजलं!" एव्हाना बरेच पैसेंजर आलेले व चौकश्या करु लागलेले.नाईलाजाने फोन बंद करुन त्यांना मार्गदर्शन करुन चालकांनी परत फोन वरन तिकडच्याला पुन्हा एकदा निर्वाणीने फैलावर घेतलं. मग वेळ बघत जागेवर बसले..तेवढ्यात त्यांचा मित्र नमस्कार करत आला.मित्र सध्या घाटगे-पाटलांकडे आहे नोकरीला.शिवनेरीत पगार-पाणी कसं आहे याच्या चौकशा करत होता तर यांच परत खणखण सुरु...अरं राजा काय सांगू तुला ? काय दम न्हाय बघ इथं...**हजार पगार..आन वरचे काय थोडेफार.मी आपलं आठवड्याला गाडीवर गावी जाता येतयं,गाडीचा पेट्रोलचा खर्च वरच्यावर निघतोय म्हणून टिकलोय..तुझं आपलं बरं हाय की घाटगे-पाटीलंच! येता-जाता घरी जाता येतयं..दोन पैशे कमी तं कमी..काय ? चालक ग्रामिण भागातले..शेती-वाडीवाले व घरातले जेष्ठ कर्ते पुरुष आहेत वाटतं.घरच्यांच्या सांगण्यावरुन आळशी भावाला का पुतण्याला तंबी देणं चाललं होतं.स्वतःची नौकरी चालकाची..शहरात.पण सगळं लक्ष,मन त्या गावात..वावरात अडकलेलं जाणवतयं ! मागे मुंबईत ओलावाल्या युपीकडच्या ड्रायव्हर्सशी बोलले तेंव्हाही हेच जाणवलं. नियमीत ठोक पैसा कमवायला शहरात आलेली ही गावाकडची माणसं मायमातीच्या ओढीने अक्षरशः अहोरात्र जळत रहातात. शहरात काटकसरीने राहून गावी पैसा पाठवायचा,तिथे सुविधा करुन घ्यायच्या,होतकरू पोरांची शिक्षणं मार्गी लावायची. स्वतः अडचणीत रहायचं पण शेवट पर्यंत गावाकडच घर आणि वावर टिकवायची धडपड करायची.शहरी घामाने मागे सोडललं पीढीजात वावर शिंपायचं..बहरवायचं आणि एकदिवस खरोखरच मुडदा बनून गावी फक्त जळायलाच परतायचं ! P.S. गाडी निघाली..बरीचशी रिकामी.स्टेशन बाहेरच्या गोंधळातून बाहेर पडतो तर एका कार मधल्या मुली-बायका हातवारे करुन गाडी थांबवत होत्या.गर्दीच्या वळणावर गाडी थांबवणं शक्य नव्हतं.थोडक्यात चुकली त्यांची गाडी.पुढे एक-दोन सिग्नल्स नंतर ती कार पुढे आली व त्या महिला परत हातवारे करत थांबा-थांबा असे इशारे करु लागल्या.चालक लक्षच देत नव्हता.शेवटी मला राहवलंच नाही...अहो थांबवा की गाडी जरा बाजूला दोन मिनीटं..केवढा पाठलाग करत आले आहेत आपला.. अहो अशी गाडी थांबवता येत नाही.रस्त्यात तपासलं तं घरी पाठवतील मला.मग तुम्ही नेणार का गाडी औरंगाबादला चालवत ? नौकरी जाईल माझी.असेल गरज तर येतील येरवड्याच्या स्टॉपपाशी. गाडी काय थांबवा ? ह्यं... येरवड्याला आम्हाला गाठलंच त्यांनी.गो-या-गोमट्या सिंधीणी धापा टाकत घाईत चढल्या..जगह है ना ? चार सिट है..हां है ना..बैठो...(नशीब चालक म्हणला नाही जाओ..बैठो..तुम्हारी मौसी भी बैठी है अंदर..तुम्हारी भौतही चिंता लगी थी उनको) गडी कोल्हापूरचा निघाला.

No comments:

Post a Comment