Tuesday, 15 November 2016

खीर नखुल्याची...

दोन-तीन वर्षांपूर्वी मराठवाड्यातील बचत गटांच एक मोठ प्रदर्शन औरंगाबादला भरलं होतं.फुटकळ हस्तकलेच्या वस्तू, हातसडीचे धान्य,देखणा बंजारा स्टॉल,मराठवाडी वाळवणं व खाद्यपदार्थ असं साधारण रुप होतं.
अर्थात मी बंजारा स्टॉलवर भरपूर खरेदी तर केलीच पण काही वाळवणं पण घेतली.लातूरकडच्या भागातून आलेल्या स्टॉलवर ज्वारी सारखे कणकेचे मणी वाटावेत असा नखुले नावाचा वाळवणाचा प्रकार होता.
भारतीय सब कॉन्टिनंटमधे वाळवणं हा फार छान प्रकार आहे.भरपूर सूर्य प्रकाश,औरस-चौरस भुभाग,पावसाळी मोसम,ट्रान्सपोर्ट अवघड त्यामुळे जे काय सहज उपलब्ध आहे त्यातून व गरजेतून भारतीय वाळवण शास्त्र चांगलंच वृध्दिंगत झालं आहे.
It really impresses me a lot.
डाळी-फळं-भाज्यांची(मासे व इतर मांस प्रकार ) वाळवणं,लोणची,मुरंबे,पापड,खारोड्या व इतर अनेक टिकावू पदार्थ.जशी प्रत्येक दहा मैलावर भाषा बदलते तसंच प्रत्येक १००-२०० किलोमीटरवर नैसर्गिक हवामानही बदलते,पीकपाणी पण बदलते तसचं खाण्याच्या पध्दती,
पदार्थांच्या खासीयती पण बदलतात.
त्यात पुन्हा धर्म-जात-समाजाची वैशिष्ट्ये पण आहेतच.
उपलब्ध व कमीत कमी पदार्थात,जिनसात सहज असा
परिपूर्ण आहार प्रत्येक ऋतूत विविधतेने मिळवायचं आपल्या पुर्वजांच कसब वादातीत आहे माझ्या मते.
नुसते पापड जरी विचारात घेतले तरी किती प्रकारांनी पापड बनवले जातात आणि कश्याचेही पण.पीठ भिजवून, उकड काढून, शिजवुन इत्यादी.
गहू,ज्वारी,नागली,तांदूळ,बटाटा,साबुदाणा,पोहे,फणस,डाळी,मका इत्यादी कोणत्याही पापड योग्यतेच्या जिन्नसापासून पापड बनवले जातात .
जेव्हा कधी एखादा खाण्याचा जिन्नस मुबलकपणे उपलब्ध असतो तेव्हा त्याचा बहुरुपी वापर करुन अडचणीच्या काळासाठी तो योग्य प्रकारे सांभाळून ठेवणे व नंतर विविध प्रकारांनी आहारात वापरणे.
Absolutely its an amazing art.

तर नखुले विकत तर घेतलेचं पण वापरायचे कसे आणि तयार कसे केले हेही विचारुन घेतलं.आपल्याकडच्या लग्नात शेवयांचाच एक जातभाई म्हणुन नखुले,गव्हले रुखवतात ठेवले जातात.मला तरी एवढंच माहीत होतं.
हा प्रकार जरा वेगळा होता.गहू गिरणीतून रवाळ पीठ करुन आणायचे व नंतर चाळायचे.जो काही भरडा उरतो तो उलट्या परातीवर कोरडाचं घ्यायचा व त्यावर वरुन पीठ भुरभरायचं व पाण्याचा ओला हात तुप फेटल्यासारखा परातभर गोल फिरवत रहायचा.भरड्याला पीठ लागुन गोल-गोल फिरवल्यामुळे हळूहळू ज्वारीच्या दाण्यासारखे कणकेचे मणीदार गोळे खाली पडतात.नंतर हे मणी(नखुले) खुटखुटीत वाळवून घ्यायचे.
आपण शेवयांची जशी खीर किंवा फोडणीच्या शेवया करतो तसंच या नखुल्यांना कोरडं परतून गरम दुधात शिजवून खीर करायची किंवा तेलाची मोहरी,हिंगाची फोडणी करुन मिरच्या कांदा टाकून फोडणीचा उपमा करता येतो.शेवयांपेक्षा जरा दहा मिनिट जास्त लागतात शिजायला.
मला स्वतःला चवीत काही फरक जाणवला नाही पण हे नखुले बनवायची पध्दत मात्र फारंच भावली.किती वैविध्यपूर्णपणे, कलात्मकपणे व अभ्यासपुर्णपणे ही वाळवणं,टिकावू पदार्थ बनवली जातात नाही.
Amazing time tested wisdom !

No comments:

Post a Comment