Tuesday, 29 November 2016

अपनापन

नुकतीच औरंगाबादला मोठी हेरिटेज मेरेथॉन होऊन गेली.स्पर्धेची सुरवात हिरण्य जवळच्या परिसरातून पण वेरूळच्या लेण्यांपर्यंत जाऊन परतायचे होते.
छान झाली स्पर्धा. खुप स्पर्धक होते.एक मुलगा,मुलगी असे दोघं परदेशी केनीयन स्पर्धक पण होते.दोघेही विजयी झाले.
पण बक्षिस समारंभात जरा भाषेमुळे,परकीयतेमुळे हरवल्यासारखे व एकेकटे वाटले.तर मुद्दाम आवर्जून ओळख करून घेतली व नजीकच्याच आमच्या हिरण्यला जेवायला(लंच)बोलावलं. तेही आनंदाने तयार झाले.आले.
Virginia 21 वर्षांची व गेले ४-५ वर्ष भारतात स्पर्धेच्या निमित्ताने सातत्याने येते व बक्षीसही घेऊन जाते.So she was very comfortable.पण Felex पहिल्यांदाच आलेला.24 वर्षांचा,हसरा.काल त्याला बरंच वाटत नव्हतं,दिवसभर जेवलाच नाही.तसाच आज पळाला उपाशीपोटी आणि २५ किमीचं पहिलं बक्षीस मिळवलं.
आज आमच्याकडे मात्र जेवतोय. फेलेक्सला बरं नव्हतं तर व्हर्जिनीयाला फार काळजी वाटली.म्हणाली मी त्याला रात्री दार उघडं ठेवून झोपायला बजावलं.होना..झोपेतंच मेला तर मी काय करु ? स्पर्धा राहिली दूर. परक्या देशात मरणं काय खरं आहे ? त्यामुळे त्याचं आजचं जेवण बघून हिच्याच जिवात जिव आलेला.आत्ता लगेच प्रवासाला निघताहेत.हरियाणाला मित्राकडे जाऊन सामान टाकणार की लगेच नॉर्थ ईस्टच्या हॉर्नबिल मेरेथॉनला निघणार.नंतर गोवा मेरेथॉन की मायदेशी परत.देशी-विदेशी स्पर्धांंमधे सतत भाग घ्यायचा..जिंकायचं..पैसे कमवायचे.पण नजर मात्र येणार्या ओलंपिक्स वर.

व्हर्जिनीया जास्त बोलकी आणि मोकळी.म्हणाली तुमच्या देशात जसं क्रिकेटचं वेड ना तसं आमच्या देशात पळायच वेड आहे.जमल्यास वयाच्या पंचेचाळीशीपर्यंत पळणार आहे ती आणि नंतर स्वतःचं ब्युटी पार्लर काढणार आहे.फेलेक्सला मात्र पळणं सांभाळत बिझीनेस करायचा आहे.
पळतांना वेरुळच्या लेण्या जेवढ्या दिसल्या त्यावरून rock cut caves, हिंदू व इतर धर्म यावर गप्पा झाल्या तर ख्रिश्चनांच्या पण लेण्या आहेत का असे तिने लगेच विचारले हे मला इथे नमूद करावसं वाटतय.
बाकी कुटुंब व्यवस्था आपल्यासारखीच.आईचं व मुलांच खास मेतकूट. स्वैपाक घरात आईचच राज्य पण गरज पडल्यास मुली,वडील,मुलगा मदत करतात.वयाच्या १८ वर्षानंतर करियर,जोडीदार निवडीचं स्वातंत्र्य. आई-वडील फक्त मार्गदर्शन करणार.शाळेत इंग्रजीचं प्राबल्य.मातृभाषा स्वाहिली.
व्हेज-नॉनव्हेज खातात.आपल्यासारख्या पोळ्या पण करतात.थापून,लाटून. भारतीय पदार्थ खुप मसालेदार व मिठाया फार गोड असतात म्हणाली.बहुत करुन भारतीय मिठाया दुग्धजन्य असतात व ऊष्ण तापमानात टिकवण्यासाठी भरपूर साखर वापरली जाते अस सांगताच तुमच्याकडे म्हशींच दुध वापरतात.आम्ही फक्त गाईंच दुध वापरतो.आणि आमच्याकडे म्हशीतर फक्त जंगलात दिसतात.आणि त्या खूप अग्रेसीव्ह पण असतात.त्यामुळे चुकून कधी म्हैस दिसलीच रस्त्यात तर आम्ही लगेच रस्ता बदलतो.इथे मात्र रस्तो रस्ती म्हशींच्या झुंडी.गंमत आहे.
(मनात म्हटलं आम्ही पण रस्त्यात म्हशी दिसल्या की मुकाट वाहनं वळवतो गं बाई)
छान गप्पा मारत निवांत जेवलो.त्यांना पुढच्या स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.पुढच्या वर्षीच्या AHHM मधे भेटायचा,पळायचा वादा करत निरोप घेतला.

२५ किमी साठीची पहिली महिला विजेती परभणीची ज्योती गवते.हिने व्हर्जिनीयालाही मागे टाकले.
२१किमी साठीची पहिली महिला विजेती वैजापूरची वैशाली तुपे(ही स्पर्धेत अनवाणी पळाली) या दोघींनाही ह्यांच्या बरोबरंच सन्मानाने जेवायला बोलवायला पाहिजे होतं.
चुकलंच.
बक्षीस समारंभात बाकीच्या शहरी icing on the cakeसारख्या creamy crowd मधे या ग्रामीण पोरी पार हरवून गेल्या,बुजून गेल्या.मीही बोलावलं नाही.चुकचुकले.
पोरींनो तुमचही फार कौतुक वाटतंय बरका.आपण परत नक्की भेटू.आम्ही नक्की पोहोंचू तुमच्या पर्यंत.

No comments:

Post a Comment