Monday, 31 October 2016

वसुबारस...

काल सकाळी RYEच्या मुलांना घेऊन औरंगाबादच्या ISKON च्या अमृतान्नम् सेंटरा भेट..ठरवून.
या सेंटरची कार्यपध्दती बघणे व ते ज्या शाळांना मिड डे जेवण पुरवतात त्या एका शाळेतल्या काही मुलांबरोबर संवाद आणि दिवाळीचा फराळ असा दोन तासाचा कार्यक्रम होता.
सेंटरला फिरून भेट,स्वैपाकघराची कार्यपध्दती,स्वच्छता,
जेवणाची वितरण व्यवस्था पहात शेवटी कोपर्यातल्या देव्हार्यातल्या यशोदा-बालकृष्णाच्या मुर्तीची दिव्यांनी पुजा व नंतर फराळ. तर पुजा करण्या आधी तिथल्या समन्वयकांनी त्या यशोदा-बालकृष्णाच्या मुर्तीचं (खांबाला बांधलेला कृष्ण व त्याला रागावणारी,समजावणारी यशोदा)वैशीष्ट्ये,
कृष्णाच्या दही-लोणी चोरुन खाण्याच्या खोड्या,
सवंगड्यांबरोबर हंड्या फोडणे वगैरे सांगितले व
ISKON व अमृतान्नम् कसं त्या कथेला अनुसरुनंच हजारो वंचित बालकांना सकस आहार पुरवतो हेही सांगितले.
त्यात आज वसुबारसचा दिवस.गाईची व वासरांची सन्मानाने पुजा करायचा दिवाळीतला पहिला दिवस.
अर्थात या परदेशी मुलांनी त्यात फार रमावं असं नाही पण आपण भारतीय मात्र नक्कीच आईच्या भुमिकेतून यशोदेशी,बाळकृष्णाशी भावनिक रीत्या खुप रिलेट करु शकतो.
बालसुलभ चोर्या करत घराघरातनं लोणी,दह्याचा फडशा पाडणारा कृष्ण आणि त्याचे सवंगडी,आणि या खोडीची तक्रार यशोदेकडे करणार्या इतर माता,गृहिणी.
प्रत्येक स्त्रीला अत्यंत लोभस वाटणारा असा हा कथा भाग आहे कृष्ण चरित्राचा.
प्रत्येक भारतीय आई आपल्या बाल मुलात-पुत्रात बाळकृष्णंच बघत असते आणि त्या आठवणींवरचं पुढचं आयुष्य धकवते, इतका हा महिमा थोर आहे.

मला हसू आलं.
माझी दोन्ही मुलं अगदी लहान असतांना आम्ही एका अपार्टमेंटमधे रहात होतो.आमच्या अगदी समोर कुमाऊं प्रांतातले एक कुटुंब रहायचे.हिंदी बोलणारे.
नवरा-बायको,सहावी-चौथीतले मुलगा-मुलगी,बाईंचे सासरे व येऊन-जाऊन असणारी बाईंची आई.
बाई खुप प्रेमळ.घरीचं असायच्या आणि अतिशय प्रेमाने सगळ्यांच करायच्या.
मला मुलगी झाल्यावर माझा जेमतेम तिन वर्षांचा मुलगा हे अख्ख कुटुंब अगदी प्रेमाने सांभाळायचे.
कन्हायला झोपवून मी कधी निर्मिकाला घेऊन दवाखान्यात,बाहेर गेले तर आई-सासरे माझ्या घरात टीव्ही बघत,नामस्मरण करत घराची राखण करायचे.
त्यांची शाळकरी मुलं तर हातोहात मुलांंना सांभाळायची
आणि बाईतर घासातला घास द्यायच्या माझ्या मुलांना.
अक्षरशः चोवीस तास मला त्यांचा फार आधार असायचा.
तर त्यांचा शाळकरी मुलगा वाढीच्या वयाचा.
जेवणा शिवाय फडताळातले डबे-डुबे हुडकून सगळ्या वस्तु-जिन्नस पार संपवून टाकायचा.ह्या डब्यातनं काही काढायला गेल्या की डबा रिकामाचं असायचा.
बिस्किटस,खारी,शेव,चिवडा,शेंगदाणे,कुट,खोबरं,काजू, बदाम,किसमिस..झालंच तर आई-सासर्यांच्या उपासासाठी आणलेली फळं इ..बाई अगदी कावून जायच्या.
परिस्थिती खाऊन-पिऊन सुखी पण उठसुठ अशा वस्तु संपल्या की फजितीचं व्हायची त्यांची.
मग कधी त्या संथ-मंद आवाजात तक्रार करायच्या...
क्या करुं पिल्लु(माझा मुलगा)की मम्मी ?
मनू कुछ रहनेही नही देता है घरमें..सब ढुंढ-ढुंढके खतम कर देता है..अभी तो छिपाने की सब जगह भी तो खतम हो गई है. छुपाउं तो कहां छूपाऊं समझ में नही आता ?
फल वगरहा तो ठिक है लेकीन सौ-दो सौ के काजू-बादाम भी चट कर देता है...मै तो तंग आ गई हुं ये बच्चे से...
मनू के पप्पा भी गुस्सा करते है...बोलते है घरमें कोई आया तो चाय के साथ कुछ भी नही रहता है अपने घर में...
दोन तीनदा ऐकलं मग मीचं डोकं लढवून त्यांना आयडीया दिली,म्हटलं तिन भांड्यांच मिक्सर आहे ना तुमचं ? आणि ते ताकाचं काचेचं भांड माळ्यावरंच असतं नां ? ठेवा त्यात तुमचे काजू-बदाम.आणि खरंच त्या मुलाला परत कधीचं काजू-बदाम सापडले नाहीत.(माझ्या दोन्ही धाकट्या भावांची ट्रेनिंग अशी कामाला आली)

मग माझा मुलगा 8-10वर्षांचा झाला की असंच वागायला लागला.
म्हणजे आमचचं काय पण कुणाच्याही(नातेवाईक)घरातलं फ्रिज उघडून त्यातले तमाम खाद्यपदार्थ
(चोकोलेटस्,चिझ्,मिल्क पावडर,ब्रेड,मिठाया,ड्राय फ्रुट्स)खायची त्याला इतकी सवय लागली ना की बापरे !आणि भरीसभर तो कलाकंद करायला शिकला माझं पाहुन.मग काय फ्रिजमधलं अख्ख असेल-नसेल तेवढं दुध गरम करुन लिंबू पिळून नासवायचा...
१५-२० मिनीटात बाहेर आमच्या समोर गरमागरम कलाकंद.चहालाही दुध उरायचं नाही.
मी काय इतरांनी पण त्याचा धसका घेतला होता.
मुंबईत आम्ही बहिणी शोपिंगला निघालो की माझी बहिण तर फ्रिज lockचं करायची कारण तिचा तर अर्धा किराणा त्या फ्रिजमधे असायचा.मग किल्ली शोधण्यासाठी हा आणि इतर टोळी खुप उचक-पाचक करुन ठेवायचे.मला तर इतकं लाजल्या सारखं व्हायचं.
तरी कुठेही जातांना आधी भरपूर खाऊ घालायचे आणि त्यांच्या फ्रिजला हात लावशील तर बघ अशी तंबी देऊनंच मी त्याला न्यायचे.
अजून जरा मोठा झाल्यावर तर तो मी लपवलेल्या वस्तू चेलैंजवर शोधायचा.म्हणायचा तू लपवंच,नाही मी शोधून काढलं तर बघ !आणि ते शोधायच्या नादात तो इतकी
उचक-पाचक व सांड-लवंड करुन ठेवायचा की
मीच शेवटी काही(विषेशतः काजू) लपवायचं सोडून दिलं.

तर ISKONच्या या देव्हार्यासमोर हे सगळं डोळ्यासमोर हळूवारपणे तरळून गेलं.गहिरं हसू आलं आणि
मंद ज्योति प्रकाशात डोळे पाणावले.
कृष्णाच्या बालपणा बरोबर यशोदेचंही आस्तित्व पुसट झालं नाही !

दुसर्या दिवशी ब्रेकफास्टच्या वेळेला नवर्याला व कालच पुण्याहून दोन महिन्यांनी घरी आलेल्या मुलाला हा
ISKON वृत्तांत,राजवार आंटी व मनीषची गोष्ट सांगितली तर तोही खुदकन हसला आणि म्हणाला..by the way आई..
फ्रिजमधलं काजूचं पाकिट मी रात्रीचं फस्त केलयं...
मुद्दाम सांगितलं..नाहीतर परत शोधत बसशील !

No comments:

Post a Comment