Monday, 31 October 2016

ड्रीम बिल्डर्स...

मुंबईतला पहाटेचा गारवा...
शरीरात सुस्ती..हातात मस्त चहा...
खिडकीतुन दुरवर डोंगराला छेडणारी नजर, नव्यानेच तयार होऊ लागलेल्या गगनचुंबी इमारतीने अडवलेली...

वारुळाच्या तोंडालगत जशी मुंग्यांची मुकी लगबग असते तशीच काहीशी हालचाल आहे त्या बांधकाम मजूरांची तिथे.
अगदी जमीनीवरच्या बांधकाम साहित्या लगतंच.

बांधकाम वापराचा मोठा हौद पाण्याचा...त्याच्या भवतालीच कोणाची आंघोळ,कोणाचं दात घासणं,कोणाचं कपडे धुणं...
न बोलता..यंत्रवत.
भरपूर पाणी पण गार...कमरेला पंचा..बिल्डिंगच्या पहार्यातंच पण थोडासा आडोसा बघत उभ्यानेचं आंघोळ...
सामुहिक हौदातनं पाणी घ्यायला पिवळं हेल्मेट..
मग सारखं त्यातनं पाणी ओतायचं अंगावर..
खसा-खसा साबण लावत, चोळत, भसा-भसा पाणी डोक्यावर,अंगावर...
सगळी मरगळ,थकवा मोडून टाकणारं गारीगार पाणी.
शौच्याला केनभर पाणी त्याच हौदातनं...
(आमच्या मराठवाड्यात फक्त एक बाटली)
संडास बाजूला पण सार्वजनीकंच.

आंघोळ झाली की भिंतीकडे तोंड करून
तिथेच आतले कपडे बदलायचे वलगेच चड्डी,शर्ट,पेन्ट् इ.
धपा धपा धुवूनही टाकायचे.
काहीजणं तर काढलेल्या अंडवेअरच खळाळतात व
त्यानेच अंग पुसतात व परत खळाळून वाळत घालतात.
मुंबईच मस्त सोफ्ट पाणी,निळी वडी...झाग ही झाग...
एका धुनमधेच झांकदार सफाई.
आणि ती आंघोळ म्हणजे आंघोळंच.
तो साबण संपेल पण यांचा तो खरारा नाही संपणार.

दिवसभराच्या मानमोडी,खांदातोडी,कणामोडी कष्टांचा शिण,थकवा,ताण,घाम सारं या गार पाण्याच्या शहार्याने घालवत...रक्तभिसरणाला नव्याने ताजी चालना देत ऐन तिशीतले अनेकानेक कामगार सकाळचे आठ नाही वाजत
की तयार होतात व पुन्हा एका नव्या दमाने,एकजुटीने
कामाला उरा-शिरी भिडतात...
आणि या माया नगरीत बघता-बघता २०-३०-४० मजली उच्चभ्रू टोवर्स ऊभे रहातात.

आमच्या हातांना काम द्या म्हणणार्यासांठी हे शहर आहे.
कष्टांना योग्य दाम देत त्याच प्रमाणात पुरेपूर घाम वसुल करणारी व्यवस्था आहे इथली...आपली !

खूप नजर देऊन बघते आहे पण थोडं जरी दुर्लक्ष झालं की एकाच रंग-चणीची,एकाच प्रकारच्या टोवेल मधली माणसं ओळखायला पण येत नाहीयेत.
धुण्याचे पिळे घेऊन, वरच्या so called पत्री घरात जाऊन शर्ट-पेन्ट घालून, भांग पाडून खाली येऊन गप्पा मारायला लागली की मघाशी आंघोळ करतानाची हीचं का ती माणसं म्हणून पटू नयेत इतकी ती टवटवीत दिसताहेत.
अर्थात आत्ता प्रफुल्लीत दिसणारी ही गावफुलं संध्याकाळ पर्यंत कशी आणि किती कोमेजतील हे मला काय त्यांनाही उमगणार नाही.

आंघोळ करतांना,कपडे धुतांना,आरश्यात बघून भांग पाडताना एखादी तरी लकेर त्यांच्या ओठांवर येत असेल का ?
घामटं पांघरुणात दुरस्थ कौटुंबिक उब,मुलांची चिव-चिव,
बायकोचा स्पर्श, गावचं चांदणं आठवून
यांचे डोळे तळावत असतील का ?

नऊ नाही वाजत की वर लटकलेली लिफ्ट ट्रोली धडधडत खाली...
पिवळी डोकी,काटकुळी माणसं त्या उंचावरच्या लिफ्ट कडे एखाद्या मसिहाकडे बघावं तसं बघताहेत...
धड..धड...घड...धाड्....लिफ्ट खाली.
And here begins the so called new day!


No comments:

Post a Comment