Tuesday, 25 October 2016

बायें हाथ का खेल...

पहिला चहा होत नाही की बहिणीचा फोन..
अगं मी whatsappवर फोटो पाठवलेत,माझ्या कुर्त्याचे.ते बघून भरतकामाचं डिझाइन,टाके,रेशमाचे रंग...सगळं लगेच विचार करून कळव..लगेच करायला घेते म्हणजे दिवाळीत कुर्ता घालता तरी येईल.
हे असं नेहमीच असतं माझ्या सगळ्या बहिणींच्या बाबतीत. एकदा का माझ्या आगमनाची तुतारी फुंकली की त्या पटापटा भरतकाम-जोड-तोड करायच्या साड्या,कापडं,कुर्ते,चादरी गठ्ठ्यांनी काढून ठेवतात.मग वेळ काढून कपड्यांचे,मण्या-मोत्यांचे पेटर्नस,भरतकामाचे डिझाइन्स,टाके,रंग सगळं ठरतं..डायर्या भरतात व नंतर यथावकाश whatsapp वर प्रगतीचे फोटो कौतुकाने येत रहातात.खरंतर गोष्टी खुप शुल्लक असतात पण त्यांच अडतं.आमचं डोकंच चालत नाही म्हणतात असल्या बाबतीत.
पण पहायला जाल तर ह्यांची घरं,कपाटं,शेल्फस् ,स्वैपाक,
जेवणावळी इतकी छान,टापटीप, जिथल्या तिथे असतात ना की यांना हे असले टापटीपीचे नुख्से सुचतातंच कसे व यासाठीचे कष्टही कसे करावेसे वाटतात याचं मला फार आश्चर्य वाटतं.हीच बहिण इथे आली की माझंही घर मला छान आवरून देते.सुलभ अश्या टिप्स देते घर निटनेटकं ठेवायच्या.ती असे पर्यंत जोश असतो,गेली की येरे माझ्या मागल्या.वर आणीक घर आपल्यासाठी,आपण घरासाठी नाही हे अध्यात्मिक पांघरूण आहेच पसार्यावर घालायला.

फार मजा वाटते मला या सगळ्याची. दोघीही अगदी पाठच्या बहिणी पण इतका फरक.काही गोष्टी कलात्मक करण्यात मी तुलनेनी तरबेज तर घराची टापटीप,(घरात बाराही महीने इलेक्ट्रिशियन,मिस्त्री,कारपेंटर्स,प्लंबर्स ह्यांना कामं देणे)आल्यागेल्यांच करण्यातला उत्साह,चतुरस्र कष्टाळू स्वैपाक यात ती फारंच अग्रेसर.
गंमत आहे आपल्या सर्वांच्या मनाची,विचारांची व अंगवळणी पडलेल्या जीवन शैलीची.
कुणाचं डोकं कुठे तर कुणाचं कुठे आणि कधी चालेल याचा नेम नाही.हिचं लग्न झालं तेंव्हा मी हिला घर,कपाटं आवरून द्यायची.पण अब गंगा उलटी बह रही है.त्यामुळे आता घर बांधायचं आणि सजवायचं म्हटलं की माझ्या अंगावर काटा येऊन दडपणंच येतं.आणि त्यात पुन्हा त्या कारपेंटर आणि इतर गैंगशी कामाचं डील करणं म्हणजे वैताग असतो नुसता.
हां..त्यांच्या गावाकडच्या कथा,आयुष्यातला संघर्ष..या असल्या गोष्टीत मला फार इंटरेस्ट..घंटाभर गप्पा ठोकू...मस्त दोन पानं लिहून काढू..तिथे काचकूच नाही.
आपल्या मेंदूचीही गम्मत-जम्मतंच असते.जी गोष्ट एखाद्याला बायें हाथ का खेल वाटेल तीच गोष्ट समान परिस्थितीतील व्यक्तीला संकट वाटते.एखाद्याला एखादी गोष्ट लख्खकन् उमजते तर दुसर्याला काही केल्या त्यात गती येत नाही.त्यामुळे रोजच्या जगण्यात आपले असे अनेक गुरु असतात.तुम्ही अगदी जाहीरपणे मान्य नाही केलं तरी ते आपल्याला कुठेतरी आपल्याला न उमजणार्या गोष्टीत कळत-नकळत मार्गदर्शन करतात व कौतुकाला पात्र ठरत असतात.
नुसता मनाला भावलेल्या कपड्याचा तागा जरी माझ्या समोर उलगडला तरी माझ्या डोक्यात खटाखट ट्युब्ज् पेटतात.ड्रेस पेटर्न,भरतकाम,टाके,रंग अंदाजे सगळंच तिथल्या तिथे ठरतही आणि उन्निस-बीसच्या फरकाने प्रत्यक्षात उतरतही.
खर्या-खोट्या दागिन्यांच्या बाबतीतही तीच गोष्ट.
सोनं,चांदी,मोती,पोवळे,शिंपले,मणी,खडे,लाकूड,दोरे,माती काहीही घ्या थोडा बरा दागिना बनतोच बनतो.
सध्या घरात कपाट भरुन तांब्या-पितळेच्या आकर्षक वस्तु आहेत,अर्धा डझन तर धातुंचे दिवे आहेत पण मी एकही दिवा कधी लावेल तर शपथ.अशीच कलात्मक नजर असलेली माझी एक मैत्रीण आहे.ऐंटिक लव्हर.काय तिचं तुफान डोकं चालतं या वस्तू डिस्प्ले करण्यात.बापरे ! आणि काय तीची ती धडपड ?
मला तर न्यनगंडंच आला तिची ती ऐंटिकची ऐटबाज मांडणी बघून.पण तोही क्षणिकंच.
सतत घरं आवरणं,छान ठेवणं,त्याच्यासाठी आवडीने खरेदी करणं,लोकांना जेवू घालणं..कश्याचीही मला आवड नाही.
ना त्यात गती ना कष्टाची तयारी.
माझ्या दृष्टीने वेळेचा,पैशाचा,शक्तीचा अपव्यय आहे नुसता.
And so it is a difficult task for me.
तर आजचा बहिणीचा फोन व अन्नपुर्णेच्या लेखिका मंगला बर्वेंच निधन यामुळे हे सगळं जंजाळ आठवलं.
मला या परिपूर्णपणे स्वैपाकाला वाहिलेल्या सर्वांगीण पुस्तकाने खूप-खूप तारलं.रोजच्या पेक्षा कुठलाही वेगळा पदार्थ करताना मी आजही आधी हे पुस्तक चाळते मगच स्वैपाकाला लागते.
नियतीने माझ्या आईला माझ्यावर मुद्दाम पाककलचे संस्कार करायला सवडंच दिली नाही.
पण माय मरो पण मावशी जगो सारखं मंगला बर्वें सारख्या अन्नपुर्णेनी मला फार साथ दिली.
तर्हेतर्हेचे भाताचे प्रकार,सुप्स,जैम,जेली,लोणची यावर माझा जो हातखंडा बसलाय त्याचं सगळं श्रेय या पुस्तकाचं.
माझ्यासाठी तर अगदी दिवाळीच्या तोंडावर त्यांच निधन होणं फारंच अस्वस्थ करणारं आहे.

No comments:

Post a Comment