Wednesday, 19 October 2016

चांदणे शिंपीत जा...

आज पंचमबाबा उशिरा आले.

बाबा... थंडी पडायला लागली तर तुम्ही उशीरा याय लागले.
तसं नव्ह..बाई. बिल्डिंगामदी लय ये-जा अस्ती सकाळपास्नं..सद्या कुनी न्हाय ना घरला.
का बरं, कुठे गेले सगळे ?
सुन आन नातबाई गावी गेल्येत..पोरगं ड्युटीला गेलयं..कारभारीण कामाला ग्येली..जरा मह्या लक्षच द्यावं लागतया.
अरे वा ! दुर्गाची दिवाळी माहेरी वाटतं ?
हावं नं..हावं नं...आता मपलं पोरगं जायाचं ना ते कुटंकी जर्मनीला म्हनं...सोळाजनं जायाचे ३० तारखेला...मंग त्यो म्हनला सुनबाईला..तु लगी जाऊनंच ये माहेराला,मंग मी येई पत्तुर काय कुटं हलायचं न्हाय..लगी आज सक्काळीच गेली बगा दुर्गी आन नातबाई...घरला तं करमनाचं झालया..
दुर्गिला म्हनलं जाय २दिवस आन ये लगी परत..ती पोरगी र्हात नाय मया बगुर..पोरगं म्हनलं न र्हायाला काय झालं ?लयी मान्स हायीत तिथं लेकराला खेळास्नी...
आता नुस्ती मानसं आसून काय उपेग ? लेकराला सांभाळता तं आल पायीजे त्यास्नी ? हाय ना बरुबर ? तुमी पाह्यलं नां कशी बाबा..बाबा..बाबा..करीती दिसभर...माजा तं लगी जिवंच लागंना बगा...बाबा गहिवरले.
मुलगा किती दिवसांसाठी चालला जर्मनीला ?
त्यो काय दोन मयन्यासाठी...लिष्टमदी त्याचं नावं आलं आन् लगी गडबडंच जाली बगा..फोटु काय,त्ये कागदं काय,कपडे काय,बुटं काय ? लगी थाटंच हाय बगा त्याचा !
छान..छान..बाबा..कौतुक आहे तुमच्या मुलाचं.
हावं..हावं..बरं बाई..आमाला बी लगी कवतिकच हाय त्याचं.त्या परमेस्वराची क्रिपा..आपलं पोरगं बी तसं गुनाचंच हाय की ! तुमच्यासारक्याचे लय आसिर्वाद हाय बगा माझ्यावर. नाय तर काय बी नव्हतं बगा माज्याकडं..
मर..मर..राबिलो त्या कारकान्यावर विस वर्स..आता लय बेस झालया...
पोरगं सांगु लागलं..काल तं लगी सुटाची मापं-बिपं घ्येऊन गेल्येत म्हने..काई जनांच्या पोटात कळा यायल्यात म्हने ह्यो चालला तं..
हं..चालायचंच..
तिकडं आता नव्वद हजार पगार हाय म्हने..
अरे वा ! छानंच...बाबा चहा घ्या आता आज...
नको..नको..नगं..च्या नगं आज...कुनी काय दिलं बी ना मला नगंच वाटतया..तिकडं कदी खेड्या नं बी कदी भंडारा असुद्या,वावरातलं कंदुरी असु द्या,म्या कदी जेवनार न्हाय..
खेड्यानं काय ? आदी मोठाले मान्सं जेवत्येत आन मंग आमच्या सारक्या गरीबाला वाढत्येत..त्ये काहे...ज्येवलं की लोकं नुसते भोंगाळतेत व लगी हिकडं-तिकडं पांगतेत..त्यामुळं काम करनार्याला कुनी पंगतीला बशवीतंच न्हाय..कदीचं म्या लवकर ज्येवलो न्हाय..रातचं १० का वाजना पन सर्वे जेवल्याबगर म्या जेवत नां !
बाबा..नातसुध्दा तुम्हाला बाबाचं म्हणते नां ?
(माझ्या डोक्यात लिखाण वळवळतय)
रोमांचीत होत,खुदकन् हसत...हावं नां ! नुस्ती बाबा.. बाबा.. बाबा..करीत र्हाती..तिला जनु दुस्रा सब्दचं येत नां..आजी हाय,माय-बाप हाय..त्ये पन म्हनत्येत ना आमी कुनी न्हाय का गं तुजे ? का द्येवानं दुस्रा कोन्ता सब्दचं द्येला न्हाय तुला ?
दुस्र क्हाय बोलितंच नां..नुस्त बाबा.. बाबा.. बाबा..
नुस्ती हीचं न्हाय,मह्या पोरीची बी लेकरं तश्येच हायीता..मह्या जवळ आलं की लगी माय-बापाला टाटाचं करत्येत..पोरं लय जीव लावतेत मला..तिकडं गावी तं कामंच हाय मह्य लेकरं सांबाळायचं...आता आविश्यात काय कराचं न्हाय..
बस नातवंड सांबाळायची..आता काय इच्चा न्हाय बगा त्या परमेस्वराकडं...मोप मिळालं.

तेवढ्या पेपर आला..बाबांनी माझ्या हातात दिला.
बाबा..वाचता येतं का तुम्हाला ? पेपर वगैरे...
होनं..होनं..होनं..वाचित्यो मी,पन शिक्शान न्हाय कायी..
पन खेड्यानं,प्येपर,पोथ्या वाचितो नं..आता तं कार्तिक मैन्याचा लयंच धांगोडा र्हातोया मंदिरात..भजनं,किर्तनं..
मग इथल्या मंदिरात जात नाही का तुम्ही ?
इथल्या का ? न्हाय..न्हाय..न्हाय..त्यांच आपलं जमना..त्या बाया काय बी भजनं म्हनीत्यात..(हसुन)सादे टाळ पन वाजिवत न्हायीता बरुबर..म्या येकीकडे गातो त्या दुसरंच कुटंबी गात्यात माजंपन गानं बिघडवत्यात..
म्या न्हाय जात..येक तं आपली गल्ली सोडून मला कुटंबी सुदरतंच न्हाय..काय त्या गाड्या..काय त्ये रस्ते..खेड्याची मान्सं आमी. न्हाय जीव लागत शेहरात..
उगं आपलं पोरगं,नाता हाय म्हनुन दिस काढायलोत..
पन आता नाय र्हायाचं..पोरगं आलं की दोगं बी परत चाल्लो गावाकडं..मपल्या पोरी हायीता,नातवंड हायीता तिकडं..
वावरात लक्ष द्येयाचं आता..शेती कर्हायची.
आता खेड्यानं बी लय सुदराव आलाय..पुर्वी खायाला नसायचं..मान्सं वावरात्ली कवठं तोडू-तोडु पोटं भरायची..आता तं घर परत मळे,ट्रेक्टरा..लयी बरकत आलीया लोकास्नी..पैका बी मोप झालाया..शिमटाची घरं,बुलेटी...
अरे वा ! बरकत म्हणजे,छंदी-फंदीपणा पण वाढला असेल ?
गालात हसू... हां..हां..हा..त्ये काय ? झालेता २-४ दुकानं..
आन गडी मान्साचं काय सांगावं ? पैका हाय काय आन न्हाय काय..प्येनारे प्येतेतंच..सोडतेत काय ?
पन येक म्हातर हाय प्येऊन भांडन-तंटा काय न्हाय..
आमचं माजलगाव तं लगी प्रशिध्दचं हाय नावं या साठी.
आता तं पैका लय झालाय लोकास्नी.कोन्ता बी कारेक्रम असु दे साखरंच गाळत्येत.(नुक्ती,बुंदी)गोड जेवन,लगीन काय बी असु द्या नुक्ती शिवाय तं पंगत उठीतनां..
लगीन तं अश्ये थाटात करत्येत..बा..बा..बा..
ट्रका भरभरून मान्स येत्येत..पंगती,नुक्ती,आरकेश्ट्रै काय..लगी बारंच उडीवत्येत...परभनी,नांदेडकडं तं लयी वट हाय मपल्या माजलगावंचा...माजलगावची पार्टी म्हंजी लयीचं टेचात !

सकाळी-सकाळी बाबांच लोभसं,नितळ,भरभरुन बोलणं..
आपल्या कुटुंबावरचं,गावावरचं जिवापाड प्रेम..कौतुक...
सही में दिलों-दिमाग भिग गया ।
हा माणूस येतो अंगण झाडायला पण शिंपुन मात्र जातो समाधानी शितल चांदणं..अंगणभर..मनभर !

No comments:

Post a Comment