Monday, 10 October 2016

नवरात्र...

मुंबई.....

दादर स्टेशन बाहेर...
फळं,भाज्या,फुलं,हार,वेण्या,गजरे...
रस्ते तुडूंब भरलेत फुलांच्या राशींनी.
काय सर-सर हार,वेण्या,गजरे विणतात या बायका आणि पुरुष सुध्दा.पाटासारखी लाकडी फळी,तिच्यावर ३-४ इंचाचा खिळा उभा ठोकलेला..खिळ्याच्या डोक्या भोवती ४-५ पदरी दोरा गुंडाळून एकेक फुल दोर्यात गुंफत, दोरे खाली वर करत सरसर विविध फुलांच्या वेगवेगळ्या पध्दतीच्या वेण्या,गजरे माळल्या जाताहेत.शेवंती,मोगरा,अबोली,झेंडू,मरवा,चमकी इ. अगदी सराईतपणे सुई न वापरता दोर्यात गुंफल्यामुळे फुलांनाही दुखापत होत नाही व माळलेली फुलं-गजरेही दिर्घकाळ टवटवीत राहतात.दक्षिणेत केळीच्या खांबांचे दोरे काढून फुलं माळायची पध्दत आहे.आपण शहरी माणसं मात्र सुयांनी टचाटच देठांना टोचून हार-गजरे बनवतो.
रस्त्याच्या दुतर्फा चहा,वडापावचे टेबलं-फळकुटं..शेजारी पथारीवरंच हा फुलांचा मळा-ढीग...सर-सर गजर्यात रुपांतरीत होतोयं.अगदी नजर हटत नाहीये.
गर्दीला न जुमानणारा मादक सुगंध,मोहक रंगीत टवटवी व खुबीदार हस्तलाघव...अहाहा...एकदा वेळ काढून शिकायला पाहिजे यांच्या कडनं !

तसंच...
आल्यापासून बघतेय मुलं-मुली,बाया-माणसं बरेच जणं अनवाणी दिसताहेत.कपड्यावरनं तर सुखवस्तू दिसताहेत पण आहेत मात्र अनवाणी..अगदी टैक्सी,लोकल्समधे सुध्दा.
पाऊस म्हणावा तर तोही नाही.हा नक्कीच नवरात्रातल्या कडक व्रताचा प्रकार असावा.
अंगावर स्टायलिश कपडे,हातात मोबाईल, कानात गाणी,
तोंडात इंग्रजी पण पाय मात्र अनवाणी.
गंमत आहे झालं !

तसंच....
दादर स्टेशन बाहेर अगदी ग्रामीण पध्दतीच्या,तथातथाच दर्जाच्या हिरव्याकंच बांगड्यांच्या राशी...
कोपर्या-कोपर्यावर विक्रेत्या डालीच्या डाली घेऊन बसलेल्या.
भोवती खरेदीदार महिलांच दमघोट कोंडाळं...
जसं-जसं नवरात्र दिवसागणिक चढणार तसा-तसा देमार धंदा होणार असं दिसतंय.
People carry their faith-belief wherever they go.

मला नेहमी वाटतं की निदान सणावारी तरी त्या देवांच्या मुर्त्यांवरचे पुरातन लेप खरवडून काढले पाहिजेत.घेऊ द्या त्या मुर्त्यांनाही जरा मोकळा श्वास.दिसू देत लोकांना कलावंतांची कारागिरी.
पण इथे तर फार सहजपणे माणसांचेही खरवड असे सहजपणे गळून पडतांना दिसताहेत.

No comments:

Post a Comment