Sunday, 18 September 2016

कुरतड.

पावसाळी निवांत दुपार...सोनार गल्लीत पटवर्याकडे बैठक मारलेली...डिझाईन समजावून दिलं आणि बसले निरीक्षण करत येणार्या-जाणार्यांच.
दोर्यात दोरे गुंफणे,इकडचे मणी सरसर तिकडे,लांबी-जाडी बघत भराभर सराईत हात काम करताहेत.

रस्त्यावर बायकांची ये-जा,दुकानात आत-बाहेर...
मुली,स्त्रिया,महिला,बायका,खाला,अम्मी,चाची,दादी...
शेलाट्या,जाड,बारीक,स्थुल,उंच,बुटक्या...
बुरखा,नऊवार,सहावार,पंजाबी,जिन्स...
काळा,लाल,गुलाबी,पिवळा,निळा...
मुस्लिम,मराठा,जैन,परदेसी,ब्राह्मण,मारवाडी...
शिक्षित,सुशिक्षित,अशिक्षित...
घरीबसणार्या,नोकरी करणार्या,व्यवसाय करणार्या...
विशीतल्या,तिशीतल्या,चाळीशीतल्या,मध्यमवयीन,वयस्क...
अविवाहीत,विवाहित,विधवा,घटस्फोटीत...
लेकुरवाळ्या,वांझोट्या...
उत्साही,आनंदी,तरतरीत,बोलक्या...
थकलेल्या,भागलेल्या,खुरडणार्या...

सहजपणे सुचलं.
स्त्रिया गृहिणी असोत का नोकरी-व्यवसाय करणार्या असोत,
आपल्या पतीच्या,मुलांच्या आरोग्याची,सुदृढतेची,जगण्याची,जिवंत असण्याची एक जीवघेणी काळजी त्यांच्या मनात,डोक्यात कायम असतेच असते.कधी कुठल्या वाईट वार्ता ऐकल्या,बातम्या वाचल्या की काळजात लक्कन् हालतं आणी मनात विचार येतो उद्या आपल्या घरात असं काही अघटीत घडलं तर मी काय करु किंवा काय करु शकते आणि असंच काही बाही.
म्हणजे प्रत्येक स्त्रीच्या डोक्यावर ही जीवलगांना(पुरुष)हरवण्याची टांगती तलवार कायम असते.
तर सोनार गल्लीतल्या या तमाम स्त्रिया सुध्दा असंच कायम असुरक्षित वाटुन घेत असतील नाही ?
म्हणजे बघा भरल्या घरात सुध्दा अनाहुतपणे काळीज पोखरणारा एकक अंधारा कोपरा स्त्रियांंचाच.
Women invariably constantly worry about the wellbeingness of their spouse and kids.
पण याच घरातल्या महिलेच्या,कर्त्या स्त्रीच्या आरोग्याच्या,सुदृढतेच्या,शाश्वत असण्याच्या काळजीने पुरुष असं काळीज पोखरून घेत असतील का ?
की खरंच आपली बायको,आई अगदी आजारी पडली किंवा उद्या मरण पावली तर आपलं काय होईल, हे असले विचार पुरुषांच्या मनात फारसे येत नसतील बहुधा.
I think the surity of women's existance is taken for granted.
मला वाटतं आपल्या असण्याची,आरोग्याची काळजी घेणार्या जीवलगांच आसपास असणंच या स्त्रियांना दहा हत्तींच बळ देऊन जात असेल नाही ?



No comments:

Post a Comment