Monday, 20 June 2016

थोडा है..थोडे की जरुरत है...

रात्रीतुन पडलेला पावसाचा शिपका..आणि वातावरणात अमुलाग्र बदल..मान्सून दारात आल्याची खात्री पटली..तातडीने सरकारी नर्सरीत गेले. इथे सामाजिक वनीकरणासाठी योग्य अशी निकोप रोपं माफक दरात मिळतात. पण सरकारच्या वनिकरणाच्या धडाडीच्या धोरणामूळे ही नर्सरी रिकामी व्हायला वेळ लागत नाही.

नर्सरीची जागा 'गुलशन महल'मधे..जुनी मुगलकालीन टप्प्या-टप्प्यांची मोठी बाग..जुनं राजसं निवासस्थान आता सरकारी अधीकार्यांचं निवासस्थान झालेलं.. दळदार काळी माती..
भरपुर उंचीपुरी झाडं..चहूबाजूंनी जुन्या भिंती, पायर्या,पाणी खेळवण्यासाठीचे नजाकतीचे बांधकाम,बाव, चौथर्यांचे भग्नावषेश..मध्यभागी लंबुळका हौद त्यात कारंजांची ओळ..दुष्काळामुळे नर्सरीचा नेहमीचा हिरवा पोत पार हरवलेला..अगदी मोजकी रोपं..बावेचं पाणी आटलेलं..सुर्यप्रकाशासाठी वृक्षही छाटलेले..त्यात हे खंडहर..शेवटच्या घटका मोजत असलेलं..उदासंच वाटलं. काय आपले राज्यकर्ते ?
इतकं सुंदर गाव..४-५ शतकांपुर्वीच्या हिंदू-मुस्लीम वैशिष्ट्याच्या अनेक वास्तु,तटबंद्या,दरवाजे सगळ्याची सगळ्यांनी वासलात लावलेली.आधुनिकीकरण,शहरीकरणाचा रेटा खरंच का इतका जबरदस्त असतो की या ऐतिहासीक वास्तु योग्य तर्हेने सांभाळण्याचा पोच कुणालाही
रहात नसावा ?

अजून पुढे दुसर्या सरकारी नर्सरीत...एके काळचा विस्तीर्ण तलाव आटुन त्यावर बहरलेली हिमायत बाग..बागेच्या पाठीशी डोंगर..समोर पेरुबाग,आमराई,जांभुळबन,करवंदी जाळ्या,वडा-पिंपळाची जुनी खोडं,जुने हौद,कारंजी,चबुतरे..
भरपूर पक्षी,मोर..इथे जास्त करुन फळांचीच रोपं मिळतात..मला हा परिसर फार आवडतो..खुप छान..निवांत..गार..वाटतं इथे.लहानपणी आम्ही इथे पिकनिकला यायचो.जाभळं खावी तर इथलीचं.
ड्रायव्हर होता..विनासायास डोकावले.
प्रवेशद्वाराशीचं वनविभागाने नवी प्रशस्त नर्सरी थाटलेली..डोळे विस्फारुन बघत राहिले..
Believe me..सार्या दुनियेचं हिरवेपण स्वागताला पायघड्या घालून..विस्तीर्ण झाडं..त्यांच्या आश्रयाने आखीव-रेखीव वाफे..वार्यावर डोलणारा सुकूमार ओला पोपटी रंग..काळी,ओलसर माती..विविध प्रकारची भरपूर रसरशीत रोपं..पक्ष्यांचा किलबिलाट,मोरांचे आवाज..कामगारांची उत्साही लगबग...नभं उतरु आलेलं...
Everything in tune !
अक्षरशः डोळे निवले.
Aha ! Almost like a paradise.
काल-परवा पर्यंत इथे कहरी उन्हाळा होता हे कुणाला सांगूनही खरं वाटणार नाही.ईच्छा आणी क्षमता असली की डोंगरही हलवता येतो हे जाणवलं. गुलशन महलच्या उदासी नंतर ह्या प्रसन्न हिरव्या स्वागताने हरकले.फार बरं वाटलं इथे येऊन.
सच कहूं तो सरकारसे उम्मीदे बढी ।

मकबर्याजवळ माझी मैत्रीण रहाते. वेळ व ड्रायव्हर हाताशी होता..गाडी वळवली.योग्य तर्हेने रीस्टोअर केलेल्या दिल्ली गेट, रंगीन दरवाज्यांचा दबदबा जाणवतोय. कौतुकास्पद काम !
Goverment School Of Art च्या जुन्या इमारतीवरुनंच रस्ता जातो. औरंगजेबाच्या जनाना महलमधे पुर्वीचं कला महाविद्यालय भरत असे.
जुन्या कमानदार तटबंदीच्या परिसराला झोपडीवजा
घरं-टपर्यांनी दाटी-वाटीने मरणासन्न वेढलेलं..मधल्या मोकळ्या आवारात अत्यंत सुमार पण नवीन सरकारी इमारती खेटून उभ्या. अगदी त्या औरंगजेबाच्या व आम्हा art school च्या विद्यार्थ्यांच्या नाकावर टिच्चुन !
एकेकाळची औरंगाबाद मधली one of the best historic,romantic and creative place...
जनाना महल !
तीचं हे असलं दळभद्री आधुनिक रुपडं बघून हादरलेचं.
किलेअर्क..जनाना महल..इथे औरंगजबाचे कुटुंबीय रहायचे..महालाची यजमानीण इराणची राबीया दुर्रानी..
त्यांच्या काही अपत्यांचा जन्म ह्याच वास्तुतला..
१०-१२ एकरांचा परिसर.. महालात खुप चढ-उताराची एकात एक दालनं..अंतपुरे..२-३ मजली रेखीव वास्तू..कमानदार खिडक्या..सज्जे..कोनाडे..चुन्यातलं बांधकाम..बागेच आवारही मोठं..मध्यभागी चौथरा..हौद..कारंज..चहूबाजूंनी कमानदार तटबंदी..कोपर्यांना बुरुज.. शेजारी हमामखाना..संरक्षक भिंतीच्या बाहेर..हत्तीखाना,मर्दाना महल..मशीद..भरपूर जुनी झाडी..
एकेकाळच्या शहेनशहाच्या वैभवाची व दरार्याची साक्ष असलेला हा परिसर अक्षरशः शेवटची घरघर मोजतोय. येऊन-जाऊन असलेले राज्यकर्ते नाकर्तेपणाचा झेंडा हातात घेऊन बसलेले..
अतिक्रमणाची अजस्त्र मगरमीठी..जुनी नजाकतदार बांधकामं पाडुन त्यांच्या उरावर निर्लज्जपणे उभे केलेले सरकारी ठोकळे..हिरवे,भगवे,निळे...सगळे बेमालुम लचके तोडताहेत..
अक्षरशः गदगदून आलं व डोळे पाणावले.
कसले हे आपले राज्यकर्ते व हीच का आपली लोकशाही ?
तुला न मला घाल कुत्र्याला करणारी प्रवृत्ती... मन शतशः विदीर्ण झाले...चीड आली..
पुढे अजुन १-२ भव्य दरवाजे,जुन्या घुमटी मशिदी..तटबंद्या..
पुन्हा तीच ती अतिक्रमणाची वेडीविद्री ठिगळं जिथे-तिथे..
तो मकबरा एक बर्या स्थितीत आहे..पण त्या विटभट्ट्यांनी त्यालाही विळखा घातला आहे.
माणसाला पुरलं तर दोन गज जमीन लागते आणि जाळलं तर हंडाभर राख उरते..और उप्पर जाना है तो खाली हातही जाना है..तरीही मी,माझं,आमचं करत का इतकी हाव असते सगळ्यांना सरसकट ?
नुकत्याच झालेल्या पावसामुळे शुचिर्भुत झालेल्या शुभ्र मकबरा दर्शनाने जरा सुखावले..पाठच्या डोंगरावरच्या औरंगाबादच्या लेण्या सुरेख उठावदार दिसताहेत..तिथून उंचावरुन ऐस-पैस पसरलेलं औरंगाबाद फारंच विहंगम दिसतं..कवेत आल्यासारखं वाटतं..माझं औरंगाबाद !
उत्तर-दक्षिणेला डोंगरांची लोभसं तोरणं..शहरभर विखुरलेल्या अनेक खंडहरी ऐतिहासिक वास्तू.. सुस्थितीतील मंदिरं..मशिदी..अगल-बगल अजिंठा-वेरुळ-देवगिरी-खुल्ताबाद..गोदेकाठचं एकनाथी भारुड..ज्ञानाचा परिमळ..
पैठणीची प्राचीन सळसळ तर नव्या औद्योगिकीकरणाची सप्तपदी...
दुरदृष्टीचे खंदे राज्यकर्ते व सुजाण,सतर्क नागरिकांनी एकत्र येऊन चंग बांधला तर nothing is impossible in this beautiful, histoiric city.
बस्...थोडा है..थोडे की जरुरत है...

Love you Aurangabad !

No comments:

Post a Comment