Thursday, 19 May 2016

'म'ममतेचा...


ऊन्हा-पाण्यानी मराठवाड्यात थैमान घातलं आहे.
रात्रभराचा एसी-पंखा..लवकर उठायला जीवावरंच येतयं..तरी उठले..चहा केला-घेतला व तडक गाडी काढून भाजी आणायला गेले..मुलगा,त्याचा मित्र व एक फ्रेंच मुलगा सध्या घरी आहेत. ऊन्हाने जेवावसं पण वाटत नाही व ऊन्हात जेवायला घरी येणं शक्य नाही त्यामुळे नाश्त्यावर जोर असतो. पालेभाज्यांचे पराठे-दही मुलं खुश होतात.
सकाळची सात-साडेसातची वेळ तरीही बाजार एकदम मलुल..मोजक्याच व महाग भाज्या..विक्रेते कावलेले..आमच्या सारखे ऊन्हाने त्रासलेले..भाज्यांनीही माना टाकलेल्या...
अगदी बेरुखी रुप बाजाराचं!तरी मुलांच्या आवडीच्या भाज्या घेतल्या व परतले.

परत एक चहा..एक बोकोबा बघत..घोगर्याने गुरगुरत बंगल्याबाहेर गेले.. तेवढ्यात पक्ष्यांचा कुणावर तरी धावून गेल्या सारखा कलकलाट...पाहिलं तर मनीमांऊने साळुंकी पकडलेली व तोंडात पकडून झाडोर्यात चाललेली. चहा संपवून फोटो काढायला गेले तर मार्जार माताजी सावलीत पहुडलेल्या...दोना पैकी एका पिल्लाने पक्ष्याच्या डोक्याचा ताबा घेतलेला तर दुसर्याने पंखावर झडप मारलेली. बाळांचा ब्रेकफास्ट मार्गी लावून माऊबाई निवांत झालेल्या दिसताहेत. वरच्या दांडीवर मृतपक्ष्याच्या नातलगांची शोकसभा भरलेली. गेल्या २आठवड्यातील ही तिसरी शिकार या मार्जार कुटुंबीयांची. सकाळी-सकाळी उदास झाले.
व्हरांड्यात बसून फोटो एडीट करत बसले तर मागच्या भिंतीवर मुंग्यांची शिस्तीची लगबग...पुसटसा रस्ता देखील तयार झाला आहे त्यांच्या सिक्रिशन्सनी! तरीचं वाट चुकत नाहीत हं या. येणार्या-जाणार्यांची सारखीचं तुर-तुर..थांबायला वेळ नाही की बोलायला सवड नाही. पाऊस-पाण्याचे संकेत मिळाले आहेत लेकरांसाठी कोठारं भरून ठेवायला नकोत ?

मी, मांजर, मुंगी...कीती साम्य आहे आमच्यात !आपल्या आधी आपल्या मुलांचा विचार करणार्या माता. ममत्वात काही फरक नाही.
कुठेही जा आई ही आईचं असते नाही ?

No comments:

Post a Comment