Wednesday, 26 February 2014

कर्मयोग.....

औरंगाबाद-पुणे प्रवास....फेब्रुवारीची थंडी....प्रसन्न पहाटवारा.....
४०-५० कि.मी. वर गोदावरीवर पूल....अगदी बेताचंच पाणी...
तरीही नदीच्या अल्याड-पल्याड १०-१५ कि.मी. पर्यन्त दूरवर शेतांचा अखंडीत हिरवा फुलवा....

कुठे उसाच्या नव्या लागवडीचे गर्द हिरवे चकचकीत धुमारे...
तर कुठे ओतप्रोत रसाळुन ढेपाळलेले उंचे-पुरे..पिवळे-पांढरे घनदाट उसमळे....
कुठे सोबतीने टपोर्या दाणेदार गर्भाराने जडावलेले हिरवेगार प्रशस्त गहुमळे...
तर कुठे शिरकाण होऊन माना टाकलेल्या ज्वारीचे पिवळे चौकोन....
मधुनच काळ्या मातीवर रांगोळीच्या ठीपक्यांसारखी रेखीव कापुस बोंडे....
तर रांगोळीतल्याच चिमुटभर कुंकवासारखे अधुन-मधुन राजगीर्याचे किरमीजी तुरे डोलताहेत....

शेतकर्यांच्या परिश्रमांची बहरलेली हिरवाई बघुन नजर निवली.
त्या भुमातेची व गोदामातेची पण धन्य वाटली !
अत्यंत व्रतस्थपणे हा फळफळण्याचा चिरंतन कर्मयोग निभावताहेत.







No comments:

Post a Comment