Thursday, 1 August 2013

पुन्हा - पुन्हा पाऊस !

पुन्हा - पुन्हा पाऊस !

अविरत कोसळणारा...
रिप..रिप...रिपरिपणारा...
आसमंताला कुंद करणारा...
आता पुरे म्हणायला लावणारा...
पुन्हा - पुन्हा पाऊस !

नद्या - नाले उन्मुक्त करणारा...
शेतकर्यांना आलटुन - पालटुन,
सुखावणारा...दुखावणारा...
क्षितीजापार हिरवी चादर पांघरणारा...
पुन्हा - पुन्हा पाऊस !

शाळेला बुट्टीची मुभा देणारा...
कागदी बोटींची उलथा - पालथ करणारा...
डास..माश्या..चिलटं..प्रसवणारा...
सर्दी..ताप..खोकल्याला आमंत्रण देणारा...
पुन्हा - पुन्हा पाऊस !

वाळत घातलेले कपडे हटकुन भिजवणारा...
घरभर चिखलाच्या पाय़ांनी फिरणारा...
वाफाळलेल्या चहाची अखंड तल्लफ देणारा...
गारीगार पांघरुणात उब शोधायला लावणारा...
पुन्हा - पुन्हा पाऊस !

छ्त्र्या - रेनकोटची दुकानं गजबजुन टाकणारा...
चहा..भजी..वडे..
तेजीतल्या टपरीवाल्यांच्या नोटा भिजवणारा...
बेमुर्वत रिक्षावाल्यांना अजुन उद्दाम करणारा...
पुन्हा - पुन्हा पाऊस !

रस्त्यांना खड्डे पाडणारा...
तेही परत पाण्याने भरणारा...
पादचार्यांची आर - पार फजीती करणारा...
ओल्या रस्त्यांवरची
प्रतिबिंबीत लाईट्सची गंमत दाखवणारा...
पुन्हा - पुन्हा पाऊस !

बेशिस्तीचं काहुर माजवणारा...
वेळापत्रकाचे तीन तेरा करणारा...
कुणाला चिंतीत तर कुणाला चकीत करणारा...
असा कधी तरी नकोसा पण खुपदा हवा हवासा...
पुन्हा - पुन्हा पाऊस !

No comments:

Post a Comment